Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
विशेष

Devendra Fadnavis News: फडणवीस नागपूरऐवजी तातडीने दिल्लीसाठी रवाना : राज्यात चर्चेला उधाण

सरकारनामा ब्यूरो

पुणे : नागपुरात हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पुण्याहून थेट तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्या अचानक दिल्ली (Delhi) दौऱ्याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. त्यामुळे त्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत चर्चेला उधाण आले आहे. (Devendra Fadnavis immediately left for Delhi instead of Nagpur)

उपमुख्यमंत्री फडणवीस हे आमदार मुक्ता टिळक यांच्या अंत्यसंस्कारासाठी आज (ता. २३ डिसेंबर) पुण्यात आले होते. त्यांच्यासोबत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, प्रवीण दरेकर व इतर भाजप नेते होते. आमदार टिळक यांचे अंतिम दर्शन घेऊन फडणवीस हे नागपूरला येणे अपेक्षित होते. मात्र, ते पुण्याहून थेट तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनावरून वातावरण तापलेले असताना फडणवीस हे नागपूरला येणे अपेक्षित होते. मात्र, ते पुण्याच्या विमानतळावरून थेट दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. नेमकं कोणत्या कारणांसाठी फडणवीस दिल्लीत गेले आहेत, याबाबत राज्यात उत्सुकता आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून होतो आहे, असा आरोप विरोधी पक्षाकडून विशेषतः शिवसेनेकडून होतो आहे. कारण, भूखंड गैरव्यवहारसंदर्भात चौकशीची मागणी करणारे एक पत्र भाजप आमदारने लिहिले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे फडणवीस हे कोणत्या कारणासाठी दिल्लीला गेले आहेत, याची चर्चा होताना दिसत आहे.

बापटांच्या प्रकृतीची केली विचारपूस

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. तसेच, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या वेळी मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन तसेच प्रविण दरेकर आणि इतर नेते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT