Mission Shakti women safety services Sarkarnama
विशेष

Women Safety : 'कौटुंबिक अडचण असो वा कायदेशीर सल्ला...' महिलांसाठी 24 तास उपलब्ध आहे 'मिशन शक्ती'चा आधार; जाणून घ्या कशी मिळणार सुरक्षा

Mission Shakti women safety services in Maharashtra : कौटुंबिक अडचणी, घरगुती हिंसाचार, कायदेशीर सल्ला किंवा सुरक्षेच्या समस्यांसाठी महिलांना मिशन शक्ती अंतर्गत 24 तास मदत उपलब्ध आहे. या सेवांचा लाभ कसा घ्यायचा ते जाणून घ्या.

Rashmi Mane

कौटुंबिक समस्या, मानसिक तणाव, कायदेशीर अडचणींवर सल्ला पाहिजे असल्यास किंवा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास महिलांना तातडीने मदत मिळावी यासाठी राज्य शासनाने 'मिशन शक्ती' अभियानांतर्गत 181 महिला हेल्पलाइन सेवा अधिक प्रभावीपणे कार्यान्वित केली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि भयमुक्त वातावरण मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून चालवली जाणारी ही सेवा संकटग्रस्त महिलांसाठी महत्त्वाचा आधार ठरत आहे. 24 तास आणि आठवड्याचे सर्व दिवस उपलब्ध असलेल्या या हेल्पलाइनद्वारे महिलांना विविध प्रकारची मदत तत्काळ पुरवली जाते. कौटुंबिक वाद, छळ, अत्याचार, धमकी किंवा इतर कोणत्याही संकटाच्या प्रसंगी महिलांना एका फोनवर मदत मिळू शकते.

केंद्र सरकारच्या 'मिशन शक्ती' या व्यापक योजनेअंतर्गत महिलांच्या सुरक्षा आणि संरक्षणासाठी ही सुविधा देशभर सुरू करण्यात आली आहे. महिलांना आवश्यक असलेली माहिती, मार्गदर्शन आणि सहाय्य एका व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

181 महिला हेल्पलाइनद्वारे केवळ आपत्कालीन मदतच नव्हे, तर कायदेशीर सल्लाही दिला जातो. हुंडा प्रतिबंध, बालविवाह रोखणे, महिलांवरील अत्याचारांबाबतचे कायदे तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर अधिकृत मार्गदर्शन मिळते. यासाठी संबंधित अधिकारी आणि तज्ज्ञांची मदत उपलब्ध करून दिली जाते.

याशिवाय, मानसिक तणाव किंवा भावनिक अडचणींचा सामना करणाऱ्या महिलांसाठी समुपदेशनाची सुविधाही उपलब्ध आहे. प्रशिक्षित समुपदेशक महिलांशी संवाद साधून त्यांना मानसिक आधार देतात. सामाजिक समस्यांवर मात करण्यासाठीही योग्य मार्गदर्शन केले जाते.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी आणि संकटाच्या काळात विश्वासाने धावून येणारी 'मिशन शक्ती' ही यंत्रणा उपयोगी ठरत आहे. त्यामुळे कोणतीही अडचण उद्भवल्यास महिलांनी न घाबरता या सेवेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT