Eknath Shinde | Vidhan Sabha| 
विशेष

मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाने सारेच चकीत; अश्रू, हशा, टाळ्या आणि गुपितं फोडणारी वाक्ये

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विश्वासदर्शक ठरावावरील भाषणाची जोरदार चर्चा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव 164 विरूध्द 99 मतांनी आज विधानसभेत मंजूर झाला. (Maharashtra Floor Test) शिंदे यांचे शिवसेना नेतृत्वाविरोधात झालेले बंड जसे धक्कादायक ठरले तसेच त्यांचे विश्वासदर्शक ठरावावरील सव्वा तासाचे भाषणही आश्चर्यकारक ठरले. भाजपशी युती झाल्यानंतर पुढील निवडणुकीत दोनशे आमदार निवडून आणण्याचे आव्हानही त्यांनी स्वीकारले. तसेच आपल्या बंडात सहभागी झालेल्या 50 पैकी एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली. पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचे आश्वासन देऊन सामान्य जनतेलाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला. (शिंदे यांचे पूर्ण भाषण ऐकण्यासाठी ही लिंक क्लिक करा)

त्यांच्या भाषणाचे अजित पवार, जयंत पाटील यांनी मोकळ्या मनाने कौतुक केले. मुख्यमंत्र्यांचा रांगडा, रोखठोक स्वभाव या भाषणातून दिसून आला. या पूर्वी शिंदे यांचे असे भाषण कधी ऐकले नाही, अशीच अनेकांची प्रतिक्रिया आली. त्यांच्या बोलण्यात एक चुकीचा शब्दही निघून गेला. पण त्यांनी तो सावरला. आपल्या भाषणाची अशीच स्टाईल असल्याने हा शब्द गेल्याचे त्यांनी मान्य केले. त्यावर जयंत पाटलांनी तुमची ही नैसर्गिक स्टाईल अशीच राहू द्या, अशी सूचनाही केली. शिंदे यांनी आपल्या बंडाची अनेक गुपिते त्यांनी या वेळी सांगितली आणि काही चतुराईने लपवूनही ठेवली. (Eknath Shinde Latest News)

शिंदे यांनी आपली शिवसैनिक म्हणून झालेली सुरवात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरील निष्ठा, राजकीय प्रगती याचा आलेख आपल्या भाषणात मांडला. आपली दोन मुले अपघातात आपल्यासमोर गेल्याचे दुःख सभागृहात त्यांनी बोलावून दाखवले. त्या वेळी त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांत अश्रू आलेच. पण सभागृहातील इतर सदस्यांनाही हुंदका आवरला नाही. शिंदे यांचे कडवे टीकाकार भास्कर जाधव यांनाही आपले अश्रू आवरले नाहीत. हा भावनिक क्षण काही काळच टिकला. त्यानंतर शिंदे सावरले आणि विविध मुद्यांना त्यांनी स्पर्श केला.

संपूर्ण भाषणात त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बरोबर लागतील असे टोले लगावले. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, हे त्यांचे वाक्य तीरासारखे होते. आमचा बाप काढला गेला, लायकी काढली गेली, भाजीवाला, रिक्षावाला म्हणून हिणवले गेले. अरे.. शिवसेना उभी करण्यासाठी आम्ही झटलो. पोटासाठी आपले व्यवसाय करून बाळासाहेबांसोबत सैनिक म्हणून आम्ही उभे राहिलो. भाजीवाला असो रिक्षावाला छोटा व्यवसाय करणे काही पाप नाही, हे तरी त्यांना लक्षात ठेवायला पाहिजे होते, असे खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता शिंदे म्हणाले. तसेच राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. पण देवेंद्र फडणविसांनी काय चमत्कार केला आणि आमची मेहनत वाया गेली. कोल्हापूरच्या संजय पवारांना निवडून आणण्यासाठी ताकद लावली होती. पण नंतर असे वाटले की एक उमेदवार पडला असता तरी चालले असते. पण ते पवार पडावेत, असे वाटले नव्हते, असे म्हणत त्यांनी राऊतांचा पराभव करायला हवा होता, हे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगताच सभागृहात हशा पिकला.

आपले हे बंड नसून शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात उठाव असल्याचे सांगत त्यांनी आपली भूमिका मांडली. मला अडविण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. कुठे जायचे हे माहीत नव्हते, असे त्यांनी भाबडेपणाने सांगताच त्यावर अनेकांनी हातवारे करून अविश्वास दाखवला. अहो मी खरेच सांगतो, असे शिंदे म्हटल्यानंतरही त्यांच्या कथनावर विश्वास बसला नाही. आपण सुरतला कसे गेलो आणि तेथे आपली कशी कोंडी करण्यात आली, हे पण त्यांनी विस्ताराने सांगितले.

या साऱ्या खेळाचे देवेंद्र फडणवीस हे सूत्रधार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. आम्ही दोघे रात्री-अपरात्री भेटायचो. आमचे आमदार झोपल्यानंतर मी हाॅटेलमधून बाहेर पडायचो आणि ते जागे होण्याच्या आत मी पुन्हा परतायचो, या त्यांच्या वाक्यावर हशा आणि टाळ्या पडल्या. मी मुख्यमंत्री होणार असे मला वाटले नव्हते. पण नंतर फडणविसांनी त्यासाठी मनाचा मोठेपणा दाखवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपण पहाडासारखे पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

आपल्या कामाची स्टाईल कशी असेल, याचीही झलक त्यांनी दाखवली. आमदार काम घेऊन आल्यानंतर थेट कलेक्टरला फोन जाईल आणि हे काम करायचेच, असा आदेश दिला जाईल. फाईल, तपासून घ्यावे, असे शेरे मी मारत बसणार नाही, या त्यांच्या वाक्यावर आमदारांनी टाळ्या वाजविल्या. आपल्या घरावर दगड मारणारा पैदा व्हायचा आहे, असे सांगत त्यांनी विरोधकांना योग्य तो संदेशही दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT