Ramdas Athawale Party RPI News : अधिकृत चिन्ह नसल्यानं भाजपच्या 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या रिपाइं आठवले गटाला 'ऊसधारक शेतकरी' हे नवं चिन्ह मिळालं आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. यानंतर आज (25 ऑगस्ट) पुण्यात पक्षाचा महामेळावा होणार होता आणि पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते नवीन निवडणूक चिन्हाचं लोकार्पणही होणार होतं. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे.
महायुतीतील घटक पक्ष म्हणून आपल्या पक्षाला 12 ते 15 जागा मिळाव्यात, अशी मागणी या मेळाव्यात करण्यात येणार होती. प्राप्त माहितीनुसार पुण्यातील वडगाव शेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट या दोन जागांवर पक्षानं दावा केला असून पिंपरीच्या जागेसाठीही पक्ष आग्रही आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळात 2016 पासून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री असलेल्या रामदास आठवले यांनी 1999 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) मधून बाहेर पडून रिपाइं आठवले गट या पक्षाची स्थापना केली. 2004 पासून या पक्षानं निवडणूक लढवायला सुरुवात केली.
2004 च्या विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुका पक्षानं पहिल्यांदाच लढवल्या. त्यात पुणे जिल्ह्यातील बोपोडी, वडगाव आणि आंबेगाव या 03 जागांसह विधानसभेच्या 20 जागा तर लोकसभेच्या पंढरपूर या एकमेव जागेचा समावेश होता. विधानसभेच्या 20 जागा पक्षानं लढल्या. परंतु, 20 पैकी एकाही जागेवर यश काही मिळालं नाही. लोकसभेची एकमेव जागा लढलेले रामदास आठवले(Ramdas Athawale) मात्र पंढरपूरमधून विजय मिळवत खासदार बनले. त्यांनी भाजपच्या नागनाथ क्षीरसागर यांचा पराभव केला.
2009 मध्ये रिपाइं(RPI) आठवले गटानं पुन्हा एकदा विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुका लढवल्या. त्यात पुणे जिल्ह्यातील 10 जागांसह विधानसभेच्या 79 जागा तर लोकसभेच्या शिर्डी या एकमेव जागेचा समावेश होता. परंतु, 79 पैकी एकाही जागेवर पक्षाला यश मिळालं नाही. तिकडं लोकसभेची एकमेव जागा लढलेले रामदास आठवले देखील शिर्डीमधून पराभूत झाले. शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांचा पराभव केला.
2014 मध्ये रिपाइं आठवले गटानं तिसऱ्यांदा विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुका लढवल्या. त्यात पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी आणि पिंपरी या 02 जागांसह विधानसभेच्या 05 जागा तर लोकसभेच्या सातारा या एकमेव जागेचा समावेश होता. परंतु, 05 पैकी एकाही जागेवर पक्षाला यश मिळालं नाही. तिकडं लोकसभेची एकमेव जागा लढलेले अशोक गायकवाड देखील साताऱ्यातून पराभूत झाले. राष्ट्रवादीच्या श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांचा पराभव केला.
रामदास आठवले यांनी 1990 ते 1996 या काळात विधानपरिषदेचे आमदार होते. दरम्यानच्या काळात त्यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री म्हणून काम पाहिलं. त्यानंतर 1998 मध्ये त्यांनी दादर (आताच मुंबई उत्तर मध्य) लोकसभा मतदारसंघातून रिपाइं पक्षाकडून निवडणूक लढली आणि ते जिंकून आले. शिवसेनेच्या नारायण आठवले यांचा त्यांनी पराभव केला. 1999 मध्ये त्यांनी पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकलीसुद्धा! या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या नागनाथ क्षीरसागर यांचा पराभव केला. 2004 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून स्वत:च्या पक्षातून (रिपाइं आठवले गट) पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि विजयी झाले.
या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या(BJP) नागनाथ क्षीरसागर यांचा पराभव केला. 2009 मध्ये मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्यापासून फारकत घेत भाजप-शिवसेना युतीसोबत जाणं पसंत केलं. 2014 पासून ते राज्यसभेचे खासदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात 2016 पासून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.
सलग 03 विधानसभा लढूनही केवळ एकमेव आमदार निवडून आणता आलेल्या या पक्षाला हे नवं चिन्ह तारणार का? चिन्ह मिळालं, पण विजय मिळणार का, हा खरं तर प्रश्न आहे. आता 'कमळ' अथवा इतर चिन्हांवर न लढता अधिकृत चिन्हावर लढण्याची संधी उमेदवारांना मिळाली आहे. महायुतीकडून पुरेशा जागा पक्षाच्या वाट्याला आल्यास 'ऊसधारक शेतकरी' रिपाइं आठवले गटाला विधानसभेची वारी घडवणार का, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. एकूणच काय तर रामदास आठवले यांच्या कवितेच्या स्वरूपात म्हणायचं झालं तर नवे चिन्ह घेऊन आले आठवले, युतीचे 'टेन्शन' वाढवले, असं काहीसं म्हणावं लागेल.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.