Suhas Kande-Gogawale
Suhas Kande-Gogawale sarkarnama
विशेष

शिंदे-फडणवीस यांना त्यांच्याच दोन आमदारांनी अडचणीत आणले! एकाने सभागृहात; दुसऱ्याने बाहेर!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस शिंदे गटाच्या दोन आमदारांनी गाजवला. सत्ताधारी पक्षांच्या या दोन आमदारांनी अशी भाषा वापरली की त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच अडचणीत यावे लागले. फडणवीस हे गोलमाल उत्तर देत असल्याचा आरोपही यातील एकाने करून खळबळ उडवून दिली.

हे दोन आमदार म्हणजे भरत गोगावले आणि सुहास कांदे. आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाचे म्हणजे शिंदे गटाचे आमदार घोषणाबाजी करताना त्यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आमदारांशी संघर्ष झाला. शिंदे गटाच्या आमदारांनी शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याची तक्रार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली. खरे तर अशा वेळी संयमाने परिस्थिती हाताळली जाते. पण या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे प्रतोद गोगावले हे अधिक आक्रमक झाले. त्यांनी अंगावर आले तर शिंगावर घेऊ, आम्ही काय घाबरतो की काय? ते काय आम्हाला धक्काबुक्की करणार? आम्हीच त्यांच्या अंगावर धावून गेलो, असे आपल्या कृतीचे समर्थन केले. त्यामुळे सरकारची कोंडी झाली. सत्ताधारी पक्षाचेच आमदार जाहीरपणे आपल्या कृत्याची कबूली देत असल्याने त्याचे समर्थन कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला. रस्त्यावरच्या भांडणात आम्ही हार जाणार नाही, असेही गोगावलेंनी जाहीरपणे सांगून पुन्हा आपला मुद्दा कायम ठेवला.

सुहास कांदे यांनी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भर सभागृहात सुनावण्यास कमी केले नाही. त्यांचे आणि छगन भुजबळ यांचे भांडणे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यात निर्दोषत्व दिल्याचा मुद्दा त्यांनी लावून धरला. भुजबळांच्या बाजूने निकाल देणाऱ्या न्यायाधीशांवरही ते घसरले. तसेच सरकारने या निकालाला पुन्हा आव्हान दिले पाहिजे, अशी आक्रमक मागणी केली. विधी व न्याय विभागाने भुजबळांना निर्दोष सोडण्याच्या निकालाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जीआर पण निघाला होता. मात्र हा निर्णय रद्द करून ते जीआर देखील मागे घेण्यात आले. असे का केले आणि कोणी केले, असा सवाल करत आताचे सरकार या निकालाला आव्हान का देत नाही, असा त्रागा केला. त्यावर फडणवीस यांनी साऱ्या कायदेशीर बाजू पाहाव्या लागतील, असे समजावून सांगत होते. पण तुम्ही हा निर्णय आताच जाहीर करा, आम्ही तुमच्याकडे बघून इकडे (भाजपकडे) आलोय, तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना साथ देणार नाही, अशी टिप्पणी केली.

त्यांच्या या टिप्पणीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही उभे राहून मंत्र्यांनी असेच उत्तर द्यावे, अशी मागणी आमदार करू शकत नाही, याकडे अध्यक्षांचे लक्ष वेधले. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही कांदे यांना बोलणे लवकर संपविण्याचा आग्रह केला. पण कांदे यांनी भुजबळ यांच्यावर या निमित्ताने पुन्हा आरोपांची उजळणी केली. फडणवीस यांनीही शेवट साॅलसिटर जनरल किंवा अॅटर्नी जनरल यांचे कायदेशीर मत घेऊन या प्रकरणाची पडताळणी करू, असे आश्वासन देऊनही कांदे यांचे समाधान झाले नाही. शेवट तसा शब्द मी तुम्हाला देतो, असे फडणवीस म्हटल्यानंतरच कांदे खाली बसले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT