Sharad Pawar-Mahadev Jankar Sarkarnama
विशेष

दिल्लीत थोडा धक्का मारा, तुम्ही पंतप्रधान होऊ शकता : जानकरांची पवारांना सूचना

यूपीएच्या अध्यक्षपदासाठी शुभेच्छा देत महादेव जानकर म्हणाले ‘शरद पवारांनी देशाचे पंतप्रधान व्हावे!’

सरकारनामा ब्यूरो

सांगली : ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) देशाचे पंतप्रधान व्हावे, अशी राष्ट्रीय समाज पक्षाची मनापासून इच्छा आहे. गावाशेजारचा माणूस पंतप्रधान म्हणून भेटला, तर आम्हाला आनंद वाटेल. तुमचं आणि मोदी यांचे संबंध चांगले आहेत, हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही थोडा धक्का मारला, तर दिल्लीतसुद्धा हे गाडं बसू शकतंय. सरकार बनू शकतंय, असा आशावाद व्यक्त करून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी पवारांना यूपीएचे अध्यक्ष व्हावे, यासाठीही शुभेच्छा दिल्या. (Mahadev Jankar said Sharad Pawar should be the Prime Minister of the country)

सांगली महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या अहल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण शनिवारी (ता. २ एप्रिल) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात माजी मंत्री महादेव जानकर बोलत होते. जानकर म्हणाले की, माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाला चार राज्यांत मान्यता आहे. आणखी दोन राज्यात मान्यता मिळाल्यानंतर माझा पक्षसुद्धा राष्ट्रीय पक्ष बनणार आहे. पवारसाहेबांना मी उत्तरप्रदेश, गुजरातमधूनही खासदार देऊ शकतो. महाराष्ट्रात तर काळजीच करू नका. आपण दोघं असल्यानंतर रान हाणून नेऊ. काही काळजी करू नये. त्यामुळे अनिल बाबरसाहेब तुम्हीही लवकरात लवकर विचार करा, असे सांगून जानकरांनी थेट शिवसेनेच्या आमदारांनाच ऑफर देऊन टाकली.

ते म्हणाले की, आमचं एक दुर्दैव आहे की, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत धनगर समाजाचा एकही खासदार निवडून आलेला नाही. आयएएस, आयपीएस आणि उद्योगधंद्यातही धनगर समाज दिसून येत नाही, याचाही विचार व्हावा. आपण सर्व काही जाणता. त्यामुळे याची आपण दखल घ्याल, अशी आमची अपेक्षा आहे. धनगर समाजासाठी राज्य सरकारने नऊ योजना लागू कराव्यात, त्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घ्यावा.

धनगर समाजाची नस पवारांना चांगलीच सापडलेली आहे. मी परवा कर्नाटकात गेलो. त्यावेळी तेथील बेल्लारीमध्ये शरद पवार आणि शिवाजीबापू शेंडगे यांनी १९९१ मध्ये एका धनगर समाजाच्या कार्यालयाचे उद्‌घाटन केलेले पहायला मिळाले. त्याच सभागृहात माझ्या पक्षाची बैठक झाली. शरद पवार हे धनगर समाजाला नक्की न्याय देतील. त्यांचा तसा देशभर दरारा आहे. योगायोगाने ते यूपीएचे अध्यक्ष बनले तर फार चांगले होईल. ती आनंदाची गोष्ट ठरेल, त्यासाठीही शुभेच्छा देतो, असेही महादेव जानकर यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT