vasant chavan sarkarnama
विशेष

Vasant Chavan : ग्रामपंचायत ते लोकसभा, पक्ष अडचणीत असताना 'शिवधनुष्य' पेलणारे वसंत चव्हाण यांचा असा आहे राजकीय प्रवास...

Vasant Chavan Latest News : अशोक चव्हाण व तत्कालीन भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशा चार पक्षांची ताकद असूनही केवळ निष्ठेच्या जोरावर वसंतराव चव्हाण यांनी प्रतापराव पाटील-चिखलीकर यांना धूळ चारली होती.

Jagdish Pansare

Vasant Chavan News : नायगावचे सरपंच ते संसदेचे सदस्य असा राजकीय प्रवास असलेले खासदार वसंतराव चव्हाण यांचे अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. खासदार चव्हाण यांच्यावर हैदराबाद येथील किम्स रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी पहाटे खासदार चव्हाण यांची प्राणज्योत मालवली.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेस पक्षाने वसंतराव चव्हाण यांच्यावर नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस सावरण्याची जबाबदारी दिली होती.

लोकसभेला नांदेड मतदारसंघातून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. तसे पाहिलं तर वसंतराव चव्हाण यांची प्रकृती आधीपासूनच बरी नव्हती. त्यांना नियमितपणे डायलिसिस करावी लागायचे.

मात्र, पक्ष अडचणीत सापडल्यामुळे वसंतराव चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ज्या अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात 2014 पासून वसंतराव चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये ( Congress ) काम केले.

त्याच अशोक चव्हाण यांना आव्हान देण्याचे आणि नांदेड लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्याचे 'शिवधनुष्य' वसंतराव चव्हाण यांनी पेलले. आक्रमकपणे प्रचार करत त्यांनी नांदेडमध्ये दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा दमच अशोक चव्हाण आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांना भरला होता.

जून 2024 चा निकाल लागला तेव्हा नांदेड लोकसभा मतदारसंघात वसंतराव चव्हाण यांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. अशोक चव्हाण व तत्कालीन भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशा चार पक्षांची ताकद असूनही केवळ निष्ठेच्या जोरावर वसंतराव चव्हाण यांनी प्रतापराव पाटील-चिखलीकर यांना धूळ चारली होती.

15 ऑगस्ट 1954 रोजी जन्म झालेल्या वसंतराव चव्हाण यांची राजकीय कारकीर्द नायगावचे सरपंच म्हणून सुरू झाली. सरपंच ते लोकसभेचे खासदार असा त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव राहिला. 1978 मध्ये ते नायगावचे सरपंच झाले होते.

गावगाडा चालवत असताना 1990 ते 2002 या काळात त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून भूमिका बजावली. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य असे टप्प्याटप्प्याने राजकारण करत वसंतराव चव्हाण जिल्ह्याच्या राजकारणात चांगले सक्रिय झाले होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काही काळ चव्हाण यांनी काम पाहिले. त्यानंतर 2002 मध्ये वसंतराव चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांची थेट विधान परिषदेवर वर्णी लागली. विधान परिषदेचा कालावधी संपल्यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली.

मतदारसंघात चांगला जनसंपर्क आणि काम असल्यामुळे ते निवडून आले. आमदारकीची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दुसऱ्यांदा त्यांना नायगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि ते सलग दुसऱ्यांदा आमदार झाले.

यादरम्यान नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले. परंतु, 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी जिल्ह्यात अशा काही राजकीय घडामोडी घडल्या की राजकारणातून प्रकृतीमुळे निवृत्त होऊ पाहत असलेल्या वसंतराव चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला सावरण्याची मोठी जबाबदारी स्वीकारवी लागली.

अशोक चव्हाण यांनी ऐन लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. अशोक चव्हाण यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील एकनिष्ठ काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल रोष होता.

अशावेळी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध लोकसभा निवडणुकीत निष्ठावान उमेदवाराला मैदानात उतरवल्यास नांदेडची जागा महाविकास आघाडी जिंकू शकते, असे मत राज्यातील नेत्यांची झाले होते. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर एकमेव नाव होते ते म्हणजे वसंतराव चव्हाण.

पक्ष अडचणीत असल्यामुळे वसंतराव चव्हाण यांनीही आपल्या प्रकृतीचे कारण पुढे न करता पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही ते हिरीरीने सहभागी झाले होते. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यात त्यांच्या विरोधात असलेला रोष, महायुती सरकारविरोधात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून असलेले वातावरण अशा सगळ्या गोष्टी जुळून आल्यामुळे वसंतराव चव्हाण विजयी झाले आणि काँग्रेसने नांदेडचा गड राखला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मंत्री व लातूर शहरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी एका प्रचारसभेत नांदेडमध्ये आता 'वसंत बहरणार' असे म्हटले होते. चार जूनच्या निकालानंतर नांदेड जिल्ह्यात वसंतराव चव्हाण यांच्या विजयाने खरंच 'वसंत बहरला' होता. मात्र, खासदार म्हणून वसंतराव चव्हाण यांची कारकीर्द अगदीच अल्प ठरली.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT