Santosh Nath
Santosh Nath Sarkarnama
विशेष

राज्यपालांचे ते पत्र खरे; राजभवनात मी २०२० मध्येच पाहिले : काँग्रेस नेत्याचा दावा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न काही केल्या मार्गी लागण्याची चिन्हे दिसत नाहीत. सुमारे दीड वर्षापासून राज्यपालांकडे राज्य सरकारने पाठवलेली नावे पडून आहेत. पण, राज्यपालांकडून (governor) अद्याप त्या नावांना मंजुरी मिळालेली नाही. आता तर चकीत करणारी नावे पुढे येत आहेत. काँग्रेसच्या (congress) ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस संतोष नाथ यांचे नाव पुढे आले आहे. विशेष म्हणजे राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठविलेल्या पत्रात ते नाव असून ते पत्र आपल्याला २०२० मध्ये राजभवनातच बघायला मिळाले, असा दावा संतोष नाथ यांनी केला आहे. (That letter from the governor is true; I saw it in Raj Bhavan in 2020 : santosh Nath)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र खरे असल्याचा दावा त्या पत्रात नाव असलेले काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस संतोष नाथ यांनी केला आहे. ते म्हणाले की, हे पत्र मला २०२० मध्ये राजभवनामध्येच बघायला मिळाले होते, त्यामुळे ते पत्र खरे आहे. संतोष नाथ यांनी वंचित बहुजन आघाडीकडून २०१९ मध्ये नाशिक पूर्व मतदारसंघामधून विधानसभा निवडणूक लढवली होती. ते नाथपंथी समाजाचे प्रदेशाध्यक्षही आहेत.

राज्यपालांनी विधान परिषद सदस्यांबाबत शिफारस केलेल्या पत्रात संतोष नाथ यांचे नाव आहे. ते पत्र आज समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. त्या पत्रात एकूण सहा जणांची नावे आहेत. त्यामध्ये रमेश बाबूराव कोकाटे (आडसकर) (राजकीय), मोरेश्वर महादू भोंडवे (राजकीय), सतीश रामचंद्र घरत (उद्योग), वीरभद्रेश करबसप्पा बसवंती (सामाजिक), जगन्नाथ शिवाजी पाटील (सामाजिक) आणि संतोष नाथ (राजकीय) यांचा समावेश आहे.

दरम्यान, याच यादीत नाव असलेले मोरेश्वर भोंडवे यांनी हे पत्र बनावट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. कारण विधान परिषद आमदारकीसाठी शिफारस झाल्याचे मला आमच्या पक्षाकडूनच कळले असते. आमचे एकच बॉस आहेत...अजितदादा. ते सांगतील तेच आम्ही करणार, असे सांगितले.

दरम्यान, महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर दीड वर्षांपूर्वी १२ जागा या तीनही पक्षांनी समान म्हणजे प्रत्येकी चार वाटून घेतल्या होत्या. त्यामध्ये राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे, काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसैन, अनिरुद्ध बनकर, तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे पाटील, चंद्रकांत रघुवंशी आणि विजय करंजकर यांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवल्याची चर्चा आहे. यातील काही नावांवर राज्यपालांनी आक्षेप घेतल्याचे सांगितले जाते. एकंदरीतच राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यातील वादात १२ आमदारांची नियुक्ती रखडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT