Devendra Fadnavis Sarkarnama
विशेष

Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान; ‘मी शर्यतीत...’

Devendra Fadnavis statement : युती आणि आघाडीमध्ये नेहमी वास्तवावर आधारित राजकारण करावं लागतं. आघाडी आणि युतीच्या राजकारणात भावनेला महत्व नसते, त्यामुळे मी मुख्यमंत्री व्हावं, असं भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल तरी सध्या महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कुठलीही शर्यती नाही.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 14 November : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप सत्तेवर आला तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असे संकेत दिले होते. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचले होते. मात्र, आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले आहे. ‘मी मुख्यमंत्रिपदाच्या कुठल्याही शर्यतीत नाही,’ असे विधान केले आहे, त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबतची सुरू झालेली चर्चा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, युती आणि आघाडीमध्ये नेहमी वास्तवावर आधारित राजकारण करावं लागतं. आघाडी आणि युतीच्या राजकारणात भावनेला महत्व नसते, त्यामुळे मी मुख्यमंत्री व्हावं, असं भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल तरी सध्या महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कुठलीही शर्यती नाही. मी मुख्यमंत्रिपदाच्या कुठल्याही शर्यतीत नाही.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण मुख्यमंत्रिपदाच्या (Chief Minister) शर्यतीत नाही, असे विधान का केले असावे, याची चर्चा रंगली आहे. काही राजकीय विश्लेषक आपल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावत आहेत. मात्र, फडणवीस यांच्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला उधाण येणार आहे.

विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीच्या प्रचारात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ हे केलेले विधान प्रचंड गाजले होते. विरोधकांनी त्याची खिल्ली उडवली हेाती. सर्वच क्षेत्रातून त्यावर टीका झाली होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला त्यामुळे पहिल्यांदा त्यांना शक्य असूनही शिवसेनेच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्रिपद मिळू शकले नाही.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपसोबत गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असा सर्वांचा राजकीय होरा होता. मात्र, खुद्द फडणवीसांनीच मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केले, त्यामुळे पुढच्या अडीच वर्षांतही त्यांना मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली.

फडणवीसांचे मुख्यमंत्रिपद हुकल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या मनाला लागले होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांनी तर मनावर दगड ठेवून आम्ही शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय स्वीकारल्याचे विधान केले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे हुकलेल्या मुख्यमंत्रिपदाने अनेकांना दुःख झाले होते. तशी अवस्था पुन्हा होऊ नये, अशी काळजी फडणवीसांनी घेतली तर नाही ना, असाही एक स्वर येत आहे.

अजितदादांना कमी जागा का?

एकनाथ शिंदे हे गेली अडीच वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. या काळात त्यांनी आपली ताकद निर्माण केली आहे, त्यासाठी त्यांना पुरेसा वेळही मिळाला आहे. त्यांना शिवसेनेच्या विस्तारासाठी लक्ष देता आले. याशिवाय मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचाही त्यांना फायदा झाला. त्या तुलनेत अजित पवार हे युतीसोबत एक वर्षे उशीरा आले. त्यांना शरद पवार यांच्यासारख्या तगड्या नेत्याशी लढावे लागले. त्यातच त्यांचा सुरुवातीचा काळ गेला. त्यामुळे पक्षाच्या विस्तारासासाठी त्यांना कमी वेळ मिळाला, त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तुलनेत अजित पवारांना कमी जागा मिळाल्या, असे स्पष्टीकरणही देवेंद्र फडणवीसांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT