Sharad Pawar-Ajit Pawar
Sharad Pawar-Ajit Pawar Sarkarnama
विशेष

अजित पवार म्हणतात...तुम्ही खुशाल पवारसाहेबांकडे माझ्याबद्दल तक्रार करा!

कल्याण पाचांगणे

माळेगाव (जि. पुणे) : बारामती तालुक्यात सर्वांगिण विकास होत असताना काही लोकांच्या टिकाटिप्पणीलाही मला सामोरे जावे लागते. बारामतीसह माळेगावच्या नागरिकांचे माझ्याकडून कधीही हेतुपुरस्पर नुकसान होणार नाही. हा मी शब्द देतो, तसे झाल्यास तुम्ही खुशाल पवारसाहेबांकडे माझ्याबद्दल तक्रार करू शकता, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीच्या विकासाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. (You complain about me to Sharad Pawar: Ajit Pawar)

माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथील राजहंस संकुलाच्या नूतनीकरण इमारतीच्या उद्‌घाटनाप्रसंगी आयोजित सभेत सोमवारी (ता. ६ डिसेंबर) उपमुख्यमंत्री बोलत होते. माळेगाव नगरपंचायत निर्माण करताना सरकारी पातळीवर नियमांचे उल्लंघन झाले आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर केला आहे, असा आरोप रंजन तावरे यांनी केला होता. त्या अनुषंगाने बोलताना अजित पवारांनी बारामतीमधील नागरिकांचे आपल्याकडून कोणतेही नुकसान होणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला.

राज्यात महानगर पालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आगामी काळात होत आहेत. विशेषतः नगराध्यक्ष, उपनराध्यक्षपदासाठी खूप मोठी चुरस आहे. बारामतीत नव्याने स्थापन झालेल्या माळेगाव नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष व नगरसेवक होण्यासाठीही मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडती या निवडणूक झाल्यानंतर घेण्याचे ठरविले आहे, असेही पवार यांनी सांगितले.

नगरपंचायतीला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेताना या निर्णयाचे फायदेही अजित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की नगरपंचायत झाल्यामुळे शासकीय पातळीवरून कोट्यवधी रुपयांचा निधी विकास कामांसाठी दरवर्षी उपलब्ध होणार आहे. माळेगावमध्ये सुदैवाने सरकारी गायरान मुबलक असल्याने खासगी क्षेत्रावर आरक्षण कमी पडणार आहे, बारामती शहराच्या तुलनेत माळेगावात नियोजनबद्दल विकास करण्यास वाव आहे. प्रशस्त रस्ते, दिवाबत्ती, सांडपाण्याची सुविधा, आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा, ठिकठिकाणी मैदान होणार आहेत. हे नगरपंचायतीचे फायदे लोकांपर्यंत पोचविण्यासाठी दीपक तावरे आणि कार्यकर्त्यांनी सक्रीय व्हावे, अशाही सूचना अजित पवारांनी या वेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT