Eknath Shinde 2 Sarkarnama
विशेष

Maharashtra Government Formation LIVE Updates : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, सूत्रांची माहिती

Who is the CM of Maharashtra : राज्यात महायुती सरकार सत्तास्थापनेचा शपथविधी सोहळा उद्या होत आहे. देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

Pradeep Pendhare

Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, सूत्रांची माहिती

देवेंद्र फडणवीस यांची मनधरणी कामाला आली. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याची सूत्रांनी माहिती दिली. राज्यपाल यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर सस्पेन्स कायम ठेवत सायंकाळपर्यंत निर्णय घेऊ, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. यानंतर वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या आमदारांची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक झाली. यात एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहण्याचे संकेत दिले असून, उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Mahayuti Government Formation : फडणवीस, शिंदे आणि पवार यांची खातेवाटपावर तातडीची महत्त्वपूर्ण बैठक

राज्यपाल यांची भेट घेत महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा नेत्यांनी केला. या भेटीनंतर महायुतीमधील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. महायुतीचे नेते राजभवनातून बाहेर पडल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी पुन्हा तिन्ही नेत्यांची बैठक होणार असल्याचे सांगितले. ही बैठक वर्षा बंगल्यावर होणार असून, तिथे खातेवाटपावर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेमध्ये गृहमंत्रिपदावरून कलह आहे. यावर तोडगा निघेल, अशी सकारात्मक बैठक होईल, असे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असे भाजप वारंवार म्हणत आहे.

Eknath Shinde : शिंदेंनी मंत्रिमंडळातील सहभागाचा सस्पेन्स वाढवला

'देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी शिफारस करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. लाडकी बहीण, भाऊ, शेतकरी आणि कल्याणकारी योजनांचा राबवताना टीम म्हणून काम केले. आम्ही गेल्या अडीच वर्षात टीम म्हणून काम करताना, 'हा लहान भाऊ, हा मोठा भाऊ', असे कधीही केले नाही', असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, काम करताना घेतलेले सर्व निर्णय ऐतिहासिक ठरले. तसेच मला भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले, हा त्यांचा मोठेपणा आहे, असे सांगून देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या सहभागी होण्याच्या आवाहनाला शिंदेंनी वेटींगवर ठेवले. यामुळे शिंदे मंत्रिमंडळात राहणार का? याचा सस्पेन्स कायम राहिला आहे. पण सायंकाळपर्यंत याबाबत निर्णय घेऊ, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Ajit Pawar : अजितदादांनी दिल्लीला जाण्याचे कारण सांगितले

'मी दिल्लीला अमित शाह यांना भेटायला गेलो नव्हतो', असे सांगून दिल्लीला कोणत्या कारणासाठी गेलो याची माहिती अजित पवार यांनी दिली. राज्यपाल यांच्याकडे महायुती सरकारच्या सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर तिन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दिल्ली अमित शाह यांना भेटण्यासाठी गेलो नसल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या सदस्य आहेत. त्यांना दिल्लीत बंगला मिळाला आहे. तो पाहण्यासाठी गेलो होतो. तसेच न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दाखल खटल्यासंदर्भात माहिती घेतली. खटला सुरू झाल्यापासून वकिलांना भेटलो नसल्याचेही त्यांची देखील भेट घेतली, असे अजित पवार यांनी सांगितले.

Mahayuti Government Formation : एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळात राहण्याची फडणवीस यांची विनंती

'महायुती सरकार म्हणजे, एक मोठी महायुती आहे. या सगळ्यांच्या सहीच पत्र राज्यपालांकडे दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी माझ्या समर्थनात पत्र दिले आहे. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी करावा', अशी विनंती त्यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रात केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्याचप्रमाणे अजित पवार यांनी देखील त्याच आशयाचे पत्र दिल्याचे फडणवीस यांना सांगितले आहे. तसेच या सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवून राज्यपालांनी निमंत्रित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित शपथविधी सोहळा उद्या सायंकाळी होईल. किती जणांचा शपथ होणार, याची माहिती सायंकाळी दिली जाणार आहे. आम्ही तिघही एकत्रित निर्णय घेत आलो आहोत. पुढंही तसेच निर्णय होतील. एकनाथ शिंदे यांना विनंती केली की, त्यांनी मंत्रिमंडळात राहावं, असे फडणवीस यांनी राज्यपाल यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

Mahayuti Government Formation : महायुतीकडून फडणवीस, शिंदे अन् पवार यांचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महायुतीमधील भाजप नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार तिन्ही नेत्यांनी भेट घेत महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा दावा केला. राज्यपाल यांची भेट घेत महायुतीकडे सत्तास्थापनेसाठी असलेल्या आमदारांच्या संख्याबळाचे पत्र तिन्ही नेत्यांनी दिले. यावेळी प्रफुल्ल पटेल, रावसाहेब दानवे, उदय सामंत उपस्थित होते. पक्षनिरीक्षक निर्मला सीतारामन, विजय रुपाणी, विनोद तावडे, धनंजय मुंडे उपस्थित होते. महायुती सरकारचा उद्या पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होईल. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल.

Rahul Narwekar : राहुल नार्वेकर भाजपच्या 'गुड बुक'मध्ये '; पुन्हा विधानसभेच्या अध्यक्षपदी संधी?

भाजपच्या गुड बुकमध्ये असलेले राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी संधी मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्यावर सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या काळात राहुल नार्वेकर यांना विधानसभेच्या अध्यक्षपदी संधी मिळाली होती. त्यांच्या हा काळात त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवर निर्णय दिला. एकप्रकारने हा काळ त्यांच्यासाठी विधिमंडळाच्या नियमांनी कसोटी पाहणारा ठरला. यात ते यशस्वी झाले. त्यामुळे ते भाजपच्या 'गुड बुक'मध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होताच, राहुल नार्वेकर यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेत आले आहे.

Devendra Fadnavis : तीन नेत्यांची बैठक

भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर गेले आहेत. तिथे थोड्याच वेळात अजित पवारही दाखल होतील. उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. प्रामुख्याने मंत्रिपदावरून या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेना अजूनही गृहमंत्री पदावर ठाम असल्याने आजच्या बैठकीत त्यावर तोडगा निघणार का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Maharashtra CM : आजच सत्तास्थापनेचा दावा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस गुरूवारी शपथ घेतील. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. त्याआधी आज दुपारी 3.30 वाजता सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे इतर नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील. त्यानंतर शपथविधीचा मार्ग मोकळा होईल.

Sanjay Shirsat : आम्हाला गृहमंत्रीपद मिळाले पाहिजे

भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेतापदी बिनविरोध निवड झाली. यानंतर ते लगेचच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी गृहमंत्रिपदावर पुन्हा भाष्य केले. ते म्हणाले, "महायुतीमुळे महाराष्ट्राची भरभराट होणार आहे. आम्हाला गृहमंत्रीपद मिळाले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांना आमचे नेहमीच सहकार्य राहील". दरम्यान, देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर पोचणार आहे. तिथे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत खाते वाटपावर महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Uday Samant : एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, हा आमचा हट्ट

शिवसेना पक्ष आणि आमच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन आणि त्यांच्या राजकीय वाटचालीचे कौतुक आहे. एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन ते राज्यात यशस्वी आणि जोरात घोडदौड करतील. शपथविधीला सोहळ्याला उशीर होण्याचा काही संबंध नाही. एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील, तो मान्य असेल. शिंदे यांनी सरकारमध्ये आले पाहिजे. उपमुख्यमंत्रिपद घेऊन सरकारमध्ये राहिले पाहिजे. हा आमचा एकनाथ शिंदे यांच्याकडे हट्ट आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis CM of Maharashtra : फडणवीसांनी मानले मोदींचे आभार

भाजपचे गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आपण ज्या प्रक्रियेतून निवडणूक येतो त्या प्रक्रिया म्हणजे राज्य घटना. त्या राज्य घटनेला 75 वर्ष पूर्ण झाले आहे. या संविधाने प्रत्येकाला स्वतंत्र्यपणे जगण्याचा हक्क दिला, त्या संविधानाचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. आम्हाला जो जनादेश मिळाला आहे त्याचे समाधान आहे. त्यामुळे या जनादेशाच्या मागण्यांना प्राधान्य देणार आहोत. महाराष्ट्राला पुढे येण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागेल. 2019 जनतेने महायुतीला कौल दिला होता. पण त्याच्याशी काहींनी बेईनामी केली. अडीच वर्षांच्या काळाच आमचा एकही आमदार सोडून गेला नाही, एका सामान्य कार्यकर्त्यांला तीनवेळा मोदींनी मुख्यमंत्री होण्याची संधी दिली, असे सांगून त्यांनी मोदींचे आभार मानले.

Devendra Fadnavis : विधिमंडळ बैठकीत विजय रुपाणींनी फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं थेट जाहीर केलं

भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर गटनेतेपदाचा शिक्कामोर्तब झाला. यानंतर पक्षनिरीक्षक विजय रुपाणी यांनी उभं राहून फडणवीस उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे जाहीर केले. पक्ष निरीक्षकांकडून विधिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांचे नाव जाहीर करताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जल्लोष सुरू केला. विधानभवन परिसरात लाडू वाटण्यात आले.

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

कोअर कमिटीच्या बैठकीनंतर विधिमंडळ बैठकीत देखील देवेंद्र फडणवीस यांच्या गटनेतापदावर शिक्कामोर्तब झाला. विधिमंडळाच्या बैठकीत देखील शिक्कामोर्तब होताच, फडणवीस यांचे नाव सीएम पदासाठी देखील निश्चित झाले आहे. उद्याच्या सत्तास्थापनेच्या सोहळ्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ फडणवीस घेणार असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. विधानभवनातील सेंट्रल सभागृहात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. पक्षनिरीक्षक म्हणून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन उपस्थित होते. भाजप आमदारांनी बैठकीला येताच, माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना फडणवीस मनातील मुख्यमंत्री असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

Devendra Fadnavis : भाजपच्या गटनेतापदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब

मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठक झाली. यानंतर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी भाजपचे आमदार विधानभवनात दाखल झाले. पक्षनिरीक्षक म्हणून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन उपस्थित होते. कोअर कमिटीच्या बैठकीत गटनेतापदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आता विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू होत असून, यात फडणवीस यांच्या गटनेतापदाचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील मांडणार आहे, तर या प्रस्तावाला आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण अनुमोदन देणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर दुपारी तीन वाजता राज्यपाल यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा भाजपकडून केला जाणार आहे.

Mahayuti IMP Meeting : सत्तास्थापनेपूर्वी फडणवीस, शिंदे आणि पवार यांची महत्त्वाची बैठक होणार

सत्तास्थापनेचा दावा करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची महत्त्वपूर्ण बैठक आज दुपारी दोन वाजता होणार आहे. ही बैठक वर्षा निवासस्थानी होईल. या बैठकीत संभाव्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची चर्चा होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेलेले अजित पवार मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Sukhbir Singh Badal : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबाराचा प्रयत्न झाला. गोळीबारात बादल थोडक्यात बचावले आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना घेरल्यामुळे बादल बचावले. अकाल तख्त येथे शिक्षा भोगण्यासाठी बादल सकाळीच पोचले होते. ते क्लॉक टॉवरच्या बाहेर भाला धरून बसले होते, त्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यामुळे सुवर्ण मंदिराबाहेर खळबळ उडाली आहे.

BJP Party Meeting : भाजपचे पक्षनिरीक्षक विधानभवनात लवकरच दाखल होणार

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला मुंबईत थोड्याच वेळात सुरवात होत आहे. या बैठकीनंतर भाजपचे पक्षनिरीक्षकांच्या उपस्थित विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. पक्षनिरीक्षक म्हणून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन असणार आहेत. बैठकीसाठी भाजप आमदार पोचण्यास सुरवात झाली आहे. नालासोपारा इथले आमदार राजन नाईक यांनी लोकलने प्रवास करत बैठकीला रवाना झाले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे देखील कोअर कमिटीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे, प्रवीण दरेकर, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा आदी भाजपचे नेते विधानभवनात पोचत आहेत.

Sanjay Raut : भाजप सरकार आल्यानंतर मुंबईत दादागिरी सुरू झाली; मराठी माणसाला धमक्या, सरकार गप्प कसे?

बहुमत मिळून देखील महायुतीला सरकार स्थापन करू शकलेले नाही. भाजपला महाराष्ट्रात सरकार बनवणं कठीण जात आहे. सरकार बनवणं कठीण होत असेल, तर राज्य कसे चालवणार? असा टोला संजय राऊत यांनी महायुतीला लगावला. याशिवाय भाजपचं सरकार आल्यानंतर मुंबईत दादागिरी सुरू झाली आहे. अमराठी माणूस मराठी माणसाला धमक्या देत आहेत. महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाला धमक्या दिल्या जात आहेत. मराठी माणसासाठी हे चित्र भयानक आहे. मराठी माणसांवर अन्याय होत असताना, हे सत्ताधारी गप्प कसे? आम्ही कधी अन्य भाषिकांना धमक्या दिल्या नाहीत. आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रासाठी लढत राहू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे महायुती सरकारच्या शपथविधीचे अडथळे दूर झाले आहेत. गृहमंत्रालय मिळत नसल्याने नाराज असलेल्या शिंदे यांची समजूत काढण्यात फडणवीस यशस्वी झाले. भाजप-शिवसेनेकडून याबाबत अधिकृत वक्तव्य करण्यात आले नाही. या भेटीनंतर मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद स्वीकारायला तयार झालेले आहेत. याशिवाय एकनाथ शिंदे यांना आणखी किती खाते मिळणार याची चर्चा रंगली आहे.

Mahayuti Government Formation : उद्या फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार

महायुती सरकार स्थापनेच्या शपथविधी सोहळा उद्या मुंबईतील आझाद मैदानावर होत असून, यात फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळेसाठीच मुंबईत थांबणार आहेत. त्यामुळे हे नियोजन करण्यात आले आहे. नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडेल. इतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा राजभवनात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Uddhav Thackeray : अपप्रचार मोडून काढा, हिंदुत्वाची मशाल घरोघरी पोचवा

हिंदुत्वाच्या मुद्दा सोडला, असा महायुतीकडून अपप्रचार होत आहे. त्याला उत्तर देण्याची मागणी शिवसेनायुबीटी पक्षाच्या माजी नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली. हा अपप्रचार मोडून काढण्यासाठी चोख प्रत्युत्तर देण्याच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीवर, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा हिंदुत्वाचा लढा आज आणि उद्या कायम राहणार असल्याचे सांगितले. शिवसेनेच्या हिंदुत्वाची मशाल महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने घरोघरी पोचवा. हिंदुत्वासाठी शिवसेना आजही लढत आहे आणि उद्याही लढत राहणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Mahayuti Government Formation : शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींसह 19 प्रमुख नेते उपस्थित राहणार

भाजप महायुतीच्या शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर होणार असून, पाच हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसह 22 ते 24 मंत्री शपथ घेतील, अशी सूत्रांची माहिती आहे.

Mahayuti Government Formation : भाजप महायुतीच्या सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे करणार

भाजप महायुतीच्या सत्तास्थापनेचा दावा करण्याची तयारी विधिमंडळाच्या बैठकीनंतर लगेच करणार आहे. यासाठी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची आज दुपारी साडेतीन वाजता भेट घेणार आहे. महायुतीमधील प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

BJP Party Meeting : भाजप विधिमंडळ नेतानिवडीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

भाजप विधिमंडळ पक्षाची आज बैठक होणार असून, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे संकेत आहेत. या बैठकीनंतर महायुतीकडून राज्यपालांची भेट घेऊन सत्तस्थापनेसाठी दावा केला जाणार आहे. त्यामुळे भाजप विधिमंडळ नेतानिवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT