<div class="paragraphs"><p>Pradip Kand</p></div>

Pradip Kand

 

sarkarnama

विशेष

अशोक पवारांनी धोका ओळखून फिल्डिंग लावली; पण कंदांनी विजयाची संधी साधलीच!

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत ड वर्ग मतदारसंघातून (पतसंस्था प्रवर्ग) जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद (pradip kand) यांनी मिळविलेले विजय राष्ट्रवादीचे शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार (ashok pawar) यांना राजकीय धक्का देणारा ठरला आहे. प्रदीप कंद यांनी विजय मिळवताच त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी ‘भावी आमदार’ अशा घोषणा देत त्यांना खांद्यावर घेऊन जल्लोष केला. (Pradip Kand's victory gives a political shock to Ashok Pawar)

पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत ‘अ’ वर्ग मतदार संघात शिरूर तालुक्‍यातून आमदार ॲड. अशोक पवार यांनी एकतर्फी विजय संपादन केला आहे. मात्र, ‘ड’ वर्ग मतदार संघातून त्यांचे कट्टर विरोधक असलेले कंद यांनी मिळविलेला अनपेक्षित विजय पवार यांना राजकीयदृष्टीने धक्का देणारा ठरला आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या कंद यांनी बाबूराव पाचर्णे यांच्या पाठीशी आपली भक्कम ताकद उभी करीत पवार यांच्या पराभवासाठी जंग जंग पछाडले. मात्र, त्यात त्यांना अपयश आले होते. ही बाब पवारांनाही चांगलीच ठाऊक असल्याने त्यांनीही राजकीय वाटचालीत पुढे कंद यांना ‘टार्गेट' केले होते.

दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत प्रदीप कंद हे भाजपकडून रिंगणात उतरले होते. भविष्यातील आव्हान लक्षात घेऊन कंद यांच्या पराभवासाठी पवार यांनी फिल्डींग लावली होती. परंतु, स्वतःच्या निवडणुकीत अडकून पडल्याने पवार यांचा ‘क’ वर्ग मतदार संघातील प्रचाराकडे काहीसा काणाडोळा झाला होता. त्याचा लाभ प्रदीप कंद यांना होऊन त्यांच्या पदरात विजयश्री पडली.

प्रदीप कंद विजयी होताच, त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी ‘भावी आमदार’ च्या घोषणा देत त्यांना खांद्यावर उचलून घेऊन जल्लोष केला. त्यामुळे कंद यांचा हा विजय एकाअर्थी आमदार पवार यांना सावधानतेचा इशारा मानला जात आहे. आता कंद यांचे भविष्यात मिळणारे आव्हान आमदार पवार कसे मोडीत काढतात, याकडे शिरूर हवेलीचे लक्ष असणार आहे.

प्रदीप कंद यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्हा बॅंकेत झालेला प्रवेश कार्यकर्त्यांना दिलासा देणारा ठरणार आहे. पण अशोक पवार आणि प्रदीप कंद यांच्या रूपाने शिरूर-हवेलीतून दोन संचालक ही सामान्य मतदारांना दिलासा देणारी बाब ठरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT