विश्लेषण

मुख्यमंत्र्यांच्या तीन विश्वासू आमदारांवर महत्त्वाची जबाबदारी : नाराज मराठवाड्यासाठी पाणीदार मोर्चेबांधणी

योगेश कुटे

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यी तीन विश्वासू आमदारांवर महत्त्वाची जबाबदारी टाकली आहे. दौंडचे आमदार राहुल कुल, पनवेलचे प्रशांक ठाकरू आणि विधान परिषदेचे आमदारस सुजितसिंह ठाकूर यांचा समावेश मराठवाड्यासाठी हक्काचे पाणी मिळवून देणाऱ्या समितीमध्ये करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील जागा जिंकण्यासाठी भाजपसाठी ही समिती महत्त्वाची असणार आहे.

मराठा आंदोलन असो की शेतीविषयक प्रश्न याबाबत मराठवाड्यात सध्या नाराजीचे सूर उमटत आहेत. कोणत्याही आंदोलनाची सुरवात ही मराठवाड्यातील ठिणगीपासून होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच गेली अनेक वर्षे मराठवाड्यासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या पाणीप्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी हात घातला आहे. यासाठीचे प्रकल्प मार्गी लागले तर मराठवाड्यासह सोलापूर, पुणे जिल्ह्यातील काही मतदारसंघांचे भवितव्य बदलणार आहे. त्यासाठीच या तीन आमदारांवर आता महत्त्वाची जबाबदारी आली आहे. 

कोकणात समुद्रात मिळणाऱ्या नद्यांतील पाणी आणि कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी हे दुष्काळी मराठवाड्यात वळविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातही पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील टाटाच्या मुळशी धरणातील पाणी तातडीने वापरण्यासाठी फडणवीस यांचा आग्रह आहे. त्यासाठी अहवाल आता समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्याला २३ टीएमसी पाणी मिळण्यासाठीच्या प्रकल्पाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. 

कोयना प्रकल्पातील 67.5 टीएमसी आणि टाटा जलविद्युत प्रकल्पातील 42.50 टीएमसी पाणी हे वीजनिर्मितीसाठी समुद्रात सोडण्यात येते. हे पाणी तुटीच्या क्षेत्रात वळविण्याच्या योजनेवर गेली अनेक वर्षे चर्चा सुरू आहे. हे पाणी मिळाल्यास मराठवाडा आणि पूर्व विभागातील जिल्ह्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळू शकेल. कोयना प्रकल्पासह टाटा समूहाने बांधलेल्या लोणावळा, ठोकरवाडी, वळवण, मुळशी आणि आंध्रा या पाच प्रकल्पांचा अभ्यास करून हे पाणी कृष्णा आणि भीमेच्या खोर्‍यात कसे वळविता येईल, याचा अभ्यास ही समिती करणार आहे. 

जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अ. पां. भावे यांच्या अध्यक्षतेखाली या अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. यात जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्रीकांत हुद्दार, मेरीचे निवृत्त महासंचालक दि. मा. मोरे यांच्यासह जलसंपदा विभागाचे पुणे कार्यालयाचे मुख्य अभियंता, कोकण कार्यालयाचे मुख्य अभियंता, महानिर्मितीचे प्रतिनिधी, टाटा पॉवर कंपनीचे प्रतिनिधी व पुणे पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता चोपडे हे सदस्य सचिव आहेत. मराठवाडा प्रदेशाचे प्रतिनिधी म्हणून आमदार सुजितसिंह ठाकूर, पश्चिम महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून आमदार राहुल कुल तर कोकणचे प्रतिनिधी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत भाजपच्या (कुल हे रासपचे असले तरी सध्या भाजपचे म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहेत) तीन आमदारांचा समावेश केल्याने या निर्णयाचे सारे श्रेय भाजपला मिळण्याचा मार्गही मुख्यमंत्र्यांनी आधीच खुला केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT