Rohit Pawar-Babanrao Pachpute-Tanaji Sawant
Rohit Pawar-Babanrao Pachpute-Tanaji Sawant Sarkarnama
विशेष

Rohit Pawar : रोहित पवार वाढवणार तानाजी सावंत, बबनराव पाचपुते, आवताडेंचे टेन्शन!

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : आगामी विधानसभा निवडणुकीत शंभरपेक्षा अधिक आमदार निवडणून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झालेल्या भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा आणि पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघाची जबाबदारी पक्षाने आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या पाच मतदारसंघातील विद्यमान आमदारांचे टेन्शन मात्र रोहित पवार वाढविण्याची शक्यता आहे. (NCP gave responsibility of five constituencies to MLA Rohit Pawar)

रोहित पवारांकडे पालकत्व सोपविण्यात आलेल्या पाचपैकी करमाळा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विचाराचे संजय शिंदे हे अपक्ष आमदार आहेत. या ठिकाणी संजय पाटील घाटणेकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात पक्षाने शिंदे यांना पाठिंबा दिला हेाता. भूम-परांड्यात तानाजी सावंत आणि उस्मानाबादमध्ये कैलास पाटील हे शिवसेनेचे, तर भाजपचे श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते आणि पंढरपूरमध्ये समाधान आवताडे आमदार आहेत. रोहित पवार यांची काम करण्याची पद्धत लक्षात घेतल्या या आमदारांचे टेन्शन ते नक्कीच वाढवू शकतात. कारण, त्यांनी कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे यांच्यासाख्या तगड्या उमेदवाराला मात दिली होती.

दरम्यान, पोटनिवडणुकीत ढासळलेला पंढरपूर विधानसभा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बुरुज सावरण्याची मोठी जबाबदारी आमदार पवार यांना पार पाडावी लागणार आहे. विधानसभेच्या २००९ मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पंढरपूरमध्ये पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर तब्बल १० वर्षांनंतर आमदार भारत भालके यांच्या रूपाने हा मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आला होता. पण, भालके यांच्या अकाली निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांना हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यात अपयश आले होते. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सर्वच मंत्र्यांनी ताकद पणाला लावली. तरीही हा मतदारसंघात ताब्यात ठेवण्यात पक्षाला अपयश आले होते.

विशेषतः राष्ट्रवादीची जबाबदारी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे होती. धनगर समाजाची मते पक्षाच्या मागे ठेवण्यात ते यशस्वी ठरले. मात्र, जागा ताब्यात ठेवण्यात ते अपयशी ठरले होते. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडे नेत्यांचा भरणा होता. हा मतदार संघ पुन्हा राष्ट्रवादीकडे खेचण्याच्या दृष्टीने पक्षाने तयारी सुरू केली आहे. पंढरपूर-मंगळेवढा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

मंगळवेढ्यातील बेकीवर जालीम उपाय करावा लागणार

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघ पोरका होऊ देणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला होता. विशेषतः मंगळवेढा तालुक्यातील रखडलेल्या प्रश्नांची जबाबदारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली होती. त्यामध्ये बसवेश्वर स्मारक, मंगळवेढा उपसा सिंचन योजना, बंद असलेली भोसे प्रादेशिक योजना, मंगळवेढा तालुक्यातील रस्ते, आरोग्य इतर प्रश्नांसह राष्ट्रवादीच्या स्थानिक गटातील दुफळीकडे पक्षाच्या जबाबदार मंत्र्यांसह नेत्यांनीही दुर्लक्ष केले आहे. आता आमदार रोहित पवार यांना या प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास राष्ट्रवादीला आगामी तालुक्यातील सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिकेच्या निवडणुकीत किंमत मोजावी लागू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT