Manoj Jarange Hunger Strike  Sarkarnama
विशेष

Manoj Jarange Hunger Strike : ...अन् व्यापारी, राजकीय नेत्यांचा जीव पडला भांड्यात; दिवाळी होणार गोड

Maratha Reservation and Diwali : मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणामुळे दिवाळीच्या खरेदीबाबतची अनिश्चितता आणखी वाढली होती.

अय्यूब कादरी

Antarwali Sarati News : यंदा पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळाचे सावट पसरले आहे. अर्थात हे सावट दिवाळीच्या खरेदीवर आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीबाबतची अनिश्चितता आणखी वाढली होती.

मराठा आरक्षणाबाबत सरकार निर्णय घेत नसल्याने जरांगे पाटील यांचे उपोषण लांबू लागले आणि तिकडे व्यापाऱ्यांचा जीव टांगणीला लागला. त्यामुळे सरकारवर मराठा आंदोलकांसह व्यापाऱ्यांचीही नाराजी वाढू लागली होती. दरम्यान, सरकारच्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यामुळे व्यापारी आणि राजकीय नेत्यांचाही जीव भांड्यात पडला आहे. नागरिकांसह त्यांचीही दिवाळी आता गोड होणार आहे.

दिवाळी हा सर्वात मोठा सण. या सणाला मोठी खरेदी केली जाते. व्यापाऱ्यांसाठी हा वर्षभरातील सर्वात मोठा हंगाम असतो. मोठी गुंतवणूक करून व्यापारी यासाठी विविध साहित्याचा मोठा साठा करून ठेवतात. कोरोनाच्या तडाख्यानंतर बाजारपेठा आता कुठे सावरू लागल्या आहेत. त्यातच यंदा पाऊस कमी झाला. खरीप पिकांच्या राशी सुरू आहेत. नगदी पीक म्हणून मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. सोयाबीनलाही यंदा शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला भाव मिळत नाही.

पीक पाणी चांगले होऊन शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे खेळू लागले, की बाजारपेठांचा झगमगाट वाढतो. यंदा चित्र असे दिसत नव्हते. त्यामुळे आधीच बाजारपेठांवर मरगळ आलेली, त्यात भर पडली मराठा आरक्षण आंदोलनाची. शेती हा मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. पाऊस नाही, शेतीत अपेक्षित उत्पन्न नाही, त्यातच आंदोलनामुळे शेतकरी दिवाळीपासून दूर राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.

मनोज जरांगे पाटील यांचे उपाशीपोटी उपोषण सुरू असताना मराठा समाजाला दिवाळी साजरी करावी की नाही, असा विचार करावा लागला असता. आता उपोषण स्थगित झाल्यामुळे दिवाळी साजरी होणार आहे. उपोषण स्थगित झाले नसते तर मराठा समाजाचा सरकारवरील रोष आणखी वाढला असता. दिवाळीची खरेदी वाढली नसती तर सरकारवरील व्यापाऱ्यांचाही रोष वाढला असता. सरकारचे आश्वासन, त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषणाला दिलेली स्थगिती यामुळे सरकारचा जीव भांड्यात पडला आहे. त्याबरोबरच व्यापाऱ्यांनीही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

बेमुदत उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या प्रकृतीची चिंता सर्वांनाच लागली होती. गुरुवारी संध्याकाळी उपोषण स्थगित केल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे मराठा समाजाला हायसे वाटले. राजकारणी सत्ताधारी, सर्वच पक्षांचे राजकीय नेते तात्पुरते सुटले. व्यापारीही खूष झाले. मराठवाड्यातील बाजारपेठांवर आलेली मरगळ आता दूर होऊ लागली आहे.

बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यामुळे काही भागांत एक-दोन दिवस बाजारपेठा बंद झाल्या. ऐन दिवाळी खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या काळातच दुकाने बंद ठेवावी लागत असल्याने व्यापारी नाराज झाले होते. संचारबंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यासाठी राजकीय नेते धजावले नाहीत. मनोज जरांगे पाटील यांच्या एका निर्णयाने नागरिक, व्यापारी आणि राजकीय नेत्यांची दिवाळी गोड होणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT