देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ आझाद मैदानावर घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल चार हजार पोलिस तैनात होते मात्र तरी देखील ४ महिलांसह ११ जणांच्या सोन्याच्या चैनींवर चोरांनी डल्ला मारला. तर, कार्यकर्त्यांची हजारोंची रोकड घेऊन चोरून चोर पसार झाले, या सोहळ्यात तब्बल 12 लाख रुपयांचे ऐवज चोरट्यांनी लंपास केला तर अनेकांच्या मोबाईलवर देखील चोरांनी मारला डल्ला
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 79 लाख मते आहेत तर 57 जागा आहेत. तर, काँग्रेसला 80 लाख मतं आणि 16 जागा आहेत. तर, शरद पवार गटाला 72 लाख मते आणि दहा जागा आहेत. अजित पवार गटाला 58 लाख मतं आणि 41 जागा आहेत. हे आश्चर्यकारक आहे. असं कॅलक्यूलेशन आहे, आम्ही याच्या खोलात गेलेलो नाही. जोपर्यंत आमच्याकडे आधार नाही, तोपर्यंत याच्यावर भाष्य करणे योग्य नाही, असे शरद पवार म्हणाले
मोठी राज्य आहेत तिथं भाजप आणि छोट्या राज्यात आम्ही आहोत. काँग्रेसला 80 लाख मतं असून, त्यांचे 16 उमेदवार निवडून आले आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 58 लाख मतं असून, त्यांचे 41 उमेदवार निवडून आले आहेत. ही सर्व आकडेवारी आश्चर्यकारक करणारी आहे. शंकांचे निरासन करण्यासाठी ग्रामस्थांनी मतदान करून पाहिल्यास त्यावर बंदी कशाला? त्यांच्यावर बंदी घालण्याचं कारण काय? मारकडवाडी ग्रामस्थांशी यामुळेच आम्ही चर्चा करणार आहोत. मी आयुष्यात 14 निवडणुका लढलो आहे. त्यामुळे मला कधीही पराभवाची चिंता वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
'शपथ न घेऊन महाविकास आघाडी आणि त्यांच्या आमदारांनी लोकशाहीचा अपमान केला आहे', अशी टीका भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ईव्हीएम घोटाळ्यातून जनतेचा अवमान झाला आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही आज शपथविधी घेणार नसल्याचा निर्णय महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेस नाना पटोले, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितला होता. या शपथविधीवरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये जुंपली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवाचं दर्शनासाठी भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील पिचड यांच्या अत्यंदर्शनासाठी गेले होते. पिचड यांच्या पार्थिवावर सायंकाळी अत्यंसंस्कार होणार आहेत. राज्यभरातील प्रमुख नेते पिचड यांच्या अंत्यदर्शनासाठी अकोले तालुक्यातील राजूर इथल्या निवासस्थानी पोचले होते.
'विरोधी पक्षाच्या नेत्याची निवड कोणत्या नियमानुसार आणि कायद्यानुसार केली जाते, याची माहिती पत्राद्वारे मागितली होती. यासंदर्भातील माहिती आज सुरू असलेल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील विधिमंडळ प्रशासनाकडे मागितली होती. त्यावर मुख्य सचिवांकडून अद्याप उत्तर मिळालेले नाही. पण माझ्या अभ्यासानुसार, नियमानुसार आणि माहिती असलेल्या कायद्यानुसार हे पद सत्ताधारी सरकारला देणे बंधनकारक आहे आणि हा नैसर्गिक न्याय ठरेल', असे 'शिवसेनायुबीटी' पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. विरोधात सर्वाधिक आमदार 'शिवसेनायुबीटी'चे पक्षाचे आहे. त्यामुळे नैसर्गिक न्यायानुसार हे पद 'शिवसेनायुबीटी' पक्षाकडे येते, असेही आमदार जाधव यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे नेते आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेटीसाठी दाखल झाले. मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या भूमिकेवर इथं चर्चा करणार असून, 'ईव्हीएम' विरोधात राहुल गांधी मारकडवाडी गावातून लाँग मार्च काढत असल्याची माहिती देणार आहेत. तसंच शरद पवार देखील या गावाला भेट देणार आहेत. यानंतर महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची देखील भेट घेणार आहेत. राहुल गांधी काढत असलेल्या लाँग मार्चमध्ये उद्धव ठाकरे देखील सहभागी होऊ शकतात, अशी माहिती 'शिवसेनायुबीटी'च्या नेत्यांनी दिली.
विधानपरिषदेचे महायुतीचे सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदे होण्याची शक्यता आहे. सध्या देवेंद्र फडणवीस हे विधानपरिषदेचे सभागृह नेता आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री हा दोन्ही सभागृहाचा नेता असतो. कामकाजाच्या सोयीसाठी हे पद नियमानुसार मंत्री महोदयाकडे जाऊ शकते. शिंदे हे मंत्री झाल्यावर विधानपरिषद सभागृहातील कामकाजात त्यांना सहभागी होता येईल. परंतु त्यांना मतदानाचा अधिकार नसेल. प्रोटोकाॅलनुसार महायुती सरकारमध्ये एक नंबरला देवेंद्र फडणवीस आहेत. त्यानंतर दोन नंबरला एकनाथ शिंदे आणि तीन नंबरला अजित पवार आहेत. एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या क्रमांकावर शपथ घेतली आहे. त्यानुसार त्यांच्याकडे हे पद गेल्यास काही वावगं ठरत नाही.
'आम्ही काहीतरी वेगळं करतोय, असे जनतेला भासवण्यासाठी विरोधकांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. अस्तित्व दाखवण्याचा हा प्रकार आहे. परंतु त्यांना उद्या सायंकाळपर्यंत नियमानुसार शपथ घ्यावीच लागले. तसं केले, तर सभागृहातील कामकाजात सहभागी होता येईल', असे अजित पवार यांनी विरोधकांना सुनावले. अजित पवार यांच्यासह त्यांच्या 41 आमदारांनी शपथ घेतली. यावेळी सर्व आमदार गुलाबी रंगाचे फेटे घालून पोचले होते. विरोधकांनी ईव्हीएमला दोष देण्यात काहीच अर्थ नाही.
'भाजप असा पक्ष आहे की, त्यांच्या घरात पोचले की, भ्रष्टाचाराचे डाग पुसून जातात. भाजपपासून दूर राहिल्यास, समोरचा भ्रष्टाचारी दिसतो', असा टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची जप्त केलेली मालमत्ता परत देण्याच्या निर्णय आयकर विभागाने घेतला. विधानभवनात शपथविधी सोहळ्यावेळीच हा निर्णय झाल्याने विरोधकांनी भाजपवर टीका केली, तर महायुतीकडून हा शुभसंकेत असल्याचे म्हटले आहे.
विरोधक आज विधिमंडळ सदस्याची शपथ घेणार नसल्याची माहिती समोर आली. विरोधकांची अंबादास दानवे यांच्या दालनात विरोधक आमदारांची बैठक झाली. या बैठकीत आज शपथ न घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसंच महायुती सरकारला मिळालेले बहुमत हे जनता, निवडणूक आयोग की ईव्हीएमने याबाबत संभ्रम आहे. मारकडवाडीतील जनतेने माॅकपोल मागितला होता. त्यावर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला नाही. उलट मारकडवाडीमधील ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. आता काही जणांना अटक देखील सुरू आहे. जनतेचा मान राखून आज आम्ही शपथ घेणार नाही. लोकशाही चिरडण्याचे काम सुरू आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आणि ईव्हीएमविरोधात आम्ही लाँग मार्च काढून निषेध करत आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
महायुतीमध्ये असलेल्या प्रमुख पक्षांचे नेते एकत्र बसून खातेवाटपाचा निर्णय घेतला जाईल. गृह, महसूल खात्याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. खातेवाटपासंदर्भात बसून निर्णय होईल, यात कोणताही मतभेद नाही, असे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.
'लोकशाही झिंदाबाद, आय लव्ह मारकडवाडी', असे पोस्टर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवन परिसरात झळकवले. 'ईव्हीएम'च्या विरोधात मतदान आंदोलन करणाऱ्या मारकडवाडीचा जितेंद्र आव्हाड यांनी गौरव केला.
एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी निवडणूक आयोगाला चॅलेंज केले आहे. निवडणूक आयोगाने पंधरा दिवसात पोटनिवडणूक घेतो, असे पत्र द्यावे. मी लगेच राजीनामा देतो आणि निवडणूक आयागोने ही निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी प्रतिक्रिया उत्तम जानकर यांनी दिली. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मतदारांनी निषेध नोंदवला आहे. मतदारांनी आम्हाला इथं पाठवलेलं आहे. त्यांच्याविषयी आमची देखील जबाबदारी आहे. त्यांच्या मताला किंमत आहे की नाही? असा सवाल उपस्थित करत, शपथविधीवर बहिष्कार घातलेला नाही. आम्ही सभागृहात होतो. राष्ट्रगीत, राज्यगीतासाठी उभं राहिलो. आता विरोधक आमदारांची बैठक होईल आणि पुढचा निर्णय होईल, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार सुनील प्रभू यांनी म्हटले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्या दालनात विरोधकांची बैठक सुरू झाली आहे.
विधानभवनात विशेष अधिवेशन सुरू असून, सत्ताधारी पक्षाचे आमदार, आज पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेत आहेत. विधानभवनात हंगामी अध्यक्ष आमदारांना शपथ देत आहेत. परंतु विरोधी पक्षांनी सभात्याग करत, विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. शपथविधी घेताना नाना पटोले यांचे नाव हंगामी अध्यक्षांनी पुकारले होते. परंतु ते व्यासपीठावर गेले नाहीत. यानंतर सर्व विरोधी आमदार विधानभवन परिसरात एकत्र आले आणि आज शपथ घेणार नाही, असे जाहीर केले. तसेच शपथविधीला विरोध नाही, पण ईव्हीएमचा निषेध करत आहोत, असेही विरोधकांनी म्हटले आहे.
विधानभवनात आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होत असून, राज्यातील 288 आमदार तिथं पोचले आहेत. महायुतीमधील प्रमुख तीन पक्षांचे नेते देखील उपस्थित आहे. यावेळी भाजप नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आमने-सामने आले. दोघांनी एकमेकांना शुभेच्छा देत हस्तांदोलन केले. विधानसभेचे आज तीन दिवसांचे विशेष आंदोलन सुरू झालं आहे. हंगामी अध्यक्ष नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी काय करायंच हे फडणवीस ठरवत आहेत. राज ठाकरे भाजपच्या हातातील खेळणं झालं आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना बरोबर घेण्याचे संकेत दिले आहेत. यावरून महायुतीत राजकारण तापले आहे. यावर शिवसेनायुबीटी पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
शरद पवार यांनी पराभवाचं खापर, निर्जीव ईव्हीएमवर फोडणे हे अतिशय चुकीचे आहे. पवारसाहेबांच्या ज्येष्ठ नेत्याने ही भूमिका घेऊ नये. पराभवामुळे पवारसाहेबांची मन विचलित झाले आहे. मनोज जरांगेंनी पाच जानेवारीपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाचा अल्टिमेटम दिला आहे. यावर प्रसाद लाड मनोज जरांगेंसाठी खंबीर आहे. अॅक्शनला रिअॅक्शन नक्की देईल, असेही प्रसाद लाड यांनी म्हटले.
भाजप नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला बरोबर घेण्याचे संकेत दिलेत. यावर शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. भाजपचे नेते म्हणून फडणवीस बोलले असतील. पण महायुतीमधील निर्णय तिन्ही पक्ष एकत्र बसून घेतात. याबाबत शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे फडणवीसांशी बोलतील, आणि निर्णय घेतील, असे उदय सामंत यांनी सांगितले.
मंत्रिपदासाठी कोकणातील नेत्यांचे मुंबई लाॅबिंग सुरू झालं आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील नेत्यांनी मुंबईत तळ ठोकून बसले आहेत. दीपक केसरकर, उदय सामंत, नीतेश राणे यांची नावे चर्चेत असून, ते पक्षाच्या वरिष्ठांच्या संपर्कात आहेत.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात विभागीय आणि जातीय संतुलन साधण्याचा महायुतीतील तिन्ही पक्ष प्रयत्न करतील. जुन्या मंत्र्यांचा पत्ता सरसकट कापला जाणार नाही. मात्र, काही चेहरे वगळले जातील. महायुती सरकारमध्ये 40 मंत्रिपदे असणार असून त्यात कोणाकोणाला संधी मिळणार याची चर्चा आहे. तसंच सुरवातीच्या विस्तारात 18 ते 20 मंत्रिपदे वाटली जाणार आहेत. भाजपला 20 ते 22, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 ते 13 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 9 ते 10 मंत्रिपदे दिली जातील, अशी शक्यता आहे. शिंदेसेनेचे प्रवक्त्ते आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्तार 11 किवा 12 डिसेंबरला होईल, असे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
विशेष अधिवेशनात विधान परिषद सभापतींची निवड होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे सभापतीपद मागील दोन वर्षांपासून रिक्त आहे. सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूक होण्याची शक्यता आहे. भाजपकडून या पदासाठी पूर्वी आमदार प्रा. राम शिंदे यांचे नाव चर्चेत होते.
विस्तारात कोणाकोणाचे समाधान करायचे हा प्रश्न महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांसमोर आहे. महायुतीचे 2022 मध्ये सरकार आले तेव्हापासून मंत्रिपदाची वाट पाहत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांना यावेळी संधी मिळणार का? याबाबत उत्सुकता आहे. भाजपचा विचार करता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री झाले, तर प्रदेशाध्यक्ष कोण होणार? याची चर्चा आहे. 132 आमदार असलेल्या भाजपमध्ये मंत्रिपदे देताना पक्षनेतृत्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसोटी लागणार आहे.
अध्यक्षांची निवड होईपर्यंत हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे कामकाज पाहतील. राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. विधानसभा अध्यक्षपद भाजपकडेच राहणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, सुभाष देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. यात राहुल नार्वेकर यांचे नाव आघाडीवर आहे.
विधानसभेच्या एकूण आमदार संख्येच्या (288) 10 टक्के म्हणजे 28 किंवा त्यापेक्षा जास्त आमदार निवडून आले, असतील अशा पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद जाते. यावेळी महाविकास आघाडीतील कोणत्याही एका पक्षाला इतक्या जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेताच नसेल, अशी स्थिती आहे. विरोधी पक्षनेतेपद असावे की, नाही याचा निर्णय करण्याचा अधिकार हा विधानसभाध्यक्षांना असतो. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या तीन दिवसांच्या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेता असावा की नाही, याबाबत निर्णय होणार नाही, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र विधानसभेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू होणार असून, त्यासाठी हंगामी अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे नऊ वेळा निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबकर यांना राज्यपालांनी काल शपथ दिली. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 11 किंवा 12 डिसेंबरला होणार असल्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.