शेटफळगढे (जि. पुणे) : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी जवळीक वाढली आहे. केंद्रात नव्याने सहकार मंत्रालयाची निर्मिती झाल्यापासून पाटील यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे भाजपकडून विशेषतः नवे सहकार मंत्री शहा यांच्याकडून पाटील यांना कोणत्या पदाचे गिफ्ट मिळणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांसह इंदापूर तालुक्यात उत्सुकता आहे. (What gift will Amit Shah give to Harshvardhan Patil?)
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पाटील यांना विधानसभेला पराभव स्वीकारावा लागला होता, त्यामुळे भाजपमध्ये जाऊन आपल्या नेत्याची चूक तर झाली झाली नाही ना? अशी खंत कार्यकर्त्यांना वाटत होती. पण, ज्याप्रमाणे शेजारच्या बारामतीकरांचा विरोध असतानाही पाटील यांनी काँग्रेसमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते. त्याचप्रमाणे पाटील यांनी सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये आपल्यामधील क्षमता दाखवण्यास सुरुवात केली आहे.
केंद्रात प्रथमच सहकार खात्याची निर्मिती झाल्यानंतर ते खाते अमित शहा यांच्याकडे आले आहे. तेव्हापासून सहकारातील चर्चेच्या निमित्ताने पाटील यांच्या शहा यांच्यासोबतच्या गाठीभेटी व बैठका वाढल्या आहेत. त्यातून शहा यांच्यासोबत निर्माण झालेल्या जवळीकतेमुळे पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पुन्हा वाढल्या आहेत. पण, तालुक्यातील पाटील यांच्या विरोधकांना मात्र ही जवळीकता डोळ्यात खूपत आहे. कारण सहकारातील याच मुद्द्यावरून पाटील यांच्या ताब्यातील कारखान्याचे कामकाज व सभासदत्वाचा मुद्द्यावरून विरोधक पाटील यांच्यावर टीका करीत आहेत. पण, ही टीका करीत असताना स्वतःच्या ताब्यातील बँकेचे विकास सोसायट्यांना सभासदत्व देण्याचा मुद्दा विरोधक विसरत आहेत. तरीदेखील विरोधकांना कोणतेही प्रत्युत्तर न देता पाटील यांनी तालुक्यातील जनतेच्या संपर्काबरोबरच राज्य व केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ नेते व मंत्र्यांशी आपली जवळीकता वाढविली आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात भाजप बळकट करण्यासाठी पाटील यांना बळ देण्याचे फडणवीस व प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे राजकीय डावपेच आहेत. याशिवाय शेजारच्या बारामतीकरांना राजकीय विरोध करूनच पाटील यांची राजकीय कारकीर्द बहरली आहे. कारण पाटील यांनी लोकसभेला राष्ट्रवादीला मदत केली तरी आघाडीत बिघाडी होऊन विधानसभेला कधी बाण तर कधी पतंग उडवणाऱ्या राष्ट्रवादीशी पाटील यांना संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे आता भाजपमध्ये गेल्यानंतर पाटील यांना तालुक्याबरोबरच जिल्ह्यातही राष्ट्रवादीशी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळेच पाटील यांच्या संघर्षाला बळ देण्यासाठी भाजप पाटील यांना कोणत्या पदाचे गिफ्ट देणार? याच्या प्रतीक्षेत पाटील यांना मागील आठ वर्षांपासून सत्ता नसतानाही साथ देणारे कार्यकर्ते आहेत.
फडणवीस व पाटील यांच्याकडे नजरा
विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या ज्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या नेत्यांना फडणवीस व पाटील यांनी विधानसभेला विजय झाला किंवा पराभव झाला तरी राजकीय पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून सध्या हे दोन्ही नेते पाटील यांना बळ देत आहेत, त्यामुळे पाटील यांना हे दोन्ही नेते कोणत्या पदाचे गिफ्ट देणार, याकडे तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.
अजित पवारांच्या त्या वक्तव्याची आठवण...
भरणेवाडी येथे सव्वा तीन वर्षांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वाटेल ते झाले तरी चालेल, परंतु इंदापूरची राष्ट्रवादीची जागा सोडली जाणार नाही, भले आघाडी नाही झाली तरी बेहत्तर...हा अजित पवारांचा शब्द’ अशा पद्धतीची गर्जना केली होती. त्यामुळेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी जागा सोडणार नाही, हे गृहीत धरून पाटील यांनी ११ ऑगस्ट २०१९ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, तालुक्यातील विरोधक पाटील यांच्या मावळमधील एका कार्यक्रमातील क्लिप फिरवत आहेत. त्यास भाजप कार्यकर्तेही अजित पवारांच्या या वक्तव्याची आठवण करून देत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.