C.R.Patil |Gujrat BJP
C.R.Patil |Gujrat BJP 
विशेष

Chandrakant Patil News : चंद्रकांत पाटलांची कमाल : भाजपला मिळवून दिले ऐतिहासिक यश

सरकारनामा ब्युरो

Gujarat Election Results 2022 : भारतीय जनता पक्षाची (BJP) गुजरात विधानसभा निवडणुकीत आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक जागा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. भाजपाचे हे यश मूळच्या नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील मराठी माणसाच्या नेतृत्वाखाली मिळत आहे हे विशेष. पक्षाचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील (चंद्रकांत पाटील) हे मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील तळाद्याचे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली. पाटील हे पंतप्रधान मोदी यांच्या अत्यंत जवळचे व विश्‍वासू मानले जातात. या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी पाटील यांच्यावर होती.

१९८५ च्या दरम्यान पाटील यांचे कुटुंब तळोद्यातून गुजरातला गेले. तिथे गेल्यानंतर कालांतराने सी.आर. पाटील गुजरात पोलिसांत भरती झाले. त्यांनतर नोकरीचा राजीनामा देऊन भाजपाचा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरवात केली. काम करता-करता त्यांच्या यशाची कमान वाढत गेली. पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांना मिळत गेल्या. नवसारीतून ते सलग चौथ्यांदा खासदार आहेत. दरवेळी ते आधीच्या मतांपेक्षा अधिक मतांच्या फरकाने निवडून येतात हे त्यांचे विशेष आहे. संसदेतील त्यांचे कार्यालय आदर्श आहे. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्टय मानले जाते. पंतप्रधान मोदींनीदेखील त्यांच्या संसदेतील कार्यालयाचे आणि कामाच्या पद्धतीचे कौतुक केले आहे.

पडद्यामागे राहून काम करणे. प्रसिद्धीपासून कटाक्षाने दू राहणे ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. पुढे न येता पडद्यामागे राहून पंतप्रधान मोदी सांगतील त्याप्रमाणे कामाची अत्यंत काटेकोर अंमलबजावणी करणे ही त्यांची कामाची पद्धत राहिली आहे. प्रचंड संघटन कौशल्य हे सी.आर. पाटील यांचे आणखी एक विशेष मानले जाते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात ते पंतप्रधान मोदी यांच्या विश्‍वासाला पात्र ठरले आहेत. ते गुजरातचे प्रदेशाध्यक्ष असले तरी मूळचे मराठी आहेत.त्यामुळे एका मराठी माणसाने गुजरात निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना यश मिळवून दिले आहे हे निश्‍चित.

गुजरात विधानसभेच्या इतिहासात इतके प्रचंड यश कोणत्याच राजकीय पक्षाला मिळालेले नाही. यापूर्वी माधवसिंह सोळंकी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसला सर्वाधिक १४९ जागा मिळाल्या होत्या.खुद्द मोदींनादेखील १२७ पेक्षा जास्त जागा कधी मिळाल्या नव्हत्या. आता सुरू असलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार भाजपा १५० जागांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.१४९ पेक्षा अधिक जागांवर भाजपाला यश मिळाले तर हे यश भाजपाचेच नव्हे तर कोणत्याही राजकीय पक्षाचे गुजरातमधील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT