Shankarrao Gadakh Sarkarnama
विशेष

‘ठाकरे सरकार पडणार, हे शिवसेना आमदाराने चार महिन्यांपूर्वीच सांगितले होते’

काही गोष्टी या जाहीरपणे सांगता येत नाहीत. पण, काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडणार, हे शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी चार महिन्यांपूर्वीच मंत्रालयासमोर सांगितले होते, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी आपल्या भाषणातून केला. (Mahendra Thorve had said four months ago Thackeray government will fall : Shankarrao Gadakh)

नेवासे येथील एका कार्यक्रमात बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी चार महिन्यांपूर्वी सांगितलेला किस्सा माजी मंत्री गडाख यांनी आपल्या भाषणातून सांगितला. ते म्हणाले की, महाविकास आघाडी कोसळल्यानंतर निर्णय घ्यायचा वेळा आला. त्यावेळी माझ्या मनात द्विधा मनस्थिती होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत जायचं, भाजप सोबत जायचं की एकनाथ शिंदे यांच्यासोबत जायचे. त्यात अनेक गोष्टी होत्या. पद राहील की जाईल. पद गेल्यानंतर नेवासे तालुक्यातील राजकारणाचं काय होईल.

काही गोष्टी या जाहीरपणे सांगता येत नाहीत. पण, काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. रायगड जिल्ह्यातील महेंद्र थोरवे नावाचे आमदार आहेत. चार महिन्यांपूर्वी मंत्रालयातील बैठक संपवून गाडीत बसताना ते आले. त्यांनी सांगितले की, माझं एक तुम्ही मार्गी लावलं आहे. पण दुसरी एक योजना आहे, तेवढीही माझ्या मतदारसंघात मजूर करून द्या. मी म्हटलं देतो; पण एका माणसाशी बोला. त्यावर त्यांनी स्पष्ट केले मी काही बोलू शकत नाही. त्यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी थोडीशी नाराजी दाखवली. त्यावेळी मी त्यांच्या खांद्यावर हात टाकून विचारलं की काय भानगड आहे? त्यावर त्यांनी सांगितलं की, आम्ही प्रचंड नाराज आहोत. ज्या राष्ट्रवादीशी आम्ही लढलो, त्याच राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून रायगड जिल्ह्यात काम करावं लागतंय. प्रचंड अडचणी येत आहेत. हे सरकार काही जास्त दिवस टिकणार नाही. ते पुढे म्हणाले की, मी तुम्हाला खात्रीने सांगतो की हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. त्यामुळे तुम्ही घाई करा आणि तुमची मतदारसंघातील कामे करा, त्याचबरोबर माझेही काम करून द्या, हा दोघांमधील किस्सा शंकरराव गडाखांनी आपल्या भाषणातून सांगितला.

सरकार पडणार अशी चर्चा सगळीकडेच होती. नाराजी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे लोकप्रतिनिधीवर मोठं दडपण असतं. ज्यांच्याबरोबर लढलो, त्यांच्याबरोबर काम करण्याची वेळ आली आणि सूत जुळले नाही, तर मोठा स्फोट होतो. तोच स्फोट राज्यात झाला आहे, असेही गडाख यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT