Dattatray Bharane-Devendra Fadnavis-Yashwant Mane
Dattatray Bharane-Devendra Fadnavis-Yashwant Mane Sarkarnama
विशेष

राष्ट्रवादीचे मंत्री, आमदारांच्या डोक्यातून फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद जाईना; भरणेंनंतर मानेंकडूनही उल्लेख

प्रमोद बोडके

सोलापूर : मुख्यमंत्रिपदावरून देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना जाऊन अडीच वर्षे होत आली तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (ncp) मंत्री अन्‌ आमदारांच्या डोक्‍यातून फडणवीसांचे मुख्यमंत्रिपद काही केल्या जायला तयार नाही. जाहीर सभांमध्ये बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख राष्ट्रवादीचे मंत्री अन्‌ आमदारांकडून अजूनही होत आहे. मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखेच वाटत असल्याचे मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यांच्या या वाक्‍याला राष्ट्रवादीतील मंत्री अन्‌ आमदारांच्या उल्लेखामुळे वारंवार उजाळा मिळताना दिसत आहे. (MLA Mane also mentions Fadnavis as Chief Minister after NCP minister Bharane!)

सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी काही दिवसांपूर्वी इंदापुरातील कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला होता. स्टेजवर बसलेल्या एका व्यक्तीने पालकमंत्री भरणे यांची चूक त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी ‘आपल्या डोक्‍यात किती गोंधळ असतो आणि काय काय कामे करावी लागतात,’ हे सांगून पालकमंत्री भरणे यांनी त्यांची चूक झाकून नेली होती. पालकमंत्री भरणे यांनी या आगोदरही एक ते दीड वर्षापूर्वी कोरोनाची आढावा बैठक घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाच उल्लेख केला होता.

परिवार संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे सध्या सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. परिवार संवाद कार्यक्रमात सोमवारी रात्री मोहोळमध्ये झालेल्या मेळाव्यात मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने (Yashwant Mane) यांनी मतदार संघातील विकास कामांची यादी वाचून दाखवायला सुरुवात केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे हा विकास शक्‍य झाल्याचे आमदार माने यांनी सांगताच, स्टेजवरील उपस्थितांनी आमदार माने यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असल्याची आठवण करून दिली. आपली चूक झाल्याचे लक्षात येताच आमदार माने यांनी पालकमंत्री भरणे यांच्याकडे पाहत ‘मामा तुमच्यासारखीच माझी पण चूक झाली, अशी कबुली दिली.

ठाकरेंचा विसर, अजितदादांची आठवण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करणारे राज्यमंत्री भरणे आणि मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने हे दोघेही इंदापूर तालुक्‍यातीलच आहेत. या दोघांनाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे असल्याचा विसर पडल्याचे दिसते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जाहीर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला असला तरीही उपमुख्यमंत्री म्हणून मात्र अजित पवार यांचाच उल्लेख केलेला आहे. बारामतीच्या जवळ असलेल्या इंदापूरमधील या नेत्यांना उध्दव ठाकरे यांचा विसर तर अजितदादांची कायम आठवण राहत असल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT