किल्लारी-सास्तूरच्या प्रलंयकारी भूकंपानंतर मराठवाड्याला पुन्हा पुन्हा छोटे मोठे भूकंपाचे धक्के बसत होते. त्यामुळं छत्रपती संभाजीनगर येथे भूकंपमापक केंद्र सुरू करण्यातची घोषणा सरकारनं केली होती, मात्र ती अस्तित्वात आली नाही. 2006-2007 हे वर्ष असेल. लातूर-धाराशिव जिल्ह्यांच्या काहा भागांना भूकंपाचा धक्का बसला होता. भीतीमुळं लोकांनी रात्र जागून काढली होती. पत्रकार म्हणून त्यावेळी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल लावला, त्यांच्या सहायकाने तो उचलला आणि साहेब दौऱ्यावर आहेत, असं सांगितलं. आठ दिवसांनी खुद्द मुख्यमंत्र्यांचा कॉल येतो. ते काम विचारून घेता आणि पूर्तता केली जाईल, असं सांगतात.
साधारण वीसेक वर्षांपूर्वी मुख्यमंत्री आपल्याला येणाऱ्या प्रत्येक कॉलची नोंद ठेवतात, उत्तर देतात. मेसेजलाही उत्तर देतात...! ही बाब साधारण नव्हती. एव्हाना आपल्या लक्षात आलं असेल की हे कोण मुख्यमंत्री होते...! होय, विलासराव देशमुखच ते. गावाच्या सरपंचपदापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि त्यांनी मुख्यमंत्रिपदाला दोनदा गवसणी घातली, तीही दिल्लीच्या दबावासमोर न झुकता, ताठ मानेनं. राजकीय डावपेचांवर सहज मात करणाऱ्या कलासक्त विलासरावांची बोटे हार्मोनियमवरही त्याच सहजतेने फिरायची. महाराष्ट्राला लाभलेल्या सुसंस्कृत राजकीय नेत्यांमध्ये, सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांमध्ये विलासरांवाची गणना होते.
लातूरचे ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर सांगतात, ''लातूरला सोनिया गांधी यांची प्रचारसभा होती. या सभेत विलासरावांना बोलू द्यायचे नाही, असा प्रयत्न काहीजणांनी केला होता. मात्र विलासरावांनी माईक हाती घेतलाच. त्यावेळी समोर उपस्थित लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. एखादा कलाकार आणि त्याच्या श्रोत्यांमध्ये जसा अमूर्त संवाद असतो, तसाच अमूर्त संवाद विलासराव आणि लोकांमध्ये असायचा. श्रोत्यांशी, लोकांशी उत्तम संवाद असणारा विलासराव देशमुख यांच्यासारखा दुसरा नेता नसावा.''
विलासरावांचे असे एक ना अनेक किस्से आहेत. दोनवेळा मुख्यमंत्री होण्याआधी विलासरावांना लातूर विधानसभा मतदारसंघात 1995 च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. त्याच्या पुढच्या म्हणजे 1999 च्या निवडणुकीत ते विजयी झाले आणि त्यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. मुख्यमंत्री बनल्यानंतर ते लातूरला येत होते. मांजरा कारखान्यावर त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सत्कार स्वीकारल्यानंतर ते बोलायला उठले आणि रडायला लागले. त्यांचं रडणं काहीकेल्या थांबत नव्हतं. ते 40 हजार मतांनी पडले होते अन् जवळपास एक लाख मतांनी विजयी झाले होते. पराभूत होणे, विजयी होणे आणि मुख्यमंत्री बनणे... सर्वकाही तुमच्यामुळं, म्हणजे मतदारांमुळं ही भावना त्यांच्या मनात दाटून आली आणि त्यांना रडू कोसळलं होतं.
विलासराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 रोजी लातूर तालुक्यातील बाभळगाव येथे झाला. सुशीलादेवी देशमुख आणि दगडोजीराव देशमुख हे त्यांचे आई-वडिल. माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे त्यांचे बंधू. त्यांना दोन भगिनी. विलासरावांचे आजोबा व्यंकटराव देशमुख हे हैदराबाद संस्थानात महसूल अधिकारी होते. दगडोजीरावांना त्यांच्या वडिलांचे अधिकार वंशपरंपरेने मिळाले, मात्र तोपर्यंत हैदराबाद संस्थानाचं विलीनीकरण झालं होतं.
विलासरांवाचं शालेय शिक्षण लातुरातच झालं. त्यांनी पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजमधून कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यांनंतर त्यांनी लातूर येथे वकिली व्यवसाय सुरू केला. त्यांचं राजकारण ग्रामपंतायतीपासून सुरू झालं. 1974 मध्ये त्यांची बाभळगाव ग्रामपंतायतीच्या सदस्यपदी निवड झाली. त्याचवेळी ते सरपंचही झाले. 1974 पासून पुढील पाच वर्षे ते बाभळगावचे सरपंच होते. त्यावेळी धाराशिव आणि लातूर एकच जिल्हा होता. त्यावेळच्या अविभाजित उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे ते सदस्य बनले. लातूर पंतायत समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.
विलासरांवाची राजकीय कारकीर्द वरचेवर बहरतच होती. युवक काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद, काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडं चालून आलं. त्यांनी तरुणांसाठी विशेष कार्यक्रम राबवला होता. या कालवधीत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. लातूर विधानसभा निवडणुकीत 1980 मध्ये ते विजयी झाले आणि पहिल्यांदा आमदार बनले. यानंतर त्यांनी कधीही मागं वाळून पाहिलं नाही. 1995 पर्यंत ते सलग विजयी झाले. या काळात त्यांनी विविध खात्यांची मंत्रिपदं भूषवली. राज्यपातळीवर त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण झालं.
असं सांगितलं जातं की, विलासराव हे मंत्री, मुख्यमंत्री असताना त्यांना लातुरातून अगदी सामान्य माणसंही कॉल करत असतं. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विलासरावांचे खंदे समर्थक होते. यावरून त्यांच्या संपर्काचा अंदाज येऊ शकतो. विलासरावांना एखादा माणूस भेटला की तो कायमचा त्यांचा होऊन जायचा. लोकांना जोडून ठेवण्याचं अफलातून कसब त्यांच्याकडं होतं. त्यामुळंच आजही गावागावांत विलासरावांवर प्रेम करणारे, त्यांच्या आठवणींनं हळवे होणारे लोक आढळतात. लोकांशी उत्तम संवाद कसा ठेवायचा, हे विलासरावांनी दाखवून दिलं होतं.
आमदार झाल्यानंतर विलासराव कुर्डुवाडी येथून रेल्वेनं मुंबईला जायचे. रेल्वे यायच्या आधी ते तेथील एका स्टॉलवर एक खाद्यपदार्थ आवर्जून खायचे. तो खाद्यपदार्थ त्यांना इतका आवडला की ते खाल्ल्याशिवाय ते पुढे जातच नसत. यातून त्यांची त्या दुकानदाराशी चांगली गट्टी जमली. विलासराव पुढे मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, मात्र त्या दुकानदाराला ते कधीही विसरले नाहीत. मुख्यमंत्री बनल्यानंतर एकदा रेल्वेनं येण्याचा योग त्यांना आला. त्यावेळी कुर्डुवाडी स्टेशनवर त्या दुकानदाराला बोलावून घेऊन विलासरांवानी त्याची भेट घेतली होती, असं देऊळगावकर सांगतात.
विधानसभेची 1995ची निवडणूक मात्र विलासरावांसाठी अत्यंत धक्कादायक ठरली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. जवळचे नेते, कार्यकर्त्यांच्या चुकीचा फटका विलासरावांना बसला आणि आपल्याच जुन्हा सहकाऱ्याकडून त्यांना 35000 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या पराभवाची चर्चा राज्यभरात झाली. विलासरावांच्या राजकीय कारकीर्दीतला हा अत्यंत पडता काळ होता. निवडणुकीचा प्रचार सुरू असताना अफवांचं जणू पीकच आलं होतं. या सर्व अफवा विलासरावांच्या विरोधात जाणाऱ्या होत्या.
काहीही झालं तरी विलासरावांना यावेळी धडा शिकवायचाचं, अशी भावना लातूरकरांची 1995 मध्ये झाली होती. काँग्रेसमधीलच त्यांचे एकेकाळचे सहकारी शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी विलासरावांना पराभूत केलं. समोरचा उमेदवार मातब्बर किंवा योग्य होता म्हणून नव्हे, त्यापेक्षा विलासरावांची नकारात्मक प्रतिमा तयार झाल्यामुळं हा प्रसंग ओढवला होता. मतदारांनी केलेल्या या पराभवापासून योग्य तो धडा घेतलेल्या विलासरावांना त्यानंतर दोनदा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवण्याची संधी मिळाली. पराभव झाला असला तरी त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीनं वेगळं वळणं घेतलं.
विलासरावांचा पराभव करण्यासाठी एक लॉबी सक्रिय झाली होती. कार्यकर्त्यांच्या राजकीय दडपशाहीला लोक, व्यापारी कंटाळले होते. लोकांच्या मालमत्ता हडपल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांवर होऊ लागला. दादागिरी, गुंडगिरीचे आरोप रोजचेच झाले होते. (कै.) शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं मुख्यमंत्रिपद घालवण्यात विलासरांवाचा हात होता, अशी चर्चा पसरली होती. लातूर बाजार समितीच्या निवडणुकीत विलासराव देशमुख आणि शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यामुळे कव्हेकरांनी स्वतंत्र पॅनेल उभं करून बहुमत मिळवलं होतं. ते सभापतीही झाले. यासाठी त्यांना माजी मुख्यमंत्री (कै.) शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडून बळ मिळाले होते, अशी चर्चा होती.
शिवाजीराव पाटील कव्हेकर हे माझ्यासमोर मामुली आहेत, मी त्यांची पर्वा करत नाही, असे विलासराव एकेठिकाणी बोलून गेले. त्या निवडणुकीतील हा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. कव्हेकर समर्थकांनी विलासरावांच्या या वक्तव्याचा विपर्यास करत मामुली या शब्दाच्या पुढे रे हा शब्द जोडून प्रचार सुरू केला. मामुली या शब्दातील मा हणजे मारवाडी, मु म्हणजे मुस्लिम, लि म्हणजे लिंगायत आणि रे म्हणजे रेड्डी! कव्हेकर माझ्यासमोर मामुली आहेत, मी त्यांची पर्वा करत नाही या वाक्याचा अर्थ मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत समाजाची मी पर्वा करत नाही असा लावण्यात आला. त्यात रेड्डीही जोडण्यात आले. सारी समीकरण बदलून गेली. हक्काचे मानलं जाणारं मुस्लिम मतदानही विलासरावांपासून दूर झालं. कव्हेकर हे जनता दलाचे उमेदवार असल्यामुळं विलासरावांच्या विरोधात मतदान करण्यासाठी मुस्लिमांची अडचण झाली नव्हती.
त्यानंतर विलासरांवांनी शिवसेनेच्या पाठिंब्यावर विधान परिषद लढवली, त्यातही त्यांचा पराभव झाला. 1999 ला विलासराव जवळपास एक लाख मतांनी निवडून आले आणि मुख्यमंत्री बनले. पराभूत झाल्यानंतर विलासरांवामध्ये उदारता आली होती. त्यांनी कोणाशाही शत्रुत्व ठेवंल नव्हतं, असं देऊळगावकर सांगतात. असं सांगितलं जातं की, विलासराव मुख्यमंत्री बनल्यानंतर शिवाजीराव कव्हेकर एक काम घेऊन त्यांच्याकडे गेले होते. विलासरावांनी ते काम तातडीनं मार्गी लावलं होतं. हा होता त्यांचा दिलदारपणा. कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधीच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
सत्ताधाऱ्यांमध्ये, तेही मुख्यमंत्र्यांमध्ये अशी उदारता असेल तर, ती लोकांना खूपच भावते. त्यातूनच विलासरावांची लोकप्रियता वाढली होती. एकेकाळी काँग्रेसमध्ये उदारमतवाद होता. नेत्यांमध्ये समाजाबद्दल कणव असायची. अशा नेत्यांच्या पिढीचे विलासराव देशमुख हे शेवटचेच प्रतिनिधी, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. विलासराव कोणाबद्दलही मनात अढी ठेवून वागत नव्हते, असे लातूरचे पत्रकार अनिल पौलकर सांगतात. एखाद्याच्या कृतीबद्दल ते रागावले तरी तो तेवढ्यापुरताच असायचा. नंतर तो राग, कृती ते विसरून जात असतं.
विलासराव दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यावेळी मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या होत्या. सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण शेवटच्या क्षणी मुख्यमंत्रिपदाची माळ विलासरावांच्या गळ्यात पडली होती. पडद्यामागं मोठ्या घडामोडी झाल्या होत्या. विलासरावांनी पक्षश्रेष्ठींसमोर बाणेदारपणा दाखवला होता. पक्षसंघटनेवर त्यांची पकड किती मजबूत आहे, याची प्रचीती पक्षश्रेष्ठींना आली आणि एेनवेळी त्यांचं नाव जाहीर करण्यात आलं. 1 नोव्हेंबर 2004 रोजी त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
2008 मध्ये मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या ताज हॉटेलला विलासरावांनी त्यांचा अभिनेता पुत्र रितेश देशमुख आणि चित्रपट निर्माते रामगोपाल वर्मा यांच्यासोबत भेट दिली होती. त्यावरून विरोध पक्ष आक्रमक झाले होते. माध्यमांतूनही त्यांच्यावर मोठी टीका झाली. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांना राज्यसभेवर घेण्यात आलं. तत्कालीन पंचप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. त्यांना अवजड उद्योग हे खातं मिळालं. नंतर ग्रामविकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान खातीही त्यांना मिळाली. कायम लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहिलेल्या विलासरावांत मनं दिल्लीत रमलंच नही.
अण्णा हजारे यांनी २०११ मध्ये दिल्लीत भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषण सुरू केलं होत. त्याला देशभरातून प्रचंड असा प्रतिसाद मिळाला होता. गावोगावी अण्णांना समर्थन मिळत होत. त्यामुळे केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारची कोंडी झाली होती. अण्णांनी उपोषण मागं घ्यावं, यासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी त्यांची भेट घेतली, मात्र उपयोग झाला नव्हता. विलासरावांनी अण्णांची भेट घेतली असती तर उपोषण आधीचं सुटलं असतं, मात्र काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी विलासरावांना विश्वासात घेतलं नव्हतं. विलासरावांची उपयुक्तता काँग्रसे नेत्यांच्या उशीरा लक्षात आली. अखेर विलासरावांनी अण्णांची भेट घेऊन विनंती केली. त्यानंतर अण्णांनी उपोषण सोडलं होतं.
डॉक्टरला जसा पेशंट कळतो, त्याप्रमाणेच लोक स्वतःच्या कामासाठी आले आहेत की इतरांच्या कामासाठी आले, हे विलासरांवाना कळायचे. मांजरा कारखाना आणि लातूरची मूकबधिर शाळा हे त्यांचे दोन मोठे वीक पॉइंट. शहरात कुणी पाहुणा आला की ते आवर्जून या दोन संस्था दाखवायचे. मांजरा कारखान्यात त्यांनी कार्यसंस्कृती रुजवली. उत्कृष्ट माणूस नेमायचा आणि त्याच्या कामात हस्तक्षेप करायचा नाही, असा विलासरावांचा शिरस्ता होता. त्यामुळंच या दोन्ही संस्था नावारूपाला आल्या. मराठवाड्यात उसाला 9 ते 10 टक्के उतारा मिळायचा, अशा काळात मांजरा कारखान्याचा उतारा 13 टक्के होता. यातून झालेला नफा त्यांनी ऊसउत्पादक शेतकऱ्यांना, कामगारांना दिला. कामगारांना दोन-तीन महिन्यांचा पगार बोनस म्हणून देण्याची सुरुवात मांजरा कारखान्यानंच केली.
विलासराव आणि भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची गाढ मैत्री होती. हे दोन्ही नेते आज हयात नाहीत, तरीही त्यांच्या मैत्रीची चर्चा गावागावांत होत असते. 2012 मध्ये विलासराव आजारी पडले. त्यांना यकृताचा आजार जडला होता. हा आजार त्यांना आपल्यातून घेऊन जाईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. 14 ऑगस्ट 2012 रोजी चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. अमित, रितेश आणि धीरज हे त्यांचे पुत्र. अमित देशमुख आणि धीरज देशमुख राजकारणात सक्रिय आहेत. रितेश देशमुख यांनी हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.