Aryan Khan Fans Twitter
विशेष

आर्यन खानच्या पाठीराख्यांनो, "थोडी तो भी शर्म करो"

आर्थर रोड कारागृहाच्या बाहेर शाहरुख खान आणि आर्यनच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

ऋषीकेश नळगुणे

अभिनेता शाहरुख खानची २६ दिवसांपासूनची मन्नत पुर्ण झाली आणि त्याचा मुलगा आर्यन खान आज सकाळी आर्थर रोड कारागृहातुन बाहेर आला. खरंतर तो काल संध्याकाळीच बाहेर येणार होता पण सुटकेचे कागद योग्य वेळेत अधिकाऱ्यांना न मिळाल्यामुळे हा उशीर झाला होता. मात्र आता तो तुरुंगातुन सुटला आहे. आर्यन खान बाहेर येतेवेळी आर्थर रोड कारागृहाच्या बाहेर शाहरुख खान आणि आर्यनच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तिथे बराच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शाहरुखच्या 'मन्नत' बाहेरही चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यातील काहींनी तर आनंदाच्या भरात फटाके फोडून आर्यन खानचे धुमधडाक्यात स्वागत केले.

मात्र यामुळेच सध्या एक प्रश्न सगळीकडे विचारला जात आहे की, ड्रग्ज केसमधील संशयीत आरोपी सुटला आहे की कोणी लढाईत पराक्रम गाजवून आलेला स्वातंत्र्य सेनानी?

शाहरुखच्या 'मन्नत' बाहेर चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
शाहरुखच्या 'मन्नत' बाहेर चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

आर्यनच्या चाहत्यांचा उत्साह एवढ्यावरच थांबला नव्हता तर ते Wel-come Home prince Aryan khan असा संदेश लिहीलेले बोर्ड हातात घेवून उभे होते. 'स्टे स्ट्राँग, प्रिन्स आर्यन' असाही फलक हातात घेऊन काही चाहते उभे होते. एका बाबाने तर आर्यनसाठी मन्नत बाहेर 'हनुमान चालिसा'चे पठण केले. आर्यन घरी येणार म्हणून त्याच्या घरी मन्नतवरही रोषणाई करण्यात आली आहे. ती आपण सहाजिक समजू शकतो. पण एक जण बैल घेऊन 'मन्नत'च्या बाहेर उभा होता, पिपानी घेवून आर्यन सुटणार म्हणून उत्साहात वाजवत होता. 'तुझे देखा तो ये जाना सनम' हे शाहरुखच्या गाजलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' मधले गाणे वाजवत होता.

याच सगळ्या गोष्टीमुळे आर्यन खानबद्दल समाजमाध्यमांमधून संताप व्यक्त केला जात आहे. एका युजरने लिहीले आहे की, बेल मिळालंय, की नोबेल? थोर समाजसेवक, मोठा पराक्रम गाजवून देशाची मान उंचावून एक तरूण मुलगा स्वगृही परतला आहे का? जल्लोषात स्वागत... घोषणा, फटाके, नाचूनगावून आनंद व्यक्त केला जात आहे. नक्कीच हे सामाजिक अध:पतन आहे. तर एका युजरने भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारा आर्यन खान तुरुंगातुन सुटत आहे, असे म्हणत आर्यन खानची हेटाळणी केली आहे.

एका युजरने आर्यन खान आर्थर रोड ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडल जिंकून घरी पोहचला असल्याचे म्हणत फटकारले आहे. एकूणच आर्यन खानच्या पाठीराख्यांनो, "थोडी तो भी शर्म करो" असा सुर उमटताना दिसत आहे.

NDPS कायद्यानुसार ड्रग्सचे सेवन करणे किंवा ते जवळ बाळगणे हा गंभीर समजला जातो. सध्या आर्यन खानवर NDPS कायद्याच्या कलम 8 (सी), कलम 20 बी (खरेदी), कलम 27 (विक्री), कलम 28 (गुन्हा करण्याचा प्रयत्न), कलम 29 (चिथावणी देणे, कट रचणे), कलम 35 (सदोष मानसिक स्थितीची शक्यता) अशा विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात आता आर्यन खान दोषी होता की नाही हे न्यायालयात सिद्ध होईलच, मात्र याच कलमांमुळे त्याला जामीन मिळणे अवघड झाले होते.

त्यानंतरही आर्यन खानला जामीन मिळाला मात्र त्यासाठी न्यायालयाने १४ प्रकारच्या अटी आणि शर्थी ठेवल्या. यात असा गुन्हा परत करु नये, इतर आरोपींशी बोलू नये, साक्षीरांवर प्रभाव टाकू नये, देश सोडून जावू नये अशा अटी टाकण्यात आल्या. त्यामुळे त्याचा पासपोर्ट देखील विषेश न्यायालयाकडे जमा करावा लागणार आहे. आरोपीला तपास अधिकाऱ्यांना न सांगता मुंबईबाहेर जाता येणार नाही. तसेच माध्यमांशी बोलण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक शुक्रवारी 11 ते 2 वेळात एनसीबी ऑफिसमध्ये हजर राहावे लागणार आहे. प्रत्येक सुनावणीला वेळेत हजर राहण्याचे आणि पुराव्यांशी छेडछाड न करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच आता एवढी सारी कलम आणि न्यायालयाकडून निर्बंध असलेल्या एखाद्या व्यक्तीचे जगज्जेत्याप्रमाणे स्वागत करणे हे कितपत योग्य असा सवाल विचारला जात आहे. केवळ एका सेलिब्रेटीचा मुलगा असल्यामुळे एवढे उदात्तीकरण योग्य आहे का? असाही प्रश्न माध्यमांमधून विचारला जात आहे.

दुसऱ्या बाजूला राजकीय व्यक्तींनीही यावर भाष्य केल्याने या प्रकरणाला बरेच महत्व प्राप्त झाले. नेते, अभिनेते सगळेच राज्यातील शेतकऱ्यांचे, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसारखे महत्वाचे प्रश्न सोडून यावर बोलताना दिसून आले होते. या कृतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. सोबतच माध्यमांनी अनेकदा केलेल्या उथळ वार्तांकनावरही समाजमाध्यमांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT