Rituja Latke Sarkarnama
विशेष

‘अंधेरीतील विजय शिंदे गट-भाजपला चपराक; त्यांची कटकारस्थाने जनतेला आवडली नाहीत’

भारतीय जनता पक्षाने अशी परंपरा कधीही पाळलेली नाही. कोल्हापूर, देगलूर, पंढरपूर या मतदारसंघात मागील दोन तीन वर्षात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाने उमेदवार दिले होते, त्यामुळे त्यांचा परंपरा राखल्याचा दावा खोटा आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अंधेरी (Andheri) पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (by-election) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय भाजप व शिंदे गटाच्या तोडफोडीच्या राजकारणाला मोठी चपराक आहे. शिंदे गट आणि भाजपची कटकारस्थाने जनतेला आवडली नाहीत; म्हणूनच त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. हा विजय शिंदे गट आणि भाजपसाठी मोठा धडा शिकवणारा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली. (Victory in Andheri by-election is a big slap for BJP-Shinde group: Nana Patole)

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाल्यानंतर पटोले बोलत होते. ते म्हणाले की, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय हा ईडी सरकारवर जनतेचा विश्वास नसल्याचे स्पष्ट करणारा आहे. या मतदारसंघात भाजपा व शिंदे गटाची ताकद नसतानाही निवडणूक लढवण्याचा अट्टाहास केला होता. आपला दारूण पराभव होत असल्याची चाहूल लागल्यानेच भाजपला निवडणुकीतून पळ काढावा लागला. महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत अंधेरीच्या जनतेने भाजपा व शिंदे गटाच्या तोडफोडीच्या राजकारणाला मोठी चपराक लगावली आहे.

शिवसेनेचे रमेश लटके यांच्या आकस्मिक निधनाने अंधेरी पूर्व मध्ये पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळत काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. एखाद्या सदस्याचे निधन झाल्यास ती जागा बिनविरोध व्हावी, अशी महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे परंतु भारतीय जनता पक्षाने या परंपरेला तिलांजली देत उमेदवारी अर्ज दाखल केला. पण, या मतदारसंघात आपला निभाव लागणार नाही, याची त्यांना जाणीव होताच परंपरेचा दाखला देत उमेदवारी अर्ज मागे घेतला. वास्तविक पाहता भारतीय जनता पक्षाने अशी परंपरा कधीही पाळलेली नाही. कोल्हापूर, देगलूर, पंढरपूर या मतदारसंघात मागील दोन तीन वर्षात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाने उमेदवार दिले होते, त्यामुळे त्यांचा परंपरा राखल्याचा दावा खोटा आहे.

शिंदे गटानेही या निवडणुकीत शिवसेनेची कोंडी करण्यासाठी केंद्र सरकारला हाताशी धरून शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह गोठवण्याचे पाप केले. शिंदे गट व भाजपाची ही कटकारस्थाने जनतेला आवडली नाहीत म्हणूनच त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. अंधेरीतील विजय हा शिंदे गट व भाजपासाठी मोठा धडा शिकवणारा असून महाराष्ट्रातील आगामी सर्व निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित करणारा आहे, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT