Pune Police Commissioner Amitesh Kumar Sarkarnama
विशेष

Pune Hit and Run Case : 'जनरेटा' वाढला की पोलिस आणि सरकारही 'सरळ' होतात, पण...

अय्यूब कादरी

Pune Car Accident : पोलिसांच्या वाट्याला फार कमी वेळा कौतुक येते. पोलिसांवर सातत्याने टीका केली जाते. कारणेही तशीच असतात. आता पुन्हा एकदा राज्यभरातून पोलिसांवर टीकेचा भडीमार केला जात आहे. यावेळी कारण ठरले आहे पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणातील त्यांची संशयास्पद भूमिका. पोलिस गरीबांना वेगळी आणि श्रीमंतांना वेगळी वागणूक देतात, असा समज समाजात रूढ झाला आहे. तो बऱ्याच प्रमाणात खराही आहे. जनरेटा वाढला तर पोलिस आणि सरकारही 'सरळ' होतात, हे पुण्याच्या प्रकरणावरून दिसून आले आहे.

पुण्यातील 'हिट अँड रन' Hit and Run Case प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची पोलिसांनी बडदास्त ठेवल्याचा आरोप केला जात आहे. बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असलेल्या वेदांत अगरवाल याने आपल्या आलिशान पोर्शे कारने दुचाकीवरील तरुण तरुणीचा जीव घेतला. तो पबमधून उशीरा बाहेर आला होता. त्याच्या पोर्शेने दुचाकीला धडक दिली. या प्रकरणानंतर पब संस्कृती, नाइट लाइफ यावरून घमासान सुरू झाले आहे. पुण्यातील राजकीय नेते एकमेकांना भिडू लागले आहेत. पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे हे प्रकरण देशभरात गाजले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनीही या प्रकरणाची दखल घेतली. विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेले पुणे आता कशाचे माहेरघर होत आहे, असा प्रश्न राज्यभरातून उपस्थित केला जाऊ लागला आहे. गाव-खेड्यांतील समाजमाध्यमांवरील ग्रुपवरही 'निबंधा'ची चर्चा सुरू झाली.

वेदांत अगरवारल या आरोपीला तातडीने जामीन मिळाला. जामीन देणाऱ्या यंत्रणेने त्याच्याकडून निबंध लिहून घेतला, असे सांगितले जाऊ लागले. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याला पिझ्झा, बर्गर देण्यात आला, अशीही वार्ता गावोगावी पोहोचली. ही दुर्घटना झाली त्या रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा पवार गट) आमदार सुनील टिंगरे येरवडा पोलिस ठाण्यात हजर होते. त्यांनी आरोपीला वाचवण्यासाठीच पोलिस ठाण्यात धाव घेतल्याची चर्चा रंगू लागली. पोलिस आणि राजकीय नेत्यांचे कनेक्शन अशा वाईट पद्धतीने समोर आले. त्यामुळे लोकांमध्ये चीड निर्माण झाली. एखादा साधा माणूस ठाण्यात आला तर त्याला पोलिस कर्मचारी, अधिकारी व्यवस्थित बोलतही नाहीत. त्यांच्या अशा चीड आणणाऱ्या वागण्याचे अनेक लोक साक्षीदार आहेत. धाक गुन्हेगारांना दाखवण्याऐवजी पोलिस तो सामान्य नागरिकांना दाखवतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणात पोलिसांबद्दल समाजमाध्यमांत अनेकांनी आवाज उठवला. प्रकरणाने गंभीर वळण घेतले. त्यामुळे मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याला धाव घेतली. ते पोलिस आयुक्तालयात गेले, त्यांनी पोलिसांना सूचना केल्या, आदेश दिले. मात्र पोलिसांकडून इतका निष्काळजीपणा झालाच कसा? पोलिस आय़ुक्तांच्या परवानगीशिवायच पोलिस या प्रकरणात असे वागले का, या प्रश्नाची उत्तरे लोकांना मिळायला हवीत. विनानंबरची पोर्शे कार रस्त्यावर कशी धावत होती, असेही प्रश्न लोकांना समाजमाध्यमांत उपस्थित करण्यात आले. मालवाहतूक करणाऱ्या ट्रक, छोट्या वाहनांची सातत्याने कोंडी करण्यासाठी सज्ज राहणारा 'आरटीओ'ला ही पोर्शे दिसली नसेल का, यावरून पोलिसांसह आरटीओचे अधिकारीही लोकांच्या निशाण्यावर आले. लोकांच्या या सजगतेने सरकारला हादरवून टाकले. भल्या पहाटे पोलिस ठाण्यात धाव घेतलेल्या आमदाराला त्यामुळेच आता खुलाशांवर खुलासे द्यावे लागत आहेत.

ही दुर्घटना पुण्यात घडली. पुण्यापासून 500 किलोमीटरील गावांमधील नागरिकही त्याबाबत बोलू लागले. स्थानिक पोलिसांवर टीका करू लागले. त्यांच्या कारभारातील उणीवांवर बोट ठेवू लागले. पुण्यात पोर्शे ही महागडी कार असेल, पण गावोगावी अल्पवयीन मुलांच्या दुचाकी आहेत. त्याही भरधाव असतात. नियमाचे पालन करत नाहीत. उमरग्यासारख्या (जि. धाराशिव) शहरात पोलिस ठाण्यासमोरून अल्पवयीन मुले दुचाकीवर ट्रिपल सीट बिनधास्त जात असतात. अशा अल्पवययीन मुलांना पोलिसांनी अडवून त्यांच्यावर कारवाई केल्याचे दृश्य कधीही दिसलेले नाही. उमरगा हे प्रातिनिधक उदाहरण आहे. ग्रामीण भागांत गावोगावी असे चित्र दिसून येते. पोलिस काय करतात, असा प्रश्न आहे. पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणानंतर लोक आता या प्रश्नांचे उत्तर मागू लागले आहेत. लोकरेट्यामुळे पुण्याचे पोलिस नंतर का होईना 'सरळ' झाले. आता ग्रामीण भागातील लोकांनीही रेटा वाढवायला हवा.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT