Shivajirao  Adhalrao Patil-Sharad Pawar
Shivajirao Adhalrao Patil-Sharad Pawar Sarkarnama
विशेष

शरद पवारांकडून मला दोनदा राज्यसभेवर पाठविण्याची ऑफर होती : आढळरावांचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिवसेनेतून (Shivsena) हकालपट्टी झाल्याच्या वृत्ताने घायाळ झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या मनातील दुःख मांडले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी (NCP) संघर्ष करत शिवसेना कशी टिकवली हेही सांगितलेच. पण, एक मोठा गौप्यस्फोटही केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोनवेळा राज्यसभेवर पाठविण्याची आपल्याला ऑफर दिली होती, असे सांगितले. मात्र, आपण ती ऑफर नाकारून पक्षनिष्ठा ठेवून गेल्या १८ वर्षांपासून शिवसेना टिकविण्याचे काम केले आहे, असे स्पष्ट केले. (I had an offer of Rajya Sabha MP from Sharad Pawar: Adhalrao)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आढळराव यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई म्हणून आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर तातडीने ती मागे घेत आढळराव हे उपनेतेपदी कायम असतील, असे स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आले होते. हकालपट्टीच्या बातमीमुळे पुरते घायाळ झालेल्या आढळराव पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

आढळराव म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना अनेकांनी मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मग माझ्या एकट्यावरच हकालपट्टीची कारवाई का करण्यात आली? ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मला ऑफर दिली होती. ते शिरूरमधून लढणार होते आणि मला दोन वेळा राज्यसभेवर पाठवणार होते. तरीही ती ऑफर मी नाकारली. गेल्या १८ वर्षांपासून बाळासाहेब ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलो. तरी मला अशी वागणूक दिली जातीये. कोणीही सांगावं की मी कोणती पक्षविरोधी कारवाई केली. माझी झालेली हकालपट्टी ऐकून मी खूप दुःखी झालोय. आता हकालपट्टी केली नाही, असं पत्र पाठवलं आहे. पण, काय फायदा. झालं त्याचं मला वाईट वाटतंय. निष्ठेने १८ वर्षे काम केले, त्याचं हे फळ मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसला मी अंगावर घेतलं हीच माझी चूक दिसत आहे. त्याची ही शिक्षा असेल तर मला मान्य आहे. पण तरीही मी आजही पक्षाविरोधात नाही. बघू पुढं काय होतंय.

एकनाथ शिंदे आज राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात बोलतायेत. मी गेल्या अडीच वर्षांपासून त्यांना अंगावर घेतोय. आता फक्त आम्हाला गोळी मारायची बाकी होत. एकनाथ शिंदेना समर्थन करण्याचा आणि न करण्याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील. पक्षातून हकालपट्टी झाल्यापासून मला कोणत्याही पक्षाचा फोन आला नाही. शिवसेनेत आल्यापासून मी भाजपमध्ये जाणार, राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा आहे. पण त्यात आत्तापर्यंत तथ्य नव्हतं, यापुढे ही नसेल, असेही स्पष्टीकरण आढळराव पाटील यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT