ही गोष्ट १९७०मधील. भिवंडी येथील धार्मिक दंगलीतील पिडितांच्या मदतीसाठी प्रगत साहित्य सभेच्या वतीने दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आम्ही कविसंमेलन आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी प्रा. अनंत काणेकर होते. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे असे दिग्गज कवी त्यात सहभागी झाले होते. कार्यक्रम संपायच्या वेळी अध्यक्षांकडे एक चिठ्ठी आली. त्यात लिहिले होते, ‘मी एक टॅक्सी ड्रायव्हर आहे. मला कविता वाचायच्या आहेत.’ अध्यक्ष म्हणाले, ‘‘आता वेळ झाली आहे. कार्यक्रम संपला आहे.
’’ मी जवळ ओरडलोच ‘वाचू द्या.’ माझ्यासोबत दयानंद कॉलेजचा ग्रुपही त्यात सामील झाला. शिवाय मी प्रगत साहित्य सभेचा पदाधिकारी होतो. अध्यक्षांनी परवानगी दिली. ड्रायव्हरच्या पांढऱ्या मळक्या कपड्यातील कुरळ्या केसांचा, सावळा, शिडशिडीत बांध्याचा, नाकेला तरुण उठला आणि त्याने तीन कविता वाचल्या. सारे सभागृह स्तंभित झाले. त्या दिवशी मराठी कवितेत त्याने पाऊलखुणा उमटविल्या होत्या. त्याचे नाव होते नामदेव ढसाळ.
त्या सभागृहात ‘सत्यकथा’ या मासिकाचे कार्यकारी संपादक प्रा. राम पटवर्धन बसले होते. एक ठराविक वेळेच्या हार्बर लाईनवरील लोकलमध्ये दिनकर गांगल वगैरे आम्ही असायचो, त्यात ते असायचे. त्यांनी मला सांगितले, की ‘त्या कवीला बोलावता का?’ मी नामदेवची भेट घडवून दिली. रामभाऊंनी त्याला कार्ड दिले आणि म्हटले, ‘उद्या खटाववाडीत या.’ पुढच्याच महिन्यात ‘सत्यकथे’च्या अंकात नामदेवच्या पाच कविता प्रसिद्ध झाल्या. त्या काळात वाङ्मयीन क्षेत्रात ‘सत्यकथे’चा दबदबा होता. आपली कथा, कविता, लेख ‘सत्यकथे’त यावा, यासाठी अनेक लेखक, कवी ताटकळत बसलेले असतात, अशी दंतकथा ऐकली होती.
त्या दिवसापासून अखेरच्या दिवशी म्हणजे २०१४मध्ये ‘चैत्यभूमी’जवळ असलेल्या चितेवर नामदेवचे पार्थिव ठेवेपर्यंत आमची मैत्री राहिली. राजकारण, संघटनात्मक पातळीवर आमच्या भूमिका वेगवेगळ्या होत्या, मतभेदही होते; परंतु आमची वैयक्तिक मैत्रीही कधीच तुटली नाही. सुरुवातीला ‘मायस्थेनिया ग्रेव्हिस’सारखा आजार आणि नंतर पोटाच्या दीर्घ आजाराशी तो झुंजत राहिला. शेवटच्या काळात मुंबईतील ‘बॉम्बे हॉस्पिटल’ हे त्याचे दुसरे घरच झाले होते.
त्याच्या आजारपणात अमिताभ बच्चनपासून सर्वांनी आर्थिक सहकार्य केले. त्याच्या अंत्ययात्रेत सगळ्या क्षेत्रांतील दिग्गज सामील झाले होते. गुलजार तर वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलपासून ते चैत्यभूमीपर्यंत पायी चालत होते. रामदास आठवले यांनी पी.ई. सोसायटीच्या वतीने अंत्ययात्रेची व्यवस्था केली होती. राजा ढाले मात्र तिकडे फिरकलेच नाहीत.
नामदेववर प्रेम करणाऱ्यांची संख्या अफाट होती. ‘रिडल्स’ आंदोलनात मुख्यमंत्र्यांबरोबर शिवसेना नेते आणि आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांची बैठक झाली, त्यात बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ‘नामदेव काहीही असो, मला तो आवडतो.’ महाराष्ट्रात नामदेवच्या सहवासात असलेले शेकडो लोक त्यांच्या आठवणी सांगतात. भाऊ पाध्ये नामदेवला ‘संत नामदेव ऑफ गोलपीठा’ म्हणायचा. दलित पँथरचा लढाऊ नेता अशी नामदेवची प्रतिमा जनमानसात होती. त्याच्या या बेडर आणि बिनधास्त शैलीचे दर्शन घडले ते पुण्यात. दलितांवरील सामाजिक अन्याय-अत्याचाराविरुद्ध केलेल्या निदर्शनांमध्ये पँथर्स आक्रमक झाले होते.
परिणामी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना रस्ता बदलावा लागला. भूगाव येथे प्रत्यक्ष जाऊन धनदांडग्यांविरुद्ध केलेले आंदोलन किंवा शंकराचार्यांवर भिरकवलेला जोडा ही नामदेवच्या बेडरपणाची उदाहरणे होत. नामदेवने दलित पँथरला लढाऊपणा दिलाच; पण चळवळीला आक्रमक भाषणाची शैलीदेखील दिली. ‘दलित पँथरचा झंझावात’ या पुस्तकात जयदेव गायकवाड यांनी नामदेवचे लढाऊ व्यक्तिमत्त्व चांगले उभे केले आहे. त्याने हीच शैली ‘पँथर’ स्थापन होण्यापूर्वी कवितेत आणली होती.
‘गोलपिठा’ हा कवितासंग्रह त्या शैलीचा आविष्कार होय. ‘गोलपिठा’ने मराठी साहित्य विश्व हादरवून सोडले होते. नामदेवच्या प्रेमापोटी नारायण आठवले यांनी तो कवितासंग्रह प्रकाशित केला होता. ‘उषाकिरणच्या पायथ्याशी’ ही त्याची गाजलेली कविता इथलीच. ‘गोलपिठा’मुळे दलित साहित्याला बळ मिळाले. या संग्रहाला प्रस्तावना लिहिण्यापूर्वी विजय तेंडुलकर आमच्याबरोबर कामाठीपुऱ्यातील वस्त्यात, गल्ल्यांत फिरले.
‘गोलपिठा’नंतर कवितेच्या प्रांतात नामदेवने घोडदौड सुरू केली ती लक्षणीय आहे. मी माझ्या ‘ललित’मधील लेखात याविषयी लिहिले होते, की ‘ग्रामीण भागातल्या कष्टकरी स्त्रिया दुपारच्या वेळात एकमेकींच्या डोक्यातल्या उवा मारतात त्या वेळचे जे चित्रण नामदेवने केले आहे, ते अफलातून आहे.’ ते वाचून दिलीप पाडगावकर यांनी मला पुण्याहून फोन केला आणि सांगितले, ‘मला ती कविता पाठवून द्या.’ गद्य लिखाणात त्याची ‘हाडकी हडवळा’ ही कादंबरी आहे. वर्तमानपत्रातून लिहिलेल्या सदरांचे ‘सर्व काही समष्टीसाठी’, ‘आंधळे शतक’ ही दोन पुस्तके, चळवळीवरचे एक पुस्तक आणि बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शेवटच्या दिवसांत लिहिलेले ‘दलित पँथर : एक संघर्ष’ ही पुस्तके आहेत.
खरे म्हणजे ज. वि. पवार यांनी लिहिलेल्या ‘दलित पँथरचा इतिहास’मुळे ‘पँथर’चे मूळ कार्यकर्ते आणि आम्ही सगळेच अस्वस्थ होतो. नामदेवने आणि मी दोघांनीही लिहायचे ठरविले होते. तो म्हणाला, ‘तू अगोदर लिही. मी नंतर लिहीन.’ पण त्याचे हे पुस्तक माझ्याआधी आले. नामदेवने एकच कथा लिहिली आहे. ‘अनादि भिंतीचा अनुबंध’ या शीर्षकाची कथा त्या वेळी सुधीर बेडेकर यांच्या ‘तात्पर्य की मागोवा’मध्ये प्रकाशित झाली होती.
साहित्य अकादमीने नामदेव ढसाळ यांच्यावर प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये प्रा. रणधीर शिंदे यांनी त्याच्या एकूण साहित्याचा साक्षेपी आढावा घेतला आहे. ‘आमच्या इतिहासातील अपरिहार्य पात्र : प्रियदर्शनी’ या इंदिरा गांधींवरील दीर्घ कविता विसरता येत नाही. ‘समग्र नामदेव ढसाळ’ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केला चांगली गोष्ट आहे; पण नामदेवची वैचारिकता ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या ‘अंत्योदय’ या विचारधारेशी मिळतीजुळती आहे, असे म्हणून राजकीय विनोद करणे कितपत योग्य?
सुरुवातीच्या खडाखडीनंतर नामदेव मल्लिकाचा संसार तसा सुरळीत चालला होता. त्यांनी सुरू केलेले हॉटेल अतिक्रमणाच्या नावाखाली ते पाडले गेले. नामदेवने सामाजिक आशयाच्या गेय कविता, भावगीते लिहिली. त्याच्या कॅसेट काढल्या; पण शेवटी प्रदीर्घ आजाराने त्यांना गाठले. नामदेवच्या आयुष्यात तीन शल्ये होती.
पहिले म्हणजे राजा ढाले ‘दलित पँथर’चे अध्यक्ष असताना नागपूरच्या अधिवेशनात नामदेवला ‘पँथर’मधून काढून टाकल्याची घोषणा, दुसरे म्हणजे कॉलेजमध्ये ‘रॅगिंग’ झाल्यावर त्याच्या मुलाची झालेली मानसिक अवस्था आणि तिसरे म्हणजे आपल्या कवितांची नीटपणे समीक्षा झाली नाही ही होय.
मी माझ्या ‘ललित’मधील लेखात लिहिले होते, ‘मला वाटते नामदेव भाबडा होता. ज्या नामदेवच्या कवितेने इथल्या ‘समग्र व्यवस्थे’ची समीक्षा केली, त्या समीक्षेची समीक्षा कोण करणार?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.