Mahadev Jankar
Mahadev Jankar Sarkarnama
विशेष

बाप तो बाप असतो...हे कोणी विसरू नये : जानकरांनी नाव न घेता पडळकरांना फटकारले!

सरकारनामा ब्यूरो

सांगली : पवार साहेब (Sharad Pawar), तुम्ही संयमाने देशाचे नेतृत्व केले आहे. अनेकांना तुम्ही नेते केले आहे, आम्हीही केले. तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष आहात. तुमचा पक्ष मोठा आहे. मीही एका छोट्या पक्षाचा अध्यक्ष आहे. मीही दोन-चार आमदारांना जन्म दिला आहे. पण, आम्हाला काही लोक सोडून गेले. पण, ‘बाप तो बाप असतो आणि नेता तो नेता असतो, हे कोणी विसरता कामा नये,’ अशा शब्दांत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, आमदार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी नाव न घेता भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना फटकारले. (Mahadev Jankar slammed Gopichand Padalkar for criticizing Sharad Pawar)

सांगली महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या अहल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण शनिवारी (ता. २ एप्रिल) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात माजी मंत्री महादेव जानकर बोलत होते. ते म्हणाले की, राजमाता अहल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या उद्‌घाटनासाठी शरद पवारांनी वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जयंत पाटील तुम्ही ‘करेक्ट कार्यक्रम’ कारायला महाराष्ट्रात एक नंबरचे हुशार आहात. मी मंत्री होतो, सध्या आमदार आहे, पण या स्मारकासाठी दहा रुपयांची वीटसुद्धा दिली नाही. त्यानंतरही मला कार्यक्रमाला बोलावले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.

धनगर समाजाला एनटीच्या सवलती ह्या शरद पवारांनीच मिळवून दिल्या आहेत. एसटीचे आरक्षण लागू व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न केले. ‘एसटी’साठीचा टाटा कन्स्लटन्सीचा अहवाल निर्माण करण्यात मीही होतो. मात्र, त्यात आम्हाला अपयश आले. त्यानंतर एसटी समाजाच्या १३ योजना धनगरांना लागू कराव्यात; म्हणून मीच समिती स्थापन करायला लावली. त्यासाठी मागच्या सरकारने १००० कोटी दिले. मात्र, आचारसंहितेमुळे ते वापरता आले नाहीत. त्यात आणखी एक हजार कोटी घालून समाजाला एसटीच्या योजना लागू कराव्यात, त्यातून समाजाचा विकास होईल. हे तुम्ही करू शकाल, हा आम्हाला विश्वास आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना सांगून तुम्ही ते करून घ्याल, अशी खात्री आम्हाला आहे. तसेच आमच्या विष्णू माने यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटलांना घोंगडं घातलं आहे, तेही हे काम करून घेतील, अशी मागणी जानकर यांनी या वेळी बोलताना केली.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती. त्यासंदर्भात बोलताना महादेव जानकर म्हणाले की, सक्षणा सलगर नाव घेऊन कोणाला मोठं करायचं नसतं. माणूस हा कर्माने मोठा होतो. महादेव जानकर हे त्याचे उदाहरण आहे. माणूस नेहमी कष्टाने मोठा होत असतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT