Yashomati Thakur News Sarkarnama
विशेष

Yashomati Thakur Appointed On CWC : विदर्भातील आणखी एका नेत्यावर काँग्रेसकडून महत्वपूर्ण जबाबदारी; टीम 'राहुल'मधील यशोमती ठाकुरांचे प्रमोशन

Yashomati Thakur Appointed On CWC : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यानंतर पुन्हा एकादा विदर्भाला ठाकूर यांच्या रुपाने झुकते माप देण्यात आले आहे.

Amol Jaybhaye

Congress Working Committee News : राज्यातील धडाडीच्या आणि आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसच्या आमदार माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. पक्षातील सर्वोच्च समितीवर त्यांनी नेमणूक करून त्यांच्या पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट केल्याचे बोलले जात आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय कार्यकारीणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे वर्किंग कमिटीवर जाणे, हे त्यांची राज्याच्या ताकद वाढल्याचे दर्शविणारे आहे. तसेच काँग्रेसने विदर्भावर विशेष लक्ष दिले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यानंतर पुन्हा एकादा विदर्भाला ठाकूर यांच्या रुपाने झुकते माप देण्यात आले आहे.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये ठाकुर यांच्यावर महिला व बालविकास मंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. ठाकूर अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्या तेथून २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्या अमरावतीच्या पालकमंत्रीही होत्या. विदर्भाने काँग्रेसला नियमीत पाठिंबा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भातून पुन्हा जास्तीत जास्त जागा जिंकत भाजपला आव्हान देण्याचा काँग्रेसचा (Congress) मानस आहे. त्यामुळे पटोले, वडेट्टीवार यांच्यावर यशोमती ठाकूर आणि माणिकराव ठाकरे यांच्यावरही जबाबदारी देण्यात आली आहे.

अशा काळात यशोमती ठाकूर यांना मोठी संधी आहे. ठाकूर यांचे नाव काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी आणि विरोधी पक्षनेतेपदासाठीही आघाडीवर होते. मात्र, त्यांना या दोन्ही पदांनी हुलकावणी दिली. त्यानंतर त्यांच्यावर आता मोठी जबाबदारी देऊन त्यांचे राजकीय महत्व अधोरेखित केले आहे. या निवडीमुळे अमरावती लोकसभा मतदारसंघाच्याही त्या उमेदवार असू शकतात, अशी चर्चा आहे. दरम्यानच्या काळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विदर्भ दौरा केला होता. तेव्हा ठाकूर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, अशी मागणी केली होती.

केंद्रीय समितीवर निवड करून त्यांना लोकसभेला उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. अमरावती जिल्ह्यातील सहकारात ठाकूर यांचा चांगलाच दबदबा आहे. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत ते दिसून आले आहे. त्यांनी या निवडणुकीत एकहाती वर्चस्व राखले होते. जिल्हा बॅंकेतही त्यांची सत्ता होती. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना फटला बसला असला तरी त्यांची राजकीय ताकद मोठीच आहे.

अमरावती पदवीधर निवडणुकीतही त्यांनी आपला करिष्मा दाखवून दिला होता. ठाकूर यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी एकत्र येत भाजपच्या ताब्यातील जागा खेचून आणली होती. त्यामुळे ठाकूर यांना पुन्हा बळ देऊन काँग्रेसला आपला बालेकिल्ला परत मिळवायचा आहे. त्यामुळेच विदर्भातील नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

ठाकूर या 2004 ते 2009 मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव होत्या. या दरम्यान राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या कामाला पूर्ण न्याय देत त्यांनी राज्यभरात काँग्रेसचा एक आक्रमक चेहरा म्हणून मान्यता मिळवली. राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) यंग ब्रिगेडमध्ये त्यांचा समावेश झाल्यावर गुजरात, दीव-दमण, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्याच्या निरीक्षकाची धुरा त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. यासोबतच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव, अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव, महाराष्ट्र राज्य काँग्रेसच्या कार्याध्यक्ष अशी पक्षाच्या विविध पदांच्या धुरा त्यांनी सांभाळली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT