विशेष

जयंत पाटलांचे काम चार महिन्यांत मार्गी लावण्याचा गडकरींचा शब्द

सरकारनामा ब्यूरो

सांगली : केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आज (ता. २६ मार्च) रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी सांगलीत आले होते. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बहुचर्चित पेठ-सांगली रस्त्याचा प्रश्न मांडला. तो रस्ता माझ्या मतदारसंघातून येतो, त्यामुळे तो प्राधान्याने करावा, अशी मागणी केली. त्यावर गडकरी यांनी ‘पेठ ते सांगली या रस्त्याच्या कामाची निविदा येत्या चार महिन्यांत काढू’, असे स्पष्ट केले. (Peth-Sangli road issue to be resolved in next four months : Nitin Gadkari)

‘बोरगाव ते वाटंबरे’ रस्त्याच्या चौपदरीकरणाचे आणि सांगोला ते जत साखळी मार्गाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते. जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले की, पेठ नाक्यापासून सांगली रस्त्याचे निवेदन मी दिल्लीला गेल्यानंतर गडकरींना दिले होते. त्याबाबत आपण काही पावले टाकली आहेत. त्याविषयी आपण बोलालच. मी त्यावर जास्त बोलणे उचित ठरणार नाही. सांगली जिल्ह्यातील सर्व रस्ते, कोल्हापूर जाणारा रस्ता अर्धवट आहे, त्यावरही आपले लक्ष आहे. पेठनाक्याकडून येणारा रस्ता हा माझ्या मतदारसंघातून येतो, त्या भागातील लोकप्रतिनिधी म्हणून माझी विनंती आहे की, तो रस्ता आपण प्राधान्याने घ्यावा.

सांगली जिल्ह्यात आम्ही विमानतळ करू शकलो नाही. ड्रायपोर्टच्या कामासाठी राज्य सरकारची दोनच दिवसांपूर्वी बैठक घेतली आहे. याबाबत राज्य सरकारची जी जबाबदारी असेल ती माझी राहील. पण, आपली त्यामध्ये मोठी भूमिका आहे. त्यामुळे हे रस्ते सांगली जिल्ह्याच्या विकासाला चालना देतील. देशाला ज्याची गरज होती, तेच खाते नितीन गडकरी यांच्याकडे आहे, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.

जयंत पाटील यांच्या मागणीवर गडकरी यांनी येत्या चार महिन्यांत पेठ-सांगली रस्त्याची निविदा काढली जाईल. सांगली-कोल्हापूर रस्त्याचे अर्धवट काम, ड्रायपोर्टला मान्यता याबाबतही त्यांनी थेट भूमिका मांडताना या मुद्यांवर जयंतराव आणि संजयकाकांसह कोणालाच आता मला भेटण्याची गरज नसेल असेही स्पष्ट केले. खासदार संजय पाटील म्हणाले,‘‘मंत्री गडकरी यांनी जिल्ह्यासाठी जे मागितले ते दिले आहे. त्यासाठीच आज आम्ही कृतज्ञता मेळावा घेत आहोत.’’

फाटक लावून विमान उतरेल!

सांगलीत रस्ता हे विमानतळ असेल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री पाटील यांनी जिल्ह्यात विमानतळ नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्यावर गडकरी यांनी आता सांगली-सोलापूर रस्त्यावरच विमान उतरेल. जसे फाटक लावून रेल्वे धावते, तसे येथे फाटक लावले जाईल आणि विमान उतरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT