Balasaheb Thorat-Uddhav Thackeray-Sambhaji Raje
Balasaheb Thorat-Uddhav Thackeray-Sambhaji Raje Sarkarnama
विशेष

संभाजीराजेंच्या पाठिंब्याबाबत थोरातांचा मोठा गौप्यस्फोट; 'मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती...'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)) यांनी आज मोठे विधान केले आहे. महाविकास आघाडीनं संभाजी राजे यांना समर्थन द्यावं, अशी विनंती मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केली होती. पण, ती जागा शिवसेनेची होती, असा गौप्यस्फोट थोरात यांनी केला आहे. (I had requested Chief Minister Uddhav Thackeray to support Sambhaji Raje: Balasaheb Thorat)

संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा देण्यावरून राज्यात मोठे राजकारण रंगले आहे. सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी इच्छा संभाजीराजे यांची होती. मात्र, त्या जागेवर शिवसेनेने आपला उमेदवार दिला. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही आपला पाठिंबा नैसर्गिक न्यायाने शिवसेनेला जाहीर केला होता. मात्र, त्यानंतर राज्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. खुद्द संभाजी राजे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नसल्याचा आरोप आपल्या आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही परभणीत बोलताना संभाजी राजे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय सर्वांत आधी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतला होता, असे सांगून संभाजीराजे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे सूचित केले. तसेच बाळासाहेब थोरात यांचीही तशीच प्रतिक्रिया आली आहे.

थोरात म्हणाले की, राज्यसभेच्या सहा जागा असून सहावी जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला आहे. सहावी जागा संभाजीराजे यांना द्यावी, अशी तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. पण, जागा शिवसेनेची असल्याने मी बोलेन, असे ते म्हणाले होते. आमची तेव्हाही इच्छा होती, आजही आहे. संभाजीराजे हे महत्वाचं व्यक्तिमत्त्व आहे. शिवसेनेला निर्णय घ्यायचा होता, तो त्यांनी आता घेतला आहे.

संभाजी राजे यांची भूमिका आतापर्यंत कायम संयमाची आणि सामंजस्याची राहिलेली आहे. समाजाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताची भूमिका ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. राज्यसभेत त्यांना आणखी एक संधी मिळाली असती, तर आम्हाला आनंद झाला असता, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT