Eknath Shinde Neelam Gorhe Sarkarnama
विशेष

Neelam Gorhe News: 2002, 2008, 2014, 2020 अन् 2026 ! नीलम गोऱ्हेंना सलग पाचव्यांदा विधानपरिषद; ‘अ‍ॅडजस्टमेंट पॉलिटिक्स’ ची इनसाईड स्टोरी

Shivsena News: काही दिवसांपूर्वी समारोपाच्या भाषणामध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांनी नीलम गोऱ्हे या पुन्हा विधान परिषदेवरती येतील असे संकेत दिले होते. त्यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षांतर्गत विरोध असल्याचे देखील बोललं जात होतं. मात्र, त्यानंतर देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांची उमेदवारी कायम ठेवली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते येतात आणि जातात, मात्र सलग 25 वर्षे सत्तेच्या केंद्रस्थानी राहून आपला प्रभाव कायम ठेवणे मोजक्याच नेत्यांना जमले आहे. शिवसेना शिंदेच्या पक्षाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी 2026 च्या निवडणुकीत पुन्हा संधी मिळवत विधानपरिषदेवर जाण्याचा ऐतिहासिक 'पंच' पूर्ण करणार आहेत.

2002 पासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आता 2026 पर्यंत विनासायास पोहोचला असून, या अभेद्य वाटचालीमागे केवळ राजकीय समीकरणे नसून त्यांचा बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची हातोटी कारणीभूत ठरली आहे.

नीलम गोऱ्हे यांच्या राजकीय प्रवासाची मुळे सामाजिक चळवळीत आहेत. स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न मांडणारा एक अभ्यासू चेहरा म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना शिवसेनेत संधी दिली. 2002 मध्ये त्या पहिल्यांदा विधानपरिषदेवर निवडून गेल्या आणि त्यानंतर सातत्याने त्यांना संधी मिळत गेली.

2002 नंतर 2008 मध्ये देखील बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. नंतर शिवसेनेचे सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हातात आली. मात्र, त्यावेळी देखील उद्धव ठाकरे यांनी 2014 आणि 2020 मध्ये नीलम गोऱ्हे यांना संधी दिली. या काळात त्यांनी केवळ शिवसेनेची प्रवक्ती म्हणून भूमिका निभावली नाही, तर सभागृहात पक्षाची बौद्धिक बाजू लावून धरली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात त्यांनी शिवसेनेची आक्रमक बाजू ताकदीने मांडली. ​उद्धव ठाकरे यांच्या काळात पक्षाची प्रवक्त्या म्हणून त्यांनी कठीण काळात खिंड लढवली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केले, तेव्हा सुरुवातीला सावध पवित्रा घेणाऱ्या गोऱ्हे यांनी नंतर 'शिंदे गटात' सामील होण्याचा निर्णय घेतला. ठाकरेंसोबत असताना आणि नंतर शिंदे सोबत आल्यानंतर देखील त्यांनी शिवसेनेत असताना भाजपशी संबंध मात्र नेहमीच चांगले ठेवल्याचे पाहायला मिळालं.

त्यामुळे काही दिवसांपूर्वी समारोपाच्या भाषणामध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांनी नीलम गोऱ्हे या पुन्हा विधान परिषदेवरती येतील असे संकेत दिले होते. त्यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षांतर्गत विरोध असल्याचे देखील बोललं जात होतं. मात्र, त्यानंतर देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांची उमेदवारी कायम ठेवली आहे.

यामुळे हे शक्य झालं ?

गोऱ्हेंच्या सलग निवडीमागे सर्वात मोठा घटक म्हणजे ‘अॅडजस्टमेंट पॉलिटिक्स’. कोणताही गट सत्तेत असो, त्यांनी त्या गटाशी संघर्ष टाळत समन्वय साधला.मोठ्या सभांमध्ये आक्रमक भाषणं न करता, पडद्यामागून समीकरणं जुळवणं ही गोऱ्हेंची खासियत. त्यामुळेच 24 वर्षांचा हा सलग प्रवास शक्य झाला, असं राजकीय विश्लेषक मानतात.

यात त्यांचा सभागृहातील अनुभव, उपसभापती म्हणून काम करण्यासाठी लागणारी बौद्धिक कौशल्ये अशा गोष्टी त्यांच्याकडे आहेत. विधानपरिषदेतील उपसभापतीसारखे महत्वाचे पद स्वतःकडे हवे असल्यास त्यासाठी आवश्यक लागणारी कौशल्ये असणाऱ्या गोऱ्हे यांची उमेदवारी आवश्यक असल्याची जाणीव शिंदे यांना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT