पिंपरी : पिंपरी-चिंचवड, पुणे आदी राज्यातील मोठ्या व प्रमुख महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील निकालाची टांगती तलवार असूनही दोन महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या शिंदे (Eknath Shinde)-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील वरिष्ठ २३ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या ते या महिन्यात बदली करण्याची दाट शक्यता आहे. या मोठ्या खांदेपालटात पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांचेही नाव आहे. (Transfer of 23 senior IPS officers including Nangre-Patil, Gupta, Aarti Sinh by end of September)
यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने आपल्या सोईने राज्यातील वरिष्ठ २२आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या १८ सप्टेंबर २०२० रोजी केल्या होत्या. त्यात गुप्ता यांचा समावेश होता. शेकडो कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील वाधवान बंधूंना कोरोना काळात मुंबईहून महाबळेश्वर येथे मोटारीने जाण्यासाठी खास सवलत पास दिल्याने त्यावेळी मंत्रालयात अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) पदावर असलेल्या गुप्तांना महाविकास आघाडी सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर त्यांची पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. त्यांनी २० सप्टेंबर २०२० रोजी पदभार स्वीकारला होता. त्यांचा व त्यांच्याबरोबर बदली झालेल्यांचा दोन वर्षांचा कालावधी (टर्म) पूर्ण होत असल्याने आता त्या सर्वांच्या बदल्या या महिन्यात करण्याची कार्यवाही गृह विभागाने सुरु केली आहे.
वरिष्ठ २२आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या नेमक्या कुठे होणार, हे अद्याप निश्चीत झाले नसले, तरी त्या आपल्या सोईच्या ठिकाणी शिंदे-फडणवीस करणार असल्याचे समजते. त्यातूनच गुप्ता यांच्या जागी नवे आयुक्त कोण येणार, हे लगेच स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, या बदलीमुळे गुप्ता यांचे ‘मोका’ चे शतक हुकण्याची शक्यता आहे. त्यांनी शहरातील ९३ सराईत गुंड व त्यांच्या टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र राज्य संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा तथा मोकान्वये कारवाई ११ सप्टेंबरपर्यंत केलेली आहे. आयुक्त म्हणून येताच त्यांनी शहरातील संघटीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी `मोका`चा धडाका सुरु केला आहे.
गुप्ता यांच्या जोडीने टर्म पूर्ण झाल्याने खासदार नवनीत राणा प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या अमरावतीच्या आयुक्त आरती सिंह तसेच नाशिक ग्रामीणचे एसपी सचिन पाटील, मुंबईचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील, राजकुमार व्हटकर (प्रशासन), स्पेशल आयजी (कोल्हापूर रेंज) एम. एस. लोहिया, नागपुरचे आयुक्त अमितेशकुमार ही नावे बदली होऊ घातलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीत आहेत.
बदली होणारे इतर अधिकारी पुढीलप्रमाणे
१) बी. के. उपाध्याय : अतिरिक्त पोलिस महासंचालक तथा ॲडिशनल डीजी (वाहतूक)
२) सदानंद दाते : आयुक्त, वसई-विरार-मीरा भाईंदर
३) बिपीनकुमार : नवी मुंबई आय़ुक्त
४) विनय कोरेगावकर : ॲडिशनल डीजी (नागरी हक्क संरक्षण तथा पीसीआर)
५) आशुतोष डुंबरे : राज्य गुप्तवार्ता विभाग (एसआयडी) आयुक्त
६) सुखविंदरसिंग : ॲडिशनल डीजी (फोर्स वन)
७) व्ही. के. चौधरी : ॲडिशनल डीजी (एसीबी तथा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)
८) आर. के.सिंगल : कंट्रोलर,लिगल मेट्रॉलॉजी
९) के. एम. प्रसन्ना : स्पेशल आयजी,औरंगाबाद रेंज
१०) विठ्ठल जाधव : सहआयुक्त, नवी मुंबई
११) लखमी गौतम : उप महानिरीक्षक,एसीबी
१२) एस. व्ही. प्रभू : अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) मुंबई
१३) संजय दराडे : अतिरिक्त आयुक्त तथा ॲडिशनल सीपी,ईस्ट रिजन,मुंबई
१४) डी.एस.चव्हाण : अतिरिक्त आयुक्त,मध्य विभाग,मुंबई
१५) एस.एच.महावरकर : उप महानिरीक्षक (डीआयजीपी)तथा मुख्य दक्षता अधिकारी,सिडको,नवी मुंबई
१६) एन.ए.पी.तांबोळी : डीआयजीपी,नांदेड
१७) चंद्र किशोर मीना : डीआयजीपी, अमरावती
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.