सतेज पाटील आणि महाडिक यांच्यातील वाद: कोल्हापुरातील सतेज पाटील व धनंजय महाडिक यांच्यातील जुना राजकीय संघर्ष गैरसमजांमुळे निर्माण झाल्याचे खुलासे सतेज पाटलांनी केले.
गैरसमजातून मैत्रीत दरी: 2009 साली उमेदवारीच्या मुद्द्यावरून गैरसमज निर्माण झाला आणि त्यातून राजकीय वैराला सुरुवात झाली.
गोकुळ दूध संघातील राजकारण: सतेज पाटलांनी सांगितले की सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी असून, गोकुळ व बँकेच्या अध्यक्षपदासाठी घेतलेले निर्णय सहकारी तत्वांवर आधारित होते.
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक आणि पाटील यांच्यातील वाद राज्याला सर्वश्रुत आहे. काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. अनेक वेळा या दोघांची राजकीय वैर कार्यकर्त्यांच्या जीवावर देखील उठले आहे. मात्र मुन्ना महाडिक आणि बंटी पाटील यांची मैत्री अगदी घट्ट होते. मग या मैत्रीला कुणाची नजर लागली, असा सवाल अनेकांना पडतो.
एकेकाळचे जिवलग मित्र असलेले मुन्ना पाटलांचे कट्टर वैरी का झाले? असाही सवाल अनेकांना पडतो. याचे उत्तर आता खुद्द सतेज पाटलांनीच दिले आहे. एका गैरसमजाने या दोघांच्या मैत्रीत दरी निर्माण झाली, हे नक्की.
सतेज पाटील यांची विशेष मुलाखत 'सरकारनामा'ने घेतली आहे. यात त्यांनी सविस्तर याविषयी सांगितले आहे. "2004पर्यंत आम्ही दोघांनीही एकत्र निवडणूक लढवली. पण 2009 नंतर लोकसभेला स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या विरोधात त्यांना उमेदवारी हवी होती. पण ती उमेदवारी संभाजीराजे छत्रपती यांना मिळाली. उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय पक्षीय पातळीवर झाला होता. परंतु हा निर्णय मी घेतला, त्याचा पुढाकार मी घेतला असे काहीजणांनी त्यांना सांगितले. मात्र आम्ही एकत्र होतो त्यामुळे हा निर्णय मी घेणे शक्य नव्हते. त्यातून गैरसमज वाढत गेला. त्यातून राजकीय विरोधाला सुरुवात झाली," असे सतेज पाटलांनी सांगितले.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी केली. लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले. पण तीन महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात बंधू अमल महाडिक यांना उमेदवारी दिली. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याच मार्गदर्शनाखाली ते काम करतात, असे सतेज पाटील म्हणाले.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीच्या राजकारणातील गोंधळाबाबत सतेज पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गोकुळ दूध संघ व जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक वाहिन्या आहेत. या दोन्ही संस्था शेतकऱ्यांना समृद्ध करतात. दर आठ दिवसाला 70 ते 80 कोटीची उलाढाल 5 लाख शेतकऱ्यांना मोबदला देते. वार्षिक पाच ते सहा हजार कोटीची उलाढाल दुधामुळे होते. 7000 कोटीची उलाढाल ऊसामुळे होते. या दोन्हीही सहकारी संस्था शेतकऱ्यांशी निगडित आहेत. प्रत्येकाला वाटते की थेट शेतकऱ्यांसोबत आपला कनेक्ट असावा.
दोन्ही संस्था राजकीय फायद्याच्या आहेत का? असे म्हणता येणार नाही. शेतकरी हा सहकार आणि राजकारणात वेगळा निर्णय घेत असतो. अध्यक्ष निवडीत जे झालं ते योग्य नव्हतं. अरुण डोंगळे यांनी तो विषय राज्यस्तरावर नेला. पण शेवटी सहकार म्हणून आम्ही एकत्र निर्णय घेत असतो. राज्य सरकारने यात हस्तक्षेप केला असला तरी शाहू परिवर्तन आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे आघाडीचाच अध्यक्ष झाला, असे सतेज पाटील यांनी सांगितलं. Edited by: Mangesh Mahale