राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह बाबत सुप्रीम कोर्टात १७ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाने दाखल केली आहे याचिका. कोर्टाने जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी बजावणारा माणूस आणि NCP शरदचंद्र पवार पक्ष हे नाव कायम ठेवण्यास परवानगी दिली आहे.
तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केले नव्हते. म्हणून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सुनावणी होणार आहे.
आरबीआयच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मल्होत्रा पुढील तीन वर्ष गव्हर्नरपदावर असणार आहे. शिशिकांत दास यांच्याकडून संजय मल्होत्रा आरबीआयच्या गव्हर्नपदाचा कार्यभार स्वीकारतील
राज्यपाल भाषणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी बहिष्कार टाकला आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी देखील शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सभागृहात नव्हते.आमदारांच्या शपथविधी वेळी देखील शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आक्रमक होते. विशेष अधिवेशानाच्या पहिल्या दिवशी 'मविआ'तील आमदारांनी शपथ घेतली नव्हती.
महाराष्ट्र सरकारचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मताने मंजूर झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते उदय सामंत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रसचे दिलीप वळसे-पाटील, भाजप आमदार संजय कुटे आणि आमदार रवी राणा यांनी सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडला होता. यावेळी आवाजी मताने विश्वास दर्शक ठराव मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास करत आहे, अशा पद्धतीनं हा ठराव मांडण्यात आला. विधानसभा निवडणुकीत मुहायुतीच्या 288 पैकी 232 जागा निवडून आल्या आहेत. यात 132 जागा या एकट्या भाजपला मिळाल्या आहे. महायुतीकडे मोठ्या प्रमाणात आमदारांची संख्या असल्यामुळं सरकारचा विश्वासदर्शर ठराव आवाजी मताने मंजूर झाला आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भाजप सत्ताधारी आणि विरोधक काँग्रेस आमने-सामने आलेत. अमेरिकेतील उद्योगपती जाॅर्ज सोरोस यांच्या फाऊंडेशनबरोबर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे व्यवहारीक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जाॅर्ज यांच्या फांऊडेशनवर भारतातील जम्मू-काश्मीरला वेगळ्या करण्याच्या हालचालींना आर्थिक बळ पुरवल्या जात आरोप आहे. या फाऊंडेशनची संबंध म्हणजे, विदेश शक्तींना देशाविरोधी कारवायांना मदत करण्यासारखे आहे, असा गंभीर आरोप भाजपने त्यांच्या समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत केला आहे. यावरून संसदेत गोंधळ उडाला आहे.
रोहित पाटील म्हणाले, "देशात अनेक शाह्या पाहिल्या, पण त्यात लोकशाही सर्वांत मोठी वाट्याला आली. यातून देशाचं वेगळंपण उठून आणि टिकवू शकलं. त्यामुळे संसदीय पद्धतीत लोकशाहीचे वेगळेपण महत्त्वाचे ठरते. मंत्रिमंडळातील सर्वात युवा सदस्य म्हणून माझ्याकडे लक्ष असेल". मी देखील वकिली पूर्ण करतो आहे. एक नंबरवरच्या बाकावर असलेल्या वकिलाला जुशी तुम्ही मदत करता, तशीच मलाही मदत कराल, असेही रोहित पाटील यंनी म्हटले.
विधान परिषदेचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आलं आहे. चारचाकी वाहनातून आलेल्या चौघा जणांनी त्यांचं अपहरण केल्याची माहिती मिळते. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. सतीश वाघ हे आज सकाळच्या सुमारास सोलापूर रस्त्यावरील ब्लू बेरी हॉटेलसमोर थांबले होते. यावेळी अचानक एक चारचाकी गाडी त्यांच्या समोर येऊन थांबली. वाघ यांना जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, पुन्हा येईन ते पुन्हा आले, त्यांचेही अभिनंदन. मी म्हणालो होतो. 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आले नाही, तर शेती करायला जाईन. 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आले आहे. अजितदादांचे, आमदार म्हणजे, बोनस ठरला. आता आमच्याकडे 237 आमदार आहेत. 'कर नाही, त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर', असे शिंदेंनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सर्वांना हसू आले. या शायरीनंतर, रामदास आठवले आणि माझी आता युती झाल्याचं मिश्किल विधानही एकनाथ शिंदेंनी केले.
विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. यावर सभागृहाने एकमताने नार्वेकर यांच्या निवडीला संमती दिली. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी नार्वेकर यांचे स्वागत केले. राहुल नार्वेकर यांना मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षाच्या आसनाजवळ सन्मानानं नेलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नार्वेकर यांच्या आसनाजवळ जात अभिनंदन केले. राहुल नार्वेकर यांनी गेल्या पंचवार्षिकला शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीवर निकाल दिल्याने ते सर्वाधिक चर्चेत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते उदय सामंत आणि काही पदाधिकारी बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या मराठी भाषिक महामेळाव्याला जाणार आहेत. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नेते संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. "एकनाथ शिंदे कधीही बेळगाव गेले नाहीत. मंत्री असताना शिंदे यांच्याकडे सीमाभागाची विशेष जबाबदारी होती. अटक होईल, या भीतीने ते कधीही बेळगावला गेले नाहीत. शिंदेंनी कधीही बेळगावमधील मराठी जनतेकडे पाहिले नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे राज्य आहे, ही पळवाट नाही, असे सांगून बेळगावमधील मराठी भाषिकांच्या मागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठामपणे उभा आहे आणि तिथं आमचे शिवसैनिक महामेळाव्यात सहभागी होतील, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले.
शिवसेना आमदार संजय राठोड यांची मंत्रिमंडळाता वर्णी लागू नये म्हणून कटकारस्थान सुरू असल्याचा आरोप दिग्रसमधील बंजारा समाजाचे महंत यांनी केला आहे. शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचा प्रगती पुस्तक तयार झाले आहे. दोन मंत्र्यांचे पत्ते कट होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर पाच जणांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार संजय राठोड आणि आमदार अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने योजनेद्वारे बहिणींनी पैसे दिले. आता याच योजनेची पडताळणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावरून संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. लाडकी बहीण योजनेकडे आमचे बारीक लक्ष आहे. ज्यांना पैसे दिले आहेत, त्यांचे पैसे काढून घेऊ नका. लाडकी बहाणी योजनेत सुरवातीला काहीही शहानिशा न करता प्रत्येकी दीड हजार रुपये दिले. याच दीड हजार रुपयांनी बहिणींची मते विकत घेतली. आता या योजनेची पडताळणी करून बहिणीचे पैसे काढून घेऊ नका, असा घणाघात संजय राऊत यांनी महायुती सरकारवर केला.
पुण्यातील महाविकास आघाडीतील सर्व पराभूत उमेदवार आज दिल्लीला जाणार असून तिथं दिल्ली सर्वोच्च न्यायालयात 'ईव्हीएम'विरोधात याचिका दाखल करणार आहेत. दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयातील वकिलांची भेट घेऊन, सविस्तर चर्चा करून याचिका दाखल करणार आहेत.
महायुती सरकारमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला दहा कॅबिनेट आणि तीन राज्य मंत्रिपदे मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. महायुतीमधील नेत्यांची वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
भाजपचे कुलाबा मुंबईतील आमदार अॅड. राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड होणार आहे. या पदासाठी त्यांनी काल रविवारी अर्ज भरला होता. त्यांचा एकट्याचा अर्ज असल्याने या पदावर त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे निश्चित झाले आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.