Sammed Shikhar Controversy | झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील जैनांचे सर्वोच्च तीर्थक्षेत्र असलेल्या पारसनाथ टेकडी सम्मेद शिखर'ला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून देश-विदेशात केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात मोठा जनक्षोभ उफाळला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ जैन भिक्षू कोग्नया सागर जी यांनी मंगळवारी (३ जानेवारी) राजस्थानच्या सांगानेरमध्ये उपोषण करत देहत्याग केला. त्यामुळे जैन धर्माच्या अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दुसरीकडे या वादावरून राजकारणही तापायला सुरुवात झाली आहे. झारखंडमधील सरकारचे नेतृत्व करणाऱ्या झारखंड मुक्ती मोर्चाने या वादाला भाजपचे (BJP) 'पाप' म्हटले आहे, तर दुसरीकडे झारखंडमधील सरकारच्या आडमुठेपणामुळे लाखो जैन धर्मीयांच्या श्रद्धेला तडा जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. पण हा सम्मेद शिखराचे महत्त्व काय आहे, या जागेवरून निर्माण झालेल्या वादाचे नक्की कारण काय आहे आणि याची क्रोनेलॉजी नक्की काय आहे,हा वाद मिटवण्याचे मार्ग काय आहेत हेही माहिती असणे महत्त्वाचे आहे.
इतिहास-भूगोल आणि सम्मेद शिखराचे महत्त्व :
सम्मेद शिखर हे ठिकाण झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात आहे. भौगोलिकदृष्ट्या, ही झारखंडची सर्वात उंच टेकडी आहे. जी सामान्यतः पारसनाथ टेकडी म्हणून ओळखली जाते. या टेकडीची उंची जवळपास एक हजार 350 मीटर आहे. या टेकडीला झारखंडचा हिमालय म्हणून ओळखले जाते. जगभरातील जैन समाज या टेकडीला श्री शिखर जी आणि सम्मेद शिखर म्हणून ओळखतात. ही टेकडी जैन समाज बांधवांचे तीर्थक्षेत्र आहे. या टेकडीच्या पायथ्याशी वसलेले शहर मधुवन म्हणून ओळखले जाते.
जैन धर्मात एकूण २४ तिथंकर (जैन गुरु) होते. यापैकी 20 तीर्थंकरांनी येथे तपश्चर्या करताना आपल्या देहाचा त्याग केला. भगवान पार्श्वनाथ, 23 वे तीर्थंकर देखील त्यांच्यामध्ये होते. या शिखरावर भगवान पार्श्वनाथाचे गड आहे. पार्श्वनाथाचे प्रतीक साप आहे. त्यांच्या नावावरून या ठिकाणाला पारसनाथ हे नावही पडले आहे. याला 'सिद्ध क्षेत्र' म्हणतात. जैन धर्मात तीर्थराज म्हणजे 'तीर्थक्षेत्रांचा राजा'. येथे दरवर्षी लाखो जैन भाविक येतात. मधुवनातील मंदिरात पूजा करून ते टेकडीच्या शिखरावर जातात. मधुवन ते शिखर म्हणजे डोंगरमाथ्यापर्यंतचा प्रवास हा नऊ किलोमीटरचा आहे. जंगलांनी वेढलेल्या पवित्र पर्वताच्या शिखरावर जाण्यासाठी भाविक पायी किंवा पालखीतून जातात.
पर्यटन स्थळ म्हणून मान्यता देण्यास विरोध का?
केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने पारसनाथ टेकडीचा एक भाग वन्यजीव अभयारण्य आणि इको-सेन्सेटिव्ह झोन म्हणून घोषित केला आहे. तर झारखंड सरकारने आपल्या पर्यटन धोरणात हे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. पण या ठिकाणाला पर्यटन स्थळ घोषित केल्यास त्याचे पावित्र्य भंग होईल, असे जैन धर्मीयांचे म्हणणे आहे. लोक पर्यटनाच्या उद्देशाने येथे आले तर मांसाहारासारख्या अनैतिक कृत्यांमध्ये वाढ होऊन अहिंसक जैन समाजाच्या भावनेला धक्का पोहोचेल. म्हणूनच ते तीर्थक्षेत्र राहू द्यावे. केंद्र आणि राज्य सरकारने पर्यटन स्थळ घोषित करण्यासाठी जारी केलेली अधिसूचना मागे घेण्यात यावी. या मागणीबाबत गेल्या महिनाभरापासून जैन अनुयायांच्या मूक निदर्शनाची प्रक्रिया देश-विदेशात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.