MBA Admission : महाराष्ट्र शासनाने MBA अर्थात मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन कोर्सबाबत काढलेल्या एका शासन निर्णयाचा (GR) चा पुण्यातील तरुणाला मोठा फटका बसला आहे. नामांकित कंपनीने पीडित तरुणाला कंपनीचे धोरण म्हणून थेट कामावरच घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता या तरुणावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाने 2024 मध्ये BE, B.Tech केलेल्या विद्यार्थ्यांना Lateral Entry द्वारे MBA द्वितीय वर्षास प्रवेश घेता येईल असा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, संबंधित विद्यार्थ्यांने 2 वर्षांच्या फुलटाईम कोर्सला घेतलेला प्रवेश रद्द केला आणि Lateral Entry साठी CET परीक्षा दिली. महाराष्ट्रातील हजारो मुलांनी ही परीक्षा दिली होती.
या परीक्षेत पीडित विद्यार्थ्याने उत्तम गुण मिळवले. त्यानुसार त्याला पुण्यातील नामांकित महाविद्यालयात प्रवेशही मिळाला. तिथे त्याने दुसरे वर्ष चांगल्या गुणांनी पूर्ण केले. या दरम्यान, त्याने या नामांकित कंपनीचा कॅम्पस इंटरव्हूव आणि परीक्षा दिली. तिथेही त्याची निवडही झाली. पण जून महिन्यात पीडित तरुणाला 2 वर्षांचा पूर्णवेळ MBA अभ्यासक्रम पूर्ण न केल्याने जॉईन करून घेत नसल्याचे कंपनीने मेलद्वारे कळवले.
याबाबत 'सरकारनामाने' संबंधित कंपनीच्या एचआर विभागाची बाजू समजून घेतली. ते म्हणाले, "आम्ही यापूर्वीही त्या तरुणाला सांगितलं आहे, त्यांना मेलमध्येही अधिकृतपणे कळवलेही आहे. आमच्या कंपनीचीही काही धोरणं आहेत. जरी शासन निर्णय असला आणि त्याने पूर्ण केलेला कोर्स 2 वर्षांच्या बरोबरीचा समजला जाणारा असला तरीही आम्हाला 2 वर्षांचा पूर्णवेळ MBA अभ्यासक्रम पूर्ण करणाराच उमेदवार हवा आहे".
या मेलनंतर मागील दोन महिन्यांपासून पीडित तरुण संबंधित कंपनीला पत्र लिहून 2024 मधील शासन निर्णयाबाबत अवगत करत आहे. यानुसारच आपण सीईटी देऊन प्रवेश घेतला आणि अभ्यासक्रम पूर्ण केला हे सांगत आहे. मात्र कंपनीकडून त्याला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्याने 'सरकारना'मासोबत बोलताना सांगितले.
पीडित तरुणाच्या वडिलांनी याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतली. त्यांच्या कानावर हा संपूर्ण प्रकार घातला. पाटील यांनी या संबंधित सर्व कागदपत्रे स्वतःकडे घेतली असून याबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र एका शासन निर्णयाचा या तरुणाला जबरदस्त फटका बसला असून त्यावर आता केवळ पश्चातापाची वेळ आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.