Raju shetti
Raju shetti Sarkarnama
विशेष

ठाकरे सरकार पडतंय, याचं दुःख नाही; पण... : शेट्टींनी दिला भाजपला हा इशारा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकर पडतंय, याचं मला अजिबात दुःख नाही. कारण, हे सरकार जनताभिमुख राहिलेले नाही, हे स्पष्ट झाल्याने आम्ही दोन महिन्यांपूर्वीच या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. परंतु भारतीय जनता पक्षाकडून (BJP) ज्या पद्धतीने ते पाडलं जातंय, हे लोकशाहीच्या दृष्टीकोनातून अतिशय घातक आहे. आज शिवसेनेनवर (Shivsena) वेळ आली आहे. पण, उद्या भाजपसारख्या मोठ्या पक्षावरसुद्धा अशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी भाजपला दिला. (It is not sad that Thackeray government is falling : Raju Shetti)

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्यानंतर राज्यातील उद्‌भवलेली राजकीय परिस्थिती यावर शेट्टी यांनी भाष्य केले. त्यावेळी त्यांनी भाजपसह सर्वपक्षांना सावध होण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष पाशवी वृत्तीने मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्रातील सरकार पाडून सत्ता हस्तगत करत आहे. हे लोकशाहीच्या दृष्टीकोनातून अतिशय घातक आहे. मी सातत्याने सांगत आलो आहे की, भारतीय जनता पक्षाकडे सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), प्राप्तीकर (इन्कम टॅक्स) हे तीन अतिशय प्रभावी असे कार्यकर्ते आहेत. या प्रभावशाली कार्यकर्त्याच्या माध्यमातून या राजकीय उलथापालथी घडवून आणल्या जात आहे, असा स्पष्ट आरोपही राजू शेट्टी यांनी पुन्हा केला.

मी एका पक्षाचा संस्थापक असून स्वाभिमानी शेतकरी संघटना नावाचा पक्ष उभा केलेला आहे. एखादा पक्ष किंवा संघटना बांधण्यासाठी किंवा उभा करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. हे ज्याचे त्याला माहिती असते, त्यामुळे अशा पद्धतीने एका पक्षाची वाताहत होणे किंवा मोडतोड होणे, हे बघून या क्षेत्रातील असल्याने आणि त्याची जाणीव असल्यामुळे माझ्यासारख्याला अतिशय वाईट वाटतं, अशा शब्दांत शिवसेनेतील घडामोडींवर राजू शेट्टी यांनी भाष्य केले.

जे लोक पक्षाचं नाव घेऊन निवडून येतात. निवडून आल्यानंतर ते पक्षालाच विसरतात, ही प्रवृत्ती देशात वेगाने वाढत चाललेली आहे. त्याला प्रस्थापित राजकर्ते खतपाणी घालतात, हे दुर्दैवी आहे. सर्व राजकीय पक्षांना मला सांगायचं आहे की, आज शिवसेनेवर वेळ आलेली आहे. उद्या भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षावरसुद्धा अशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असा सडेतोड इशाराही राजू शेट्टी यांनी भाजपला दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT