Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
विशेष

Ajit Pawar News : कुणी कितीही मोठ्या बापाचा असू द्या; त्यांना चांगले सटकावा : अजितदादांची पोलिसांना सूचना

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : कुणी कितीही मोठ्या बापाचा असू द्या, त्याने कायदा (Law) बिघडविण्याचा प्रयत्न केला; तर त्याच्यावर ॲक्शनही झालीच पाहिजे. असल्यांना सटकावलेच पाहिजे, असा सज्जड दम विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी येथे दिला. कोयता गॅंग, चड्डी गॅंग आणि अजून कसल्या गॅंग डोके वर काढत असतील तर त्यांना ठेचून काढण्यात पोलिसांनी (Police) कुठलीच कुचराई करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली. (Police should take strict action against violators of law : Ajit Pawar)

रांजणगाव गणपती येथे विविध विकास कामांच्या उद्‌घाटन कार्यक्रमास अजित पवार आले होते. त्यावेळी अजितदादांनी राज्य सरकारच्या कामकाजावर, धीम्या पद्धतीवर सडकून टीका केली. विशेषतः बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला धारेवर धरले.

पुण्यात कोयता गॅंगची दहशत पसरल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कठोर कारवाई करीत कोयता गॅंगच्या अनेक सदस्यांची धरपकड केली. या असल्या गॅंगचा विषय मी सभागृहासमोर आणला. कोयता गॅंगच्या मुद्द्यावरून सरकारला नागपूर अधिवेशनादरम्यान, सभागृहातच झापले. पोलिसिंग काही राहिले की नाही. कायद्यानूसार पोलिसांनी काम करायला नको का, असा सवाल विचारला. पण प्रशासन ढीम्मच असल्याचा आरोपही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

कायदा बिघडविण्याचा प्रयत्न कुणाकडून होत असेल तर तो कितीही मोठ्या बापाचा असू द्या, त्याला कायद्याचा बडगा हा दाखवलाच पाहिजे. कुणी कायदा हातात घेऊन मनमानी करीत असेल तर त्याच्याविरूद्ध कठोर कारवाई ही झालीच पाहिजे. असल्या प्रवृत्ती या सटकावल्याच पाहिजेत. अशा प्रवृत्ती जागच्या जागी रोखल्या, तरच पुरोगामी, सुसंस्कृत म्हणविणारा महाराष्ट्र व्यवस्थितपणे चालू शकेल, असेही त्यांनी पोलिस प्रशासनाला बजावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT