Ajit Pawar vs Pratibha Lokhande Sarkarnama
विशेष

Ajit Pawar : अजितदादांना त्यांच्या पहिल्या निवडणुकीत कोणी चॅलेंज दिलं होतं? आज तो उमेदवार काय करतो?

Who challenged Ajit Pawar in his first election : अजित पवार यांच्या पहिल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी कोण होता? आज तो उमेदवार काय करतो? जाणून घ्या ही रंजक राजकीय कथा.

Rashmi Mane

Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आतापर्यंत अनेकदा आमदार, मंत्री, वेगवेगळ्या संघटनांचे, सहकारी संस्थांचे अध्यक्ष झाले. यासाठी त्यांनी मागील 35 वर्षांच्या कालखंडात असंख्य निवडणुका लढवल्या. पण त्यांच्यासाठी नेहमीच स्पेशल होती ती त्यांची पहिली निवडणूक. 1991मध्ये अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा लढले होते आणि विजयी झाले होते. त्यांच्या या निवडणुकीबद्दल अनेक आठवणी सांगितल्या गेल्या.

यात अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतील पहिली निवडणूक आणि त्यांना मिळालेलं पहिलं आव्हान आजही अनेकांना कुतूहलाचं वाटतं. 1991 साली अजित पवारांनी लोकसभेची पहिली निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत भाजपकडून त्यांना थेट चॅलेंज दिलं होतं ते डॉ. प्रतिभा लोखंडे यांनी. याच प्रतिभा लोखंडे यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत...

प्रतिभा लोखंडे या भाजपमध्ये अगदी सुरुवातीपासूनच सक्रिय होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बाळकडू आणि तिथले काम त्यांना भाजपमध्ये घेऊन आले. लोखंडे यांनी १९९१ मध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपकडून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा साडे तीन लाख मतांनी पराभव झाला. पण अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्याविरोधात उभं राहण्याचे आणि आव्हान देण्याचे धाडस लोखंडे यांनी दाखवले होते.

1991 मध्येच अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासाठी राजीनामा दिला. त्यामुळे 6 महिन्यात पोटनिवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसकडून अनेकदा विनंती करण्यात आली. पण निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही अशी आपली आणि पक्षाची भूमिका होती, असे डॉ. लोखंडे यांनी सरकारनामासोबत बोलताना सांगितले. त्या निवडणुकीत त्यांचा जवळपास साडे चार लाख मतांनी पराभव झाला, पण तरीही त्या त्वेषाने लढल्या होत्या.

पुढे 1999 मध्ये पुन्हा शरद पवार यांच्या विरोधातच निवडणूक रिंगणात उतरून आपली भूमिका ठामपणे मांडली होती. या दरम्यानच्या काळात एकदा त्या विधान परिषदेचीही निवडणूक लढल्या होत्या. 1999 नंतर मात्र त्या पूर्ववेळ पक्षातच सक्रिय राहिल्या. आज त्या सुमारे 76 वर्षांच्या आहेत पण सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. कोरोना संकटानंतर त्यांनी राजकारणापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, डॉ. लोखंडे आजही नियमितपणे दवाखान्यात वैद्यकीय सेवा देत आहेत.

प्रतिभा लोखंडे यांनी सांगितल्या आठवणी :

त्या काळातील राजकारण आठवताना डॉ. लोखंडे सांगतात की, तेव्हा विरोधकांमध्येही आपुलकी आणि सुसंस्कृतपणा होता. १९९१ च्या प्रचारादरम्यान काटेवाडीत अजित पवार यांची आणि त्यांची समोरासमोर भेट झाली. प्रतिस्पर्धी उमेदवार असूनही अजित पवार यांनी त्यांना घरी चहापानासाठी आमंत्रित केले होते. प्रचार सुरू असतानाच हे निमंत्रण मिळाल्याने त्यांनी ते नम्रपणे नाकारले, मात्र कमी वयातही अजित पवार यांचा प्रगल्भपणा आणि सौजन्य त्यांना भावले, असे त्या सांगतात.

त्या काळी आचारसंहिता आजइतकी कडक नव्हती. रात्री उशिरापर्यंत प्रचार चालायचा. शरद पवार यांचा राज्यात मोठा प्रभाव होता आणि त्यांचे पुतणे अजित पवार पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते. तरीही प्रचारादरम्यान कुठेही कटुता नव्हती. उलट शरद पवार आणि अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, डॉ. लोखंडे यांना कोणताही त्रास होता कामा नये. कार्यकर्त्यांनीही हा आदेश पाळला. अनेकदा प्रचाराच्या ठिकाणी पवार कुटुंबातील कर्मचाऱ्यांकडून चहापाणीही दिले जायचे, अशी आठवण त्या सांगतात.

आजच्या राजकारणात विरोधकांकडे शत्रूप्रमाणे पाहिले जाते, पण त्या काळात वेगळं वातावरण होतं, असं डॉ. लोखंडे आवर्जून नमूद करतात. शरद पवार यांच्याशीही त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते. १९९५ मध्ये संसदेत भेट झाल्यावर शरद पवार यांनी त्यांना घरी चहासाठी बोलावले होते. त्यांच्या मुलाच्या डेंटल क्लिनिकच्या उद्घाटनालाही शरद पवार उपस्थित राहिले होते. मात्र, त्या आजही नियमितपणे दवाखान्यात वैद्यकीय सेवा देत आहेत. अजित पवार यांच्या पहिल्या निवडणुकीतील ही कहाणी केवळ राजकीय संघर्षाची नाही, तर सभ्य, सुसंस्कृत आणि मानवी नात्यांची आठवण करून देणारी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT