keshwarao jedhe
keshwarao jedhe Sarkarnama
विशेष

केशवराव जेधेंनी प्रोटोकॉल दाखवत मुख्यमंत्र्यांचे भाषण बंद पाडले होते

सरकारनामा ब्युरो

पुणे : केशवराव जेधे म्हणजे महाराष्ट्राचे सामाजिक चळवळीमधील मोठे नाव. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच सत्यशोधक आणि सामाजिक चळवळींसाठी वाहून घेतले होते. १९१९ ते १९५९ या चाळीस वर्षांचा कालावधीत केशवराव जेधे (keshavrao jedhe) यांनी उभारलेल्या सामाजिक चळवळींमुळे बहुजन समाज राजकारण व समाजकारणाच्या मुख्य प्रवाहात सामील झाला. सत्ता ही प्रामुख्याने शेतकरी- कष्टकरी वर्गाच्या हाती यावी, हेच त्यांच्या कार्याचं ध्येय होते. त्यांच्यामुळेच बहुजन समाज खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात आला. अशा या केशवरांवाबद्दलची एक आठवण दौंडमधील सकाळचे पत्रकार भि.ना.ठाकोर यांनी सांगितली आहे.

स्वातंत्र्यपुर्व काळात केशवराव यांचे दौंड तालुक्यातील पारगाव इथं अनेकदा वास्तव्य होते. सकाळचे पत्रकार भि. ना. ठाकोर व जेधे यांचे घनिष्ठ संबंध होते. जेधे यांचे संयुक्त महाराष्ट्रावरील प्रेम व त्यांच्या निर्भिडपणाबद्दल ठाकोर यांनी एक आठवण सांगितली आहे. पुण्यातील काँग्रेस भवनच्या पटांगणात मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांची जाहीर सभा होती. त्याकाळी गुजरात, मुंबई, महाराष्ट्र अशा तीन प्रदेश काँग्रेस कमिट्या असायच्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते केशवराव होते. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीने जोर धरला होता व मुख्यमंत्री मोरारजी देसाई संयुक्त महाराष्ट्राचे कट्टर विरोधक होते. तर जेधे संयुक्त महाराष्ट्राचा हिरीरीने पुरस्कार करणारे होते. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करणारे व त्याला विरोध करणारे असे दोन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर होते.

याच जाहीर सभेचे केशवराव जेधे अध्यक्ष होते. भाषणात मुख्यमंत्री मोरारजींनी महाराष्ट्राच्या मागणीचा उल्लेख करताच सभेचे अध्यक्ष म्हणून जेधे यांनी तो टाळण्याचे त्यांना सुचविले. पण मोरारजींनी त्यास नकार दिला. ते म्हणाले ''मी मुख्यमंत्री आहे, आणि या प्रश्नावर मी बोलणारच.'' तेव्हा केशवरावही संतापले व मोरारजींना ठणकावून सांगितले की, ''तुम्ही मुख्यमंत्री आहात परंतु आजच्या सभेचा अध्यक्ष मी आहे. अध्यक्ष या नात्याने माझी सूचना तुम्हाला मानावीच लागेल.'' या खडाजंगीतच शेवटी सभेचे काम अर्धवटच संपले. केशवरावांसारख्या अशाच छोट्या-मोठ्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून आज मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आहे.

केशवराव जेधे चरित्र ग्रंथाचे प्रकाशन

ज्येष्ठ साहित्यिक य. दि. फडके लिखित 'देशभक्त केशवराव जेधे' चरित्र ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी (दि. ७) रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर इथे सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती केशवराव जेधे फौंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी दिली. हा चरित्र ग्रंथ म्हणजे य. दि. फडके यांनी १९८२ मध्ये लिहिलेल्या चरित्र ग्रंथाची पुढील आवृत्ती आहे. केशवराव जेधे यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती यंदा साजरी केली जात आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुस्तक प्रकाशन हा यातील महत्वाचा टप्पा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT