Uddhav Thackeray - KCR  Sarkarnama
विशेष

महाराष्ट्रात राजकीय खलबतं करणाऱ्या केसीआर यांची ताकद साधी नाही

KCR | Uddhav Thackeray | राष्ट्रीय राजकारणात नसलेल्या केसीआर यांनी एकट्याच्या नेतृत्वावर तेलंगणा राज्य निर्माण करण्याची किमया साधली आहे.

ऋषीकेश नळगुणे

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (KCR) यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. दोघांमध्ये वर्षा बंगल्यावर तब्बल अडीच तास चर्चा झाली. लवकरच हैदराबादमध्ये किंवा इतर ठिकाणी आम्ही सर्व जण भेटू आणि पुढील दिशा ठरवू. एक आंदोलन उभे करु. देशाला बदलाची गरज आहे. देशातील वातावरणाला खराब होवू द्यायचं नाही. अन्य लोकांशीही आम्ही बोलू, असे त्यांनी सांगितले.

मात्र त्यांच्या याच वक्तव्यानंतर चर्चा सुरु झाली आहे ती देशाचे राजकारण बदलू इच्छिणाऱ्या केसीआर यांची ताकद आहे किती? आता त्यांची ताकद देशाच्या राजकारणात आहे का? तर आकडेवारीत सांगायचं तर त्यांचे लोकसभेत अवघे ९ आणि राज्यसभेत ६ खासदार आहेत. तर त्यांच्या राज्यात १३६ आमदार आहेत. मग आता या ताकदीवर ते देशाचं राजकारण बदलणार आहेत का?

पण केसीआर यांची ताकद समजून घ्यायची असेल तर त्यांचा भूतकाळ आणि सत्तेपर्यंत पोहचण्याचा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. कारण राष्ट्रीय राजकारणात नसलेल्या केसीआर यांनी एकट्याच्या नेतृत्वावर तेलंगणा राज्य निर्माण करण्याची किमया साधली आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात ही राजकीय खलबत करत असलेल्या केसीआर यांची देशाच्या राजकारणात ताकद कमी नाही हे नक्की.

देशात जून २०१४ ला तेलंगणा या २९ व्या नव्या राज्याची स्थापना झाली. निवडणूक झाली आणि या नव्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी ते विराजमान झाले. "कल्वकुंतला चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर" या नावाची त्यावेळी देशात पहिल्यांदा चर्चा झाली होती असं आहे का? तर नक्कीच नाही. त्यापूर्वी धक्कादायक निर्णय घेण्यात, अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात विरोध म्हणून खासदारकीचा राजीनामा देण्यात आणि पुन्हा पोटनिवडणुकीत निवडून येण्यात त्यांचा हात कोणी धरत नसे. यासह अनेक कारणांनी केसीआर हे नाव देशाला परिचीत होते. पण त्यांचे नाव २ जून २०१४ या त्यादिवशी खऱ्या अर्थाने इतिहासात कोरले गेले.

केसीआर यांचे नाव इतिहासात अजरामर होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी तब्बल दीड दशक तेलंगणा राज्याचे आंदोलन चालवलं आणि फक्त चालवलंच असं नाही तर ते यशस्वीसुद्धा करुन दाखविलेलं. हे आंदोलन त्यांनी केवळ इतिहास, साहित्य आणि संगीत या तीन मुद्द्यांवर चालवून दाखवलं होतं. केसीआर यांची ओळख म्हणजे ते कोणतेही आंदोलन मनात आलं आणि सुरु केलं असं म्हणून करत नाहीत. तर ते आपल्या प्रत्येक राजकीय निर्णयाची वैज्ञानिक दृष्ट्या मांडण करतात, अंदाज घेतात आणि मग पुढे पाऊल टाकतात. अगदी मग ते काँग्रेसपासून वेगळं होणं असो किंवा तेलगु देसम पक्षाला रामराम करण किंवा तेलंगणाचं आंदोलन सुरु करणं असो.

१९९६ साली तत्कालिन पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित करताना उत्तराखंडला एक स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देण्याचे संकेत दिले. त्या दरम्यानच्या काळात हैदराबादमध्ये आयटी इंडस्ट्रिज वेगाने पाय पसरत होती. जागतिकीकरणामुळे व्यापार वाढत होता. त्यामुळे आंध्रच्या सीमेवरील लोकांचे हैदराबादमध्ये येणे-जाणे वाढले. नेमकी हिच गोष्ट केसीआर यांनी हेरली. त्याच वर्षी १ नोव्हेंबर रोजी तेलगु भाषेचे प्रचारक आणि तेलंगणाचे पुरस्कर्ते प्राध्यपक जयशंकर यांनी काही लोकांसमवेत वारंगलच्या अन्य एका छोट्या हॉलमध्ये बैठक आयोजित केली. त्या बैठकीला कमीत कमी ५ हजार लोक हजर होते. त्यानंतर अशा बैठकांचा रतीब वाढतच गेला.

अशात २००० सालात आंध्रप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने वीज दरात वाढ केली. त्यावेळी केसीआर यांनी आपल्या पक्षाला एक पत्र लिहिले. त्यावर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगढ या राज्यांची स्थापना झाली. यामुळे केसीआर यांना दोन गोष्टींचा अंदाज आला. एक तर तीन वर्षांच्या बैठकांमुळे लोक आपल्या पाठिशी आहेत आणि दुसरी म्हणजे स्वतंत्र तेलंगणा राज्य मिळवणे ही अशक्य गोष्ट नाही. तेव्हा केसीआर यांनी जेष्ठ नेते इनय्या, जयशंकर आणि तेलंगणाच्या अन्य समर्थकांशी सविस्तर चर्चा केली आणि २७ एप्रिल २००१ ला तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना केली.

पक्षाच्या स्थापनेनंतर २० दिवसांनी म्हणजे १७ मे रोजी करीमनगरमध्ये केसीआर यांनी सिंहगर्जना सभेचे आयोजन केले. या सभेत त्यांनी घोषणा केली की, "मी रक्ताचा एकही थेंब न सांडता केवळ राजकीय आंदोलनातून तेलंगणाची स्थापना करुन दाखवेन. आंदोलनाची सुरुवात केल्यानंतर त्यांना एक गोष्ट पक्की ठावूक होती की आपण तेलंगणा राज्याचे आंदोलन सुरु केले तरी इतिहासाशिवाय ते लोकांचे आंदोलन बनू शकत नाही. तेलंगणा आणि तेलगू भाषेचा इतिहास त्यांची ताकदीची गोष्ट बनली. राज्याच्या कानाकोपऱ्यात जावून ते इतिहास आणि समाजाशी जोडलेल्या गोष्टी सांगून लोकांचे समर्थन गोळा करु लागले. याशिवाय साहित्य विषयातील पदवीधर असलेल्या केसीआर यांनी तेलगु साहित्याचाही वापर केला.

'तेलंगाना वाले जागो, आंध्र वाले भागो' अशा काही घोषणा त्यांनी लिहिल्या. केसीआर यांनी गाण्यांचा देखील खुबीने वापर केला. स्वातंत्र्य लढ्यात ज्याप्रमाणे गाण्यांचा वापर झाला त्याप्रमाणे त्यांनी तेलंगणाच्या निर्मीतीसाठी गाण्याचा वापर केला. स्वतः गाणी लिहण्यास सुरुवात केली आणि लोकांपर्यंत आंदोलन पोहचवण्यासाठी ते स्वतः गाणी म्हणू लागले. लोकप्रियता मिळाल्यानंतर केसीआर यांनी अगदी व्यवस्थितपणे गाण्याची रचना करुन घेतली आणि लोकांपर्यंत पोहचवली. लाखो लोकांपर्यंत त्यांनी तेलंगणाचे आंदोलन पोहचवले.

याव्यतिरिक्त केसीआर यांनी आपली राजकीय ताकद वाढवण्याकडेही लक्ष्य दिले. यासाठी ते कधी काँग्रेससोबत राहिले तर कधी एनडीएच्या गोटात गेले. ते काही काळ केंद्रात डॉ. मनमोहनसिंह यांच्या मंत्रीमंडळात देखील काम केले. पण त्याच तडपेने त्यांनी राजीनामा देखील दिला. तेलंगणा राज्याच्या निर्मीतीनंतर मी माझा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार, तेलंगणाचा पहिला मुख्यमंत्री दलित असणार अशी काही आश्वासनं देखील दिली. पण प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सारं काही क्षम्य असतं असं म्हणत त्यांनी या आश्वासनांना केराची टोपली देखील दाखवली. मात्र तब्बल १४ वर्षांच्या आंदोलनानंतर तेलंगणा राज्य मिळवलेच. आंदोलनाच्या बाबतीत चिवट असलेले केसीआर आता पुन्हा एकदा एक आंदोलन हातात घेत आहेत. पंतप्रधान मोदींना केंद्रातील सत्तेतून हटवण्याच्या इराद्याने ते पुढे आले असून आता गाठी भेटी करत आहेत आता पाहू कितपत यशस्वी होतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT