Ratnakar Gutte
Ratnakar Gutte  Sarkarnama
विशेष

जानकरांच्या आमदाराचा भाजपला शॉक : ‘आम्हाला गृहीत धरू नका!’

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election) आम्हाला कोणीही गृहीत धरू नये, असा इशारा माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांनी दिला आहे. राज्यात सत्तास्थापनेवेळी जानकर यांनी भाजपला (BJP) पाठिंबा दिला होता. त्यामुळे गुट्टे यांचा हा इशारा भारतीय जनता पक्षाला धक्का मानला जात आहे. (Don't assume us in Rajya Sabha elections : Ratnakar Gutte)

मागील भाजप सरकारमध्ये महादेव जानकर हे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री होते. विधानसभेची २०१९ ची निवडणूकही जानकर यांच्या पक्षाने महायुतीमध्ये राहून लढवली होती. त्यामुळे रासप आमदार गुट्टे यांचा पाठिंबा भाजपने गृहीत धरला असावा. मात्र, गुट्टे यांच्या आजच्या भूमिकेमुळे भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. एक एक मत महत्वाचे असताना गुट्टे यांची भूमिका भाजपला न परवडणारी आहे.

राज्यसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार गुट्टे यांनी सांगितले की, राज्यसभा निवडणुकीत कुणाला मतदान करायचे, हे ऐनवेळी ठरविण्यात येईल. राज्यसभा निवडणुकीत मी तटस्थ राहण्याची भूमिका घेणार नाही. निश्चितपणे विचार करूनच मतदान केलं जाईल. आजपर्यंत मला कोणाचाही फोन आलेला नाही, तसेच कुणाचं बोलावणंसुद्धा आलेलं नाही. त्यामुळे मी मुंबईला जायचा सवालच येत नाही. किंबहुना मी मुंबईला जाणारच नाही. काही पक्षांनी आपल्या आमदारांना मुंबईमधील हॉटेलमध्ये ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मला कोणी बोलावले नसल्यामुळे माझा जाण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही, असेही गुट्टे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आमदार महादेव जानकर यांची मागील काही दिवसांतील भूमिका ही भाजपपासून दूर जाणार असल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यातच त्यांनी खुद्द फडणवीस यांना सुनावले होते. आम्ही महायुतीमध्ये होतो म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाला, असे उत्तर त्यांनी फडणवीस यांना दिले होते. जानकर हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या जवळ जात असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासोबत मागील काळात हजेरीही लावली आहे, त्यामुळे गुट्टे यांची भूमिका भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT