Sanjay Raut & Ravi Rana
Sanjay Raut & Ravi Rana Sarkarnama
विशेष

संजय राऊतांबरोबरील लेह-लडाखमधील भेटीबाबत आमदार रवि राणा प्रथमच म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

अमरावती : राज्यातील एखादा नेता जेव्हा लेह-लडाखमध्ये शासकीय दौऱ्यात भेटतो, तो दोन पाऊले पुढे येऊन आमच्याशी बोलतो, आम्ही त्यांच्याशी बोलतो, भेटतो. तो काही गुन्हा नाही. यामध्ये तुम्हाला मिरची लागण्याचे काहीच कारण नाही. कारण, तुम्ही केले ते सत्य आणि आम्ही केलं ते असत्य, असं तुम्ही समजत असाल. पण, राज्यातील जनता सर्वकाही समजते, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना उत्तर देत आमदार रवि राणा (Ravi Rana) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासोबत लेह लडाखमध्ये झालेल्या भेटीवर प्रथमच भाष्य केले. (Ravi Rana's first commentary on his visit to Leh Ladakh with Sanjay Raut)

सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एक टीम शासकीय दौऱ्याच्या निमित्ताने नुकतीच लेह लडाखला भेट देऊन आली. त्यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा यांचा समावेश होता. त्या दौऱ्यात राऊत हे कधी रवि राणा, तर कधी नवनीत राणा यांच्याशी चर्चा करताना दिसून आले होते. त्याचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाले होते.

तत्पूर्वी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या मुद्यावरून राणा दांपत्य आणि शिवसेना आमने सामने आले होते. राणा दांपत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडवट शब्दांत टीका केली होती. तसेच राणा दांपत्यावर राजद्रोहाचे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळ संजय राऊत आणि राणा दांपत्य यांच्यातील भेटीमुळे काहीसे कुतूहल निर्माण झाले होते.

राज ठाकरे यांनी आजच्या पुण्यातील सभेत त्याचा उल्लेख केला. त्यामुळे आमदार रवि राणी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यातील एखादा नेता पुढे येऊन तुम्हाला बोलत असेल आणि आम्हीही त्यांच्याशी बोललो तर त्यात गुन्हा काय असा प्रश्न राणा यांनी राज ठाकरे यांना विचारला आहे. तसेच, त्यांना पुण्यातील २०१८ मधील शरद पवरांची राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा संदर्भ दिला आहे. पुण्यात तुम्ही २०१८ मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सन्मान केला होता, त्यांचा हात धरून तुम्ही त्यांना स्टेजवर नेले होते, हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे, असेही राणा यांनी राज ठाकरे यांना सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT