Deepali Sayed
Deepali Sayed Sarkarnama
विशेष

शिवसेना नेत्याने घेतली एकनाथ शिंदेंची भेट अन्‌ कामाचे केले कौतुक!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : बंडानंतर शिवसेना (shivsena) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातून विस्तवही जात नाही. दोन बाजूंकडून एकमेकांवर शेलक्या शब्दांत प्रहार केले जात आहे. अगदी रस्त्यावरील लढाईपासून न्यायालयील लढ्यापर्यंत दोन्ही गटांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेच्या महिला नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे यांच्या कामाचे कौतुकही केले आहे. या भेटीनंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. (Shiv Sena leader Deepali Sayyed meet Eknath Shinde)

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिवसेना नेत्या दीपाली सय्यद म्हणाल्या की, मंत्रिमंडळ विस्तारानंतर काही कामं राहिली होती. ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत घेऊन जाणे आपले काम आहे. ती कामे घेऊनच मी मुख्यमंत्र्यांना भेटले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सध्या खूप छान पद्धतीने काम करत आहेत. ते प्रत्येकांची कामे करत आहेत, तसेच त्यांना भेटण्यासाठी वेळही देत आहेत.

शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये समझोता व्हावा, यासाठी मी करत होते, हे खरं आहे. तो समझोता झाला नाही, असे म्हणता येणार नाही. कोणतेही चांगले काम होण्यासाठी वेळ लागतो. मला असा विश्वास आहे की, आयुष्यात कधीतरी हे काम माझ्याकडून होणार. दोन्ही गटात समझोता नक्कीच होणार. पण थोडासा वेळ लागेल, असेही दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत कामं घेऊन गेलो की ते तातडीने होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने कामाचा झपाटा लावला आहे. तो कमालीचा आहे. जे चांगले काम करत आहेत, त्यांचे कौतुक करणेही गरजेचे आहे, असे सांगून तुम्ही एकनाथ शिंदे गटात सामील होणार का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, मला गट वगैरे काही माहिती नाही. पण, शिवसेनेत आहे आणि शिंदे हे शिवसैनिक आहेत, हे मला माहिती आहे. वेळ आल्यावर तुम्हाला सर्व काही कळेल, असेही त्यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने त्याही शिंदे यांच्या गोटात जाणार की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT