Gopal Mhaske-Ramchandra Thombre
Gopal Mhaske-Ramchandra Thombre Sarkarnama
विशेष

थेट अजितदादांना आव्हान देणारी ठोंबरे-म्हस्केंची जोडी तब्बल ४० वर्षांनंतर फुटली!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी, Katraj Dairy) राजकारणात कायम मुख्य भूमिकेत असलेले ज्येष्ठ संचालक रामचंद्र ठोंबरे आणि गोपाळ म्हस्के यांची जोडी तब्बल ४० वर्षांनंतर फुटली. गोपाळ म्हस्के यांनी सलग नवव्यांदा निवडणूक जिंकली. मात्र, ठोंबरे यांच्याविरोधात त्यांचाच भाचा मैदानात उतरल्याने त्यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. त्यामुळे ‘दो हंसो को जोडा’ म्हणून ओळखली जाणारी ठोंबरे-म्हस्के यांची जोडी १९८२ नंतर दूध संघात प्रथमच दिसणार नाही. (Ramchandra Thombre-Gopal Mhaske pair break up after 40 years at Katraj Dairy)

कात्रज डेअरीच्या बऱ्या-वाईट काळात ही जोडी कायम खांद्याला खांदा लावून काम करायची. थेट पक्षनेतृत्वाला आव्हान देऊन या जोडगोळीने जिल्हा दूध संघाचे राजकारण गाजवले आहे. चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनाही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (ncp) राहून त्यांनी अनेकदा चॅलेंज देण्याची भूमिका घेतलेली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा दूध संघावर एकहाती वर्चस्व असूनही अजित पवार यांनी सुचविलेल्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराचा या जोडगळीने पराभव करत आम्ही म्हणजेच कात्रज डेअरी याचा प्रत्यय दिला आहे.

ठोंबरे आणि म्हस्के यांनी डेअरीचा नफा बचत खात्यात न ठेवता, ती रक्कम मुदतठेवी म्हणून ठेवायच्या आणि त्यावर व्याज मिळवायचे ही संकल्पना १९९५ मध्ये पहिल्यांदा संचालकांसमोर मांडून त्याची अमलबजावणी सुरू केली. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे संघाच्या १९९५ मध्ये लाखा असलेल्या ठेवी आजअखेर तब्बल ५६ कोटींपर्यंत पोचल्या आहेत. दूध संघाला २००९-१० या वर्षात तोटा झाला होता. तो भरून काढण्यासाठी ज्येष्ठ व अनुभवी या नात्याने या दोघांपैकी एकाला कात्रज डेअरीचे अध्यक्ष करावे, अशी मागणी या दोघांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली होती. त्यांची ही मागणी फेटाळून लावत पवार यांनी अध्यक्षपदासाठी मावळ तालुक्यातील बाळासाहेब नेवाळे यांना संधी दिली होती. पण, या जोडगोळीने अवघ्या दोन मतांच्या बळावर नेवाळे यांचा पराभव घडवून आणला होता. तेव्हा गोपाळ म्हस्के हे अध्यक्ष बनले होते.

कात्रज डेअरीत म्हस्के हे हवेलीतून आणि ठोंबरे मुळशीतून १९८२ मध्ये एकाचवेळी निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ते सलग आठ वेळा निवडून आले आहेत. म्हस्के हे यंदाच्या नवव्या पंचवार्षिक निवडणुकीतही बिनविरोध निवडून आले आहेत. ठोंबरे यांना सख्ख्या भाच्यानेच आव्हान दिले. त्यामुळे ठोंबरे मतदानाच्या पूर्वसंध्येला निवडणूक रिंगणातून माघार घेत, भाच्याला पाठिंबा दिला. त्यामुळे ठोंबरे हे तब्बल ४० वर्षांनंतर संघातून बाहेर गेले आहेत.

म्हस्केंनी टाळला ठोंबरेंच्या घरातील कलह!

मुळशी तालुक्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने रामचंद्र ठोंबरे यांच्याऐवजी त्यांचा भाचा कालिदास गोपाळघरे यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. त्याउपरही ठोंबरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण, जिवलग मित्राची उतारवयात पक्षातून हकालपट्टी होऊ नये आणि कौटुंबिक कलह टाळला जावा, यासाठी गोपाळ म्हस्के यांनीच पुढाकार घेतला. मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांनी थेट ठोंबरे यांचे घर गाठले. भाचा गोपाळघरे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी ठोंबरे यांचे मन वळविले. त्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना फोन करून ठोंबरे यांनी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे सांगितले. ठोंबरे यांचा उतारवयात होणार संभाव्य पराभव आणि बंडखोरीमुळे पक्षातून होणारी हकालपट्टी म्हस्के यांनी टाळली आहे. येथेही एक मित्रच दुसऱ्या मित्राच्या मदतीला धावून गेल्याचे दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT