Rahul Kul-Ramesh Thorat
Rahul Kul-Ramesh Thorat Sarkarnama
विशेष

Kul Vs Thorat : राहुल कुलांनी कुठलाच शब्द पाळला नाही...त्यांची चौकशी झाली पाहिजे : रमेश थोरातांनी संधी साधली

सरकारनामा ब्यूरो

पुणे : भीमा-पाटस कारखान्याच्या संदर्भाने शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्यावर केलेले आरोप एकदम खरे आहेत. कुल अध्यक्ष असलेल्या भीमा पाटस कारखान्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे १७९ कोटी रुपये थकलेले आहेत. बॅंकेचे पैसे भरल्याशिवाय कारखाना चालू करणार नाही, असा शब्द त्यांनी दिला होता. पण, कुलांनी कुठलाच शब्द पाळला नाही, त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार रमेश थोरात (Ramesh Thorat) यांनी केली. (Rahul Kul should be investigated : Ramesh Thorat)

राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्यात ५०० कोटींचा गैरव्यवहार केला आहे. त्यांची ईडी, सीबीआयकडून चौकशी झाली पाहिजे, अशा मागणीचे पत्र राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. त्यानंतर दौंड तालुक्यातील कुल यांचे राजकीय विरोधक माजी आमदार थोरात हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी राऊतांच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

ते म्हणाले की, भीमा पाटस कारखान्याबाबत संजय राऊत यांनी केलेले आरोप सत्य आहेत. कारण, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि भीमा पाटस कारखान्याचा १९७९ पासूनचा संबंध आहे. राहुल कुल यांच्या ताब्यात असलेल्या भीमा पाटस कारखान्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सुमारे १७९ कोटी रुपये थकलेले आहेत. त्यांच्याकडे वारंवार मागणी करूनही त्यांनी आज देतो, उद्या देतो म्हणत पैसे भरलेले नाहीत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे पैसे भरल्याशिवाय कारखाना चालू करणार नाही, असा शब्दही कुल यांनी दिला होता. पण कुठलाच शब्द त्यांनी पाळलेला नाही.

राहुल कुल यांनी एका एका ट्रॅक्टरवर पाच पाच बॅंकांचे कर्ज काढलेले आहे आणि तुम्ही सोडून कोणत्याही बॅंकेचे कर्ज घेतले नाही, असे हमीपत्र त्यांनी प्रत्येक बॅंकेला दिलेले आहे. यावरून तो भ्रष्टाचार आहे की नाही, त्वरित सिद्ध होते. अनेक गोष्टी अशा आहेत की ईडी, सीबीआय किंवा कोणत्याही संस्थेने चौकशी केली तर त्या उघड झाल्याशिवाय राहणार नाहीत. संजय राऊत यांनी जाहीर केल्याप्रमाणे राहुल कुल यांची चौकशी व्हावी, अशी माझीही मागणी आहे, असेही रमेश थोरात यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT