Dinvishesh 12 October Sarkarnama
विशेष

12th October in History : पाकिस्तानातली उलथापालथ, सुपरस्टार गजाआड!; इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?

Rashmi Mane

पाकिस्तानात राजकीय अस्थैर्य हे नवे नाही. इथे कधी राजकारणी देश चालवतात तर कधी पाकिस्तानी लष्कर. अशीच एक महत्त्वाची घटना १२ ऑक्टोबर १९९९ रोजी घडली होती. त्या दिवशी पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी तत्कालिन लष्करप्रमुख परवेझ मुशर्ऱफ यांना बडतर्फ केले.

नवाझ शरीफ श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना नवाझ शरीफ यांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर लगेचच पाकिस्तानी लष्कर सक्रीय झाले आणि त्याने उठाव केला. नवाझ शरीफ यांना त्यांच्याच निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले. लष्कराने इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीमधले विमानतळ ताब्यात घेऊन बंद केले.

पाकिस्तानात लष्करी राजवट येईल अशी भीती जगभर व्यक्त केली गेली. पण सुदैवाने त्यावेळी तसे झाले नाही. दोनच दिवसांनी पाकिस्तानात आणीबाणी लागू झाली. पण पाकिस्तानात असे काही होईल याचे बहुदा पाकिस्तानी जनतेला आश्चर्य वाटले नसावे. कारण लष्करशहांची परंपरा ही पाकिस्तानला नवी नव्हती. यापूर्वीही जनरल सिकंदर मिर्झा, जनरल आयुब खान, जनरल याह्याखान आणि जनरल झिया उल हक यांची कारकीर्द पाकिस्तानने पाहिली होती.

'जैश-ए-महंमद' वर अमेरिकेची बंदी

काश्मीरमध्ये होत असलेल्या अतिरेकी कारवाया ही भारताच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी आहे. आज या कारवायांवर बऱ्यापैकी नियंत्रण आले असले तरी वीस वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. अमेरिकेने पाकिस्तानला कायमच झुकते माप दिले. दुसरीकडे पाकिस्तानच्या 'आयएसआय' अतिरेकी संघटनांना खतपाणी पुरवले. 'जैश-ए-महंमद' ही यातली प्रमुख संघटना.

या संघटनेनेच २००१ मध्ये जम्मू-काश्मीरच्या विधानसभेवर आत्मघातकी हल्ला केला होता. संसदेवर झालेला हल्ला याच संघटनेने केला होता. त्यानंतरही २०१६ चा पठाणकोट हल्ला, २०१६ चा उरी हल्ला, २०१९ चा पुलवामा हल्ला या 'जैश'च्याच कारवाया होत्या.

२००१ मध्ये भारताने वारंवार मागणी केल्यानंतर अखेर अमेरिकेने १२ आॅक्टोबर २००१ रोजी 'जैश-ए-महंमद'वर बंदी घातल्याचे जाहीर केले. अमेरिका आणि ब्रिटनने ही संयुक्त कारवाई केली होती. ही बंदी घातल्यानंतर ब्रिटनने 'जैश'च्या मालमत्ता गोठवण्याचा आदेश दिला होता. आज संयुक्त राष्ट्रसंघासह अनेक देशांनी 'जैश'वर बंदी घातली असली तरीही या संघटनेच्या कारवाया थंडावलेल्या नाहीत.

12 October 2024 dinvishesh

दिनविशेष - १२ ऑक्टोबर

जागतिक नैसर्गिक आपत्ती निवारण दिन

1850 - अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरू.

1874 - फ्रान्सचे पंतप्रधान व प्रसिद्ध इतिहासकार प्येरुर गीयोम फ्रांस्वा गीझो यांचे निधन. त्यांनी साहित्य, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र यांवर विपुल लेखन केले आहे.

1921 - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे, गोवा मुक्ती लढ्याचे एक झुंझार सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू , विधान परिषदेचे माजी सभापती व ज्येष्ठ पत्रकार जयंतराव टिळक यांचा जन्म. राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता तसेच तत्त्वज्ञान, विज्ञान, निसर्ग आणि शिकार आदी विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी दीर्घकाळ काम केले.

1964 - एका अंतराळातून तीन प्रवासी पाठविण्याच्या पहिल्या प्रयत्नात रशियाला यश. त्यापाठोपाठ पाच प्रवासी असलेले अंतराळयान सोडण्यात आले. त्यामुळे एका वेळी दोन याने व आठ अंतराळप्रवासी असा विक्रम केला गेला.

1967 - नामवंत समाजवादी नेते, विचारवंत, लेखक, संसदपटू डॉ. राममनोहर लोहिया यांचे निधन. ते स्वतः इंग्रजीचे उत्तम जाणकार होते. मात्र त्यांना इंग्रजीची गुलामी मान्य नव्हती. "अंग्रेजी हटाओ' ही चळवळ त्यांनी चालविली होती. लोकसभेतील प्रभावी वक्ते म्हणून ते ओळखले जात.

1999- शिवसेना नेते व माजी खासदार वामनराव महाडिक यांचे निधन

2000 - चार अयशस्वी प्रयत्नानंतर अमेरिकेच्या डिस्कव्हरी अवकाशयानाचे यशस्वी उड्डाण. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे अवकाशस्थानक तयार करण्याच्या तयारीचा एक भाग म्हणून हे उड्डाण करण्यात आले.

2001 - संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT