Vinayak Mete
Vinayak Mete sarkarnama
विशेष

...तर मी उमेदवारी अर्ज मागे घेतला नसता : विधान परिषदेबाबत मेटेंनी केली भूमिका स्पष्ट!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : निवडून येण्याच्या दृष्टीनेच मी विधान परिषदेसाठी (Legislative Council Election) उमेदवारी अर्ज भरला असता. आताच्या निवडणुकीत विधान परिषदेला दहाच उमेदवार निवडून येणार आहेत. अशा परिस्थितीत काहींचं निवडून येणं आणि न येणं, हे बरंच अनिश्चित आहे. अशा वातावरणात किंवा एखादे वेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आली असती तर ते माझ्याच्यानं शक्य झालं नसतं, असे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी विधान परिषदेची उमेदवारी आणि सद्यास्थितीवर भाष्य केले. (Vinayak Mete said about the candidature of the Legislative Council)

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर विनायक मेटे माध्यमाशी बोलत हेाते, त्यावेळी त्यांनी शिवसंग्रामची नाराजी, राज्यसभा निवडणूक, विधान परिषदेची उमेदवारी याबाबत भाष्य केले. ते म्हणाले की शिवसंग्राम पक्षाला जो शब्द देण्यात आलेला होता, तो भाजपकडून पाळला जात नव्हता. ही नाराजी आमच्या आमदारांनी बुधवारीही (ता. ८ जून) बोलून दाखवली होती. आमचे आमदार भाजप आमदारांसोबत हॉटेलमध्येही गेले नव्हते. आज पुन्हा आमची त्याबाबत चर्चा झाली.

विधान परिषदेच्या उमदेवारीबाबत विनायक मेटे म्हणाले की, शंभर टक्के निवडून येण्याच्या दृष्टीनेच मी उमेदवारी अर्ज भरला असता. सध्याचे गणित पाहता विधान परिषदेला दहाच उमेदवार निवडून येणार आहेत आणि निवडणुकीत जास्त उमेदवार झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये काही लोकांचं निवडून येणं आणि न येणं, हे बरंच अनिश्चित आहे. अशा वातावरणामध्ये किंवा एखादे वेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आली असती तर ते माझ्याचं शक्य झालं नसतं. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात मी उमेदवारी अर्ज भरणे शक्य नाही. भाजपकडून मला तसं सांगणंही योग्य वाटला नसावं, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मला तसं सांगितलं नसावं.

राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षालाच मतदान करणार असल्याचे मेटे यांनी स्पष्ट केले. त्याबाबत ते म्हणाले की, आम्ही शब्द पाळणारे आहोत, त्यानुसार राज्यसभा निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पक्षासोबत असणार आहोत. आमचे दोन्ही आमदार भाजपसोबतच राहतील, आज रात्री आमचे दोन्ही आमदार भाजप आमदारांसोबत हॉटेलमध्ये जातील. विधान परिषदेबाबतचा निर्णय मात्र राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर चर्चा करून घेण्यात येईल, असेही मेटे यांनी सांगितले.

आमची नाराजी अजूनही शंभर टक्के दूर झालेली नाही. शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. पण, आम्ही शब्द पाळणारे आणि मैत्रीला जागणारे आहोत. मैत्रीखातर आम्ही राज्यसभा निवडणुकीत भाजपसोबत आहोत. विधान परिषदेला मात्र चर्चेनंतर निर्णय घेण्यात येईल, असेही मेटे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT