Modi offers prayer
Modi offers prayer  sarkarnama
विशेष

तेरा जणांचे पार्थिव होते.. पण चारच जणांच्या शवपेटींवर नाव लिहिता आले...

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : तमिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेले सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या अपघातात ठार झालेल्यांचे मृतदेह आज सायंकाळी उशिरा नवी दिल्ली येथील पालम विमानतळावर आणण्यात आले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

या वेळी गंभीर आणि शोकाकुल वातावरण होते. राजशिष्टाचारानुसार पंतप्रधान हे सर्वात शेवट पुष्पचक्र अर्पण करतात. मात्र मोदींनी तो शिरस्ता मोडत सर्वात आधी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यांनी पुष्पचक्र अर्पण केले. हा अपघात इतका भीषण होता की तेरापैकी केवळ चारच मृतदेहांची ओळख पटू शकली. त्यामुळे केवळ चारच शवपेट्यांवर नाव लिहिलेले होेते. इतरांची ओळख पटली नसल्याने त्यांच्या नावांचा उल्लेख करता आला नसल्याचे सांगण्यात आले.

संसदेत वाहिली श्रद्धांजली

या अपघाताची हवाई दलाने एअर मार्शल मानवेंद्रसिंह यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सेनादलांच्या माध्यमातून चौकशी सुरू केल्याचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज संसदेत निवेदनाद्वारे स्पष्ट केले. मात्र, जनरल रावत यांना श्रद्धांजली वाहताना विरोधी पक्षांना बोलू न दिल्याबद्दल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकार व पिठासीन अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

वीस मिनिटांत संपर्क तुटला

तामिळनाडूमध्ये बुधवारी झालेल्या भीषण हेलिकॉप्टर अपघातात सरसेनाध्यक्ष रावत यांच्यासह १३ जण मृत्युमुखी पडले होते. या घटनाक्रमावर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज प्रथम लोकसभेमध्ये आणि त्यानंतर राज्यसभेमध्ये निवेदन सादर केले. संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, ‘‘ हवाई दलाच्या ‘एमआय-१७’ हेलिकॉप्टरने सुलूर हवाई तळावरून ११.४८ वाजता उड्डाण केल्यानंतर दुपारी १२.०८ मिनिटांनी त्याचा नियंत्रणकक्षाशी असलेला संपर्क तुटला. कुन्नूरच्या जंगलात आग लागल्याचे काही स्थानिक लोकांना दिसले. घटनास्थळी त्यांना हेलिकॉप्टरचे अवशेष जळत्या अवस्थेत आढळल्यानंतर स्थानिक प्रशासनातर्फे बचाव पथकांनी मदत कार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लगेच हवाईदल प्रमुख व्ही. आर. चौधरी यांना घटनास्थळी पाठविण्यात आले होते. तसेच हवाई दलाने एअर मार्शल मानवेंद्रसिंह यांच्या अध्यक्षतेखाली तिन्ही सेनादलांच्या माध्यमातून संयुक्तरित्या चौकशीचे आदेश दिले असून या प्रक्रियेला सुरवातही झाली आहे.’’

विरोधक आक्रमक

श्रद्धांजलीच्या मुद्द्यावरून राज्यसभेमध्ये सरकार आणि विरोधी पक्षांचे खटके उडाल्याचे दिसले. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली होती. ती न मिळाल्याने खर्गे यांनी सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्व पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे होते की सर्वांना एकेक मिनीट बोलण्याची परवानगी दिली जावी. परंतु सरकार आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी विरोधकांना परवानगी दिली नाही. हा प्रकार दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे अशी टीका खर्गे यांनी केली.

हेलिकॉप्टरचा ब्लॅकबॉक्स सापडला

कुन्नूर : सरसेनाध्यक्षांसह अन्य बाराजणांना घेऊन जाणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा ब्लॅकबॉक्स सापडला असून आता त्यातून नेमकी कारणे स्पष्ट होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. या अपघातामध्ये मृत्यमुखी पडलेल्यांचे पार्थिव आज कोइमतूरला आणण्यात आले तिथून भारतीय हवाई दलाच्या विमानाने ते दिल्लीला नेण्यात आले. या हेलिकॉप्टरमधील दोन बॉक्स सापडले असून त्यात फ्लाइट डेटा रेकॉर्डरचाही समावेश आहे. आता हे दोन्ही बॉक्स दिल्ली किंवा बंगळूरला नेण्यात येतील. या ब्लॅक बॉक्समधून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल.

दिवसभरात

जनरल रावत यांच्यासह मृत्युमुखी पडलेल्यांना देशभर श्रद्धांजली

संसदेच्या दोन्ही सभागृहांकडून जनरल रावत यांना आदरांजली

अत्यवस्थ ग्रुप कॅप्टन वरुणसिंग यांना उपचारासाठी बंगळूरला नेले

वरुणसिंग यांना आराम मिळावा म्हणून राष्ट्रपती कोविंद यांची प्रार्थना

हवाई दलाच्या सुपर हर्क्युलसने तेरा पार्थिव दिल्लीमध्ये आणले

केरळ, तमिळनाडू सरकारकडून मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली

न्यायवैद्यक पथकाकडून तमिळनाडूतील दुर्घटनास्थळाची पाहणी

भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांकडून दुर्घटनास्थळाला भेट

‘यूएन’च्या सरचिटणीसांकडून हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत शोक व्यक्त

अमेरिका आणि इस्राईलकडूनही जनरल रावत यांना श्रद्धांजली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT