Shivajirao Adhalrao patil Sarkarnama
विशेष

सभापतीची बायको, मुलगी ढसाढसा रडायच्या; पण त्यांना न्याय देऊ शकलो नाही : आढळराव

कायदा आणि विधी विभाग तुमच्याकडे आहे. खोट्या केसेस आहेत, असे समजावून सांगितले तरीही माझ्या सभापतीला न्याय मिळाला नाही.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र नसताना खेड पंचायत समितीच्या शिवसेनेच्या (Shivsena) सभापतींवर ३०७ चा गुन्हा दाखल झाला. गेली सहा महिने शिवसेनेचा सभापती जेलमध्ये आहे. सभापतीची बायको व मुलगी दिवसाआड माझ्याकडे यायच्या आणि ढसाढसा रडायच्या. काय करावं कळायचं नाही. मनाला इतकं वाईट आणि विषण्ण वाटायचं. मी अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो. साहेब, सभापतींना किमान जामीनतरी मिळू द्या. कायदा आणि विधी विभाग तुमच्याकडे आहे. खोट्या केसेस आहेत, असे समजावून सांगितले तरीही माझ्या सभापतीला न्याय मिळाला नाही, अशी खंत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao patil) यांनी बोलून दाखवली. (Could not give justice to families of Sabhapati of khed panchayat samiti : Adhalrao)

आढळराव पाटील यांनी सोमवारी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आपली भूमिका मांडण्यासाठी त्यांनी मेळावा घेतला. त्यात आढळराव बोलत होते. ते म्हणाले की, खेड पंचायत समितीत शिवसेनेची एकहाती सत्ता होती. आपल्या लोकांवर दहशत बसवून आमिषं दाखवून आठपैकी सहा पंचायत समिती सदस्य फोडले आणि राष्ट्रवादी त्यांना घेऊन गेली. राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावाच्या खडकवासलामधील हॉटेलवर त्यांना ठेवण्यात आले. त्यातील काही लोकांनी फोन केल्यानंतर सभापती व इतर लोक त्यांना सोडवायला गेले. त्या ठिकाणी झटापट झाली. मारहाण झाली पण दुसऱ्या दिवशी सकाळी ३०७ चा गुन्हा दाखल झाला. गेली सहा महिने आपला सभापती जेलमध्ये आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत सर्वांना भेटलो. पण, माझ्या सभापतीला न्याय मिळाला नाही. सभापती जेलमध्ये जातोय, खोटे गुन्हे असूनही त्याला जामीन मिळत नाही, त्याचा संसार उद्‌ध्वस्त झाला आहे, हे पाहून विषण्ण वाटायचं.

आपल्या तातडीने बोलविण्याचे कारण काल दुपारपासून सर्व माध्यमांमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटात बातमी फिरत होती. बहुतांश लोकांनी अभिनंदन केले, अगोदर सांगितले असते तर आम्हीही आलो असतो, असे काहीजण म्हणाले. जवळजवळ १८ ते १९ वर्षे तुमच्यासोबत काम करत आहे. या वर्षात हिंदुह्‌दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार कधी सोडला नाही. हिंदुत्वाच्या विचारापासून कधीही लांब गेलो नाही. अनेक संकटं आली. माझी अठरा वर्षांची कारकिर्द फक्त आणि फक्त संघर्ष करण्यातच गेली.

शिवसैनिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मलाच मैदानात उतरावे लागते. खासदार असताना आणि नसतानाही मी अजूनही ते काम करत आहे. मला आजही वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात १० फोन करावे लागतात. शिक्रापूर, रांजणगाव, मंचर, घोडेगाव, चाकण, आळेफाटा, ओतूर या पोलिस ठाण्यात फोन करून आमच्या शिवसैनिकांवर खोटी केस दाखल केली आहे, त्यांना त्रास होतो आहे, तडीपार केले आहे, असे सांगत असायचो. हे मी माझ्या शिवसैनिकांसाठी करत होतो, माझ्यासाठी काही नव्हतं, असेही माजी खासदार आढळराव यांनी स्पष्ट केले.

गेल्या तीन साडेतीन वर्षांंमध्ये एका बाजूला माझे पाठीचे दुखणं, डायबेटीस असतानाही मी घरात बसून राहिलो नाही. ज्यांनी कामं करायला पाहिजेत, त्यांनी कामं केली नाहीत. पण, मला मतदारसंघ वाऱ्यावर सोडता आला नाही. मी लोकांचे प्रश्न घेऊन कधी वादळात नुकसान झालेल्या लोकांना खिशातून पैसे काढून मदत केली. कोरोना काळात वैद्यकीय उपचार, अन्नधान्य, किराणा याची मदत केली. मला सत्तेची हाव होती म्हणून मी हे केले नाही. कारण मी खासदारही नव्हतो. पण, ज्या लोकांनी माझ्यावर मनापासून प्रेम केले, त्यांना वाऱ्यावर सोडता येत नव्हतं. ज्यांच्यावर जबाबदारी होती, ते घरात स्वतः कोंडून बसले हेाते. हे सर्व उभ्या महाराष्टाने पाहिले आहे, असा आरोपही त्यांनी विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT